कोणीही जसे लिहिले, ते तसेच्या तसेच वाचण्याची सोय गेल्या दोन दशकांत इंटरनेटमुळे वाढत गेली. तरीही पुस्तकांचे अप्रूप कायम आहे. हे काहींना फक्त मराठीपुरते वाटेल, पण इंग्रजीतही ते खरे आहे आणि उलट, इंटरनेटमुळे मिळालेले आव्हान कोणत्याही देशातील इंग्रजी पुस्तक- प्रकाशनास जगभरातून आहे. अशा वेळी जगाने वाचावीत अशी पुस्तके भारतात प्रकाशित करणार्‍या प्रकाशनसंस्था, त्यांचे व्यवस्थापक आणि मुख्यत: ग्रंथसंपादक, ही मंडळी ग्रंथव्यवहाराच्या मोठ्या मानवी परंपरेचे वाहक ठरतात, परंपरा जशीच्या तशी न पाळता पुढे नेणारे ठरतात. ‘हार्पर कॉलिन्स’ या प्रकाशनसंस्थेचे भारतातील प्रमुख संपादक क्रिशन चोप्रा हे अशा वाहकांपैकी एक होते, म्हणून ते दिवंगत झाल्याच्या निमित्ताने तरी त्यांच्या कामाची ओळख करून घेणे आवश्यक.

‘हार्पर कॉलिन्स इंडिया’मध्ये त्यांची नेमणूक न्यूयॉर्कहून, या संस्थेच्या जागतिक मुख्यालयातून नोव्हेंबर २००६ मध्ये झाली. त्याआधीही क्रिशन चोप्रा हे प्रकाशन/ संपादन व्यवसायात, ‘पे्ग्विवन इंडिया’सारख्या बड्या संस्थेत होते. पण ‘हार्पर’ने त्यांना वरिष्ठपदी नेमून स्वातंत्र्य दिले, त्याचा उपयोग त्यांनी संस्थेच्याच नव्हे तर ग्रंथविश्वाच्या भल्यासाठी केला. मोठ्या प्रकाशनसंस्थांना एकारलेले, अतिआग्रही न राहाता सर्व प्रकारच्या वाचकांसाठी पुस्तके काढावी लागतात, हे पथ्य त्यांनीही पाळलेच पण वाचकांचा एक नवा प्रकार क्रिशन चोप्रा यांनी नेमका हेरला… हा वाचकवर्ग अर्थकारणाचे महत्त्व पुरेपूर जाणणारा, राजकारणाचीही आर्थिक वा धोरणात्मक बाजू आवर्जून पडताळणारा… अशा सुबुद्ध वाचकांसाठी ‘हार्पर बिझनेस’ हा नवा विभागच क्रिशन चोप्रा यांच्या कारकीर्दीत सुरू झाला. रघुराम राजन आणि वाय व्ही रेड्डी हे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर, बँकांच्या बुडीत कर्जांचा समाचार घेणारे विवेक कौल, नीती आयोगाचे माजी अध्यक्ष अरविंद पानगढिया अशा लोकांना चोप्रा यांनी लिहिते केले. पानगढियांचे पुस्तक अटलबिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्यापासूनच्या धोरणांचा वेध घेणारे आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री/ गृहमंत्री पी. चिदम्बरम यांचे आठवडी सदर लोकसत्ता/ इंडियन एक्स्प्रेसच्या वाचकांना नवे नाही- दर आठवड्यास ताज्या विषयांवर चिदम्बरम लिहीत असतात. पण हे विषय त्या-त्या वेळी ताजे म्हणून काही वर्षांनंतर शिळे होत नसतात, किंवा उण्यापुर्‍या हजारभर शब्दांच्या लेखांची जोडणी जर नेमकेपणाने केली तर त्यातून पुस्तकाची पल्लेदार प्रकरणे निर्माण होऊ शकतात, हे क्रिशन चोप्रा यांच्या संपादनकौशल्यामुळे शक्य झाले. दुसरीकडे, ‘गीता प्रेस ॲण्ड द मेकिंग ऑफ हिंदू इंडिया’ हे उत्तम, पण धंदा म्हणून अवघड पुस्तकही त्यांनी काढले.

संपादन ही मूळ लिखाणाला दिशा, गती आणि ऊर्जा देण्याची क्रिया… ती करताना आपापले बौद्धिक कौशल्य आणि भवतालाचे भान वापरावे लागते. वरिष्ठ म्हणून ग्रंथसंपादकांच्या चमूचे नेतृत्व करताना या सहकार्‍यांपैकी कुणाकडे कोणते बाड द्यावे, त्यांच्याकडून ते कसे संपादित करून घ्यावे, याचा पक्का विचार क्रिशन चोप्रा करीत, अशी दाद आता त्यांच्या अनेक सहकार्‍यांनीच, आदरांजली वाहताना दिलेली आहे. हे चोप्रा यांचे मोठेपण होते.