पुस्तके वाचणारी पिढी इतिहासजमा होत चालली आहे, असे अनेकदा म्हटले जाते. मात्र हे गृहीतक मोडून काढणाऱ्या घटना आपल्या आजूबाजूलाच घडत असतात. अशीच एक घटना कोलकात्यात होऊ घातली आहे. ‘बोईमेला’ हा अवाढव्य पुस्तकमेळा ३० जानेवारी ते १२ फेब्रुवारीदरम्यान भरणार आहे. या मेळय़ाचे वैशिष्टय़ हे की पुस्तकप्रेमींच्या उपस्थितीच्या निकषावर याचा जगात फ्रँकफर्ट येथील पुस्तकमेळय़ानंतर दुसरा क्रमांक लागतो. यंदा मेळय़ात पुस्तकांचे ७०० आणि लिट्ल मॅगझिन्सचे २०० असे तब्बल ९०० स्टॉल्स असणार आहेत. मेळय़ाच्या ठिकाणी पोहोचणाऱ्यांसाठी विशेष बसस्थानक उभारण्यात आले आहे. यावरून पुस्तकमेळय़ाच्या व्याप्तीचा आणि लोकप्रियतेचाही अंदाज यावा.
‘बुकसेलर्स अँड पब्लिशर्स गिल्ड’ या संस्थेच्या वतीने दरवर्षी ‘इंटरनॅशनल कोलकाता बुक फेअर’ अर्थात बोईमेला आयोजित केला जातो. मीलन मेला येथे होणाऱ्या या मेळय़ाचे उद्घाटन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते होणार आहे. स्पॅनिश सांस्कृतिक आणि क्रीडा मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या पुस्तके आणि वाचन प्रोत्साहन विभागाच्या महासंचालक मारिया जोस गाल्वेझ साल्वाडोर आणि प्रसिद्ध बंगाली लेखक शिरसेंदु मुखोपाध्याय या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. यंदा स्पेनमधील साहित्य संस्कृतीवर विशेष प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. बोईमेलामध्ये एकूण २० देश सहभागी होतील. थायलंड प्रथमच या पुस्तकमेळय़ात सहभागी होईल.
मेळय़ाला होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी एकूण नऊ प्रवेशद्वारे असणार आहेत. त्यापैकी एक प्रवेशद्वार स्पेन येथील प्रसिद्ध टोलेडो गेटची प्रतिकृती असेल. मायकेल मधुसूदन दत्त आणि प्यारीचरण सरकार या कवींचे जन्मद्विशताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी इंग्रजी पुस्तकांच्या दोन दालनांना त्यांचे नाव देण्यात आले आहे. लेखक आणि संपादक रामपाद चौधरी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लिट्ल मॅगझिन्सच्या विभागाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. दिवंगत चित्रपट निर्माते मृणाल सेन आणि तरुण मुजुमदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दोन खुल्या व्यासपीठांना त्यांची नावे देण्यात आली आहेत. सत्यजीत राय यांचे वडील सुकुमार राय यांनी लिहिलेल्या ‘अबोल तबोल’ या बालगीतांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त बालसाहित्य विभागाला ‘अबोल तबोल’ हे नाव देण्यात आले आहे.
‘इंटरनॅशनल कोलकाता बुक फेअर’ला होणारी गर्दी नेहमीच वाचनसंस्कृती लोप पावत नसल्याची साक्ष देत आली आहे. यंदाचे वर्षही त्याला अपवाद ठरणार नाही. त्या दृष्टीनेच ही जय्यत तयारी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी कोविडची असलेली उरलीसुरली धाकधूकही यंदा हद्दपार झाल्याने इथे विक्रमी गर्दी होणार, असा अंदाज आहे.