जिभा जांभळ्यानिळ्या होईस्तोवर दारच्या झाडावरची जांभळे खाल्लेले, लसणाची चटणी पाटावरवंटा किंवा खलबत्ता वापरून केलेले अनेकजण आता वयाने पन्नाशीपार असतील आणि जांभूळ मधुमेहावर गुणकारी, लसूण हृद्रोगावर… असे काहीबाही आता यापैकी अनेकांच्या लक्षात राहात असेल… पण हे बहुतेकांना माहीत नव्हते अशा काळात- १९७७, १९८९, १९९५ अशा वर्षांत डॉ. के. टी. ऑगस्टी यांनी लसूण, जांभूळ, कांदा आदींवर शोधनिबंध लिहिले होते. त्यांचा उल्लेख आजही अनेक नव्या शोधनिबंधांच्या तळटिपांमध्ये – ‘सायटेशन’ म्हणून- सापडतोच. असे अनेकांच्या अभ्यासाला आधारभूत ठरलेले तब्बल दीडशे शोधनिबंध आयुष्यभरात लिहून, १४ पीएच.डी. विद्यार्थी घडवून डॉ. ऑगस्टी १० मार्चच्या रात्री निवर्तले.
केरळमध्ये १९३२ साली जन्मलेले ऑगस्टी रसायनशास्त्राच्या शिक्षणासाठी राजस्थानात पिलानी येथे गेले. ‘बिट्स, पिलानी’ म्हणून आज देशभर शाखा असलेले अभिमत विद्यापीठ तेव्हा तिथे नव्हते (ते १९६४ मध्ये स्थापन झाले); त्यामुळे पिलानीच्या ‘बिर्ला विज्ञान महाविद्यालया’त शिकून, राजस्थान विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर त्यांनी त्याच विद्यापीठातून अल्पशर्कराविकारावर (हायपोग्लायसेमिया) गुणकारी ठरणार्या वनस्पतींचे रासायनिक गुणधर्म या विषयात संशोधन करून पीएच.डी. (१९६३) मिळवली. पुढे केवळ आहारद्रव्यांतूनच मानवी शरीरात तयार होणार्या ट्रिप्टोफॅन अमिनो आम्लांच्या प्रक्रियेवर अधिक अभ्यास करून त्यांनी हैदराबादला तेव्हा असलेल्या ‘रीजनल रीसर्च लॅबोरेटरी’तून (आजची ‘सीएसआयआर- भारतीय रसायनतंत्र संस्था) पोस्टडॉक्टरल पदवी मिळवली. इन्सुलिन हे संप्रेरक (हार्मोन); पण शरीरातील विकरांवर (एन्झाइम) त्याचा कसा परिणाम होतो, यावर त्यांनी तमिळनाडूत वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमधून अधिक संशोधन केले. जैवरसायनशास्त्रातले हे संशोधन, त्या विद्याशाखेतील संशोधनाची सोय फक्त बेंगळूरुच्या भारतीय विज्ञान संस्थेतच असूनही तेथे जाण्याची संधी न मिळताच त्यांनी केले हे विशेष. वयाच्या चौतिशीपर्यंत हे सारे संशोधन करून ते १९६६ पासून ते केरळ विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले. पुढे याच विद्यापीठात ते प्राध्यापकही झाले, पण दरम्यानच्या काळात नायजेरियातील एका विद्यापीठात त्यांनी दोन वर्षे अध्यापन-संशोधन केले होते. वयाच्या ५५ व्या वर्षानंतर, साधारण १९८७ ते २०१६ या काळात त्यांनी लसूण, कांदा यांवर संशोधन केले. ही ‘जादूई औषधे’ नाहीत, विशिष्ट रासायनिक क्रिया घडवण्यास कारक असल्यामुळेच आणि तेवढ्या प्रमाणातच त्यांचे औषधी गुण उपयुक्त ठरतात, हेही त्यांनी रसायन-सूत्रे मांडून स्पष्ट केले.
मनात आणले असते तर, एखादे ‘गुणकारी औषध’ ते सहज निर्माण करू शकले असते. पण त्या फंदात न पडता भारतीय आहार आणि वनस्पती यांतील रसायनांच्या आधारे त्यांनी विकरशास्त्र, शरीरातल्या मंदज्वलन प्रक्रियांचा आणि त्यातून उद्भवू शकणार्या विकारांचा अभ्यास, जीवविषशास्त्र अशा विषयांच्या संशोधनावरच लक्ष केंद्रित केले. जांभूळ, वड, आवळा यांचे ’औषधी गुण’ पुढल्या काळात दिसण्याआधीच, शरीरातील त्यांच्या संभाव्य अभिक्रियांचा अभ्यास ऑगस्टी यांनी केला होता. त्यांच्या जाण्यानंतरही त्यांचे काम पायाभूत ठरत राहील.
