आपल्यापैकी अनेकांचा हा अनुभव आहे की प्रवास करताना आपल्याला त्रास होतो. म्हणजे पोटात ढवळतं, चक्कर आल्यासारखं वाटतं, कधी कधी उलटीसुद्धा होते. पण मुळात कोणतंही वाहन लागतंच का? आणि काहीजणांनाच का? आणि वाहन लागतं म्हणजे नक्की काय होतं? असे प्रश्न पडतात.

वाहन लागण्याचं मुख्य कारण म्हणजे प्रवासात आपल्या मेंदूला उलटसुलट संदेश आल्यानं तो गोंधळतो. हे वाचून आता तुम्ही गोंधळला असाल ना? होतं काय की, आपल्या कानाच्या सर्वात आतला भाग म्हणजे अंत:कर्ण हा वाहनाच्या हालचालींची नोंद घेऊन मेंदूला तसे संदेश पाठवतो आणि इकडे आपले डोळे मात्र तुलनेने स्थिर असतात. आपण कधी वाहनात वाचत असतो तर कधी वाहनामध्येच इकडे तिकडे पाहत असतो. त्यामुळे आपलं शरीर साधारणपणे स्थिर आहे असा संदेश डोळ्यांकडून मेंदूला जातो. कान सांगताहेत की शरीर हलतं आहे आणि डोळे सांगताहेत की शरीर तुलनेनं स्थिर आहे. अशा विरुद्धार्थी संदेशांमुळे मेंदू गोंधळतो. आणि त्यामुळे मग आपल्याला मळमळायला लागतं, चक्कर आल्यासारखं वाटतं, उलटीसुद्धा होते.

आणखी काही कारणांनी हा त्रास अधिक होऊ शकतो. जसं की लहान मुलांची उंची कमी असल्यानं ती वाहनाच्या बाहेर बघू शकतीलच असं नाही. त्यामुळे त्यांना हा त्रास होतो. कधीकधी आपण काचा बंद असलेल्या मोटारगाडीने जात असलो तर त्या हवेत घुसमटल्यासारखं वाटून हा त्रास होऊ लागतो. काही पुरुषांच्या आणि बहुतांश स्त्रियांच्या कानांची संवेदनशीलता खूप जास्त असते. त्यामुळेसुद्धा हा त्रास होतो. त्यातून व्हर्टिगोचा अथवा अर्धशिशीचा त्रास असणार्‍या व्यक्तींचे तसंच सहा ते नऊ वर्षांच्या मुलांचे अंत:कर्णसुद्धा अधिकच संवेदनशील असल्यानं त्यांनाही हा त्रास सहज होऊ शकतो. गरोदरपणामुळे, मासिक पाळीमुळे किंवा संप्रेरकविषयक औषधोपचार सुरू असल्यास अशा स्त्रियांनादेखील हा त्रास सहज होऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे, आधी कधी त्रास झाला असेल तर ‘आतासुद्धा होईल’ अशी भीती मनात घर करून असते. त्या भीतीपोटीसुद्धा हा त्रास सहज होऊ शकतो.

जर आपण डोळ्यांतूनसुद्धा मेंदूला शरीर हलत असल्याचा संदेश देऊ शकलो तर? मग हा गोंधळ होणार नाही. त्यासाठी, शक्यतो वाहनाच्या पुढील भागात बसावं आणि नजर समोरच्या काचेतून दिसणार्‍या रस्त्यावर ठेवावी. तुम्ही इतर जागी बसला असाल तर खिडकीतून बाहेर पाहताना नजर क्षितिजावर स्थिर ठेवा. असं केल्यानं हा त्रास कमी होईल किंवा होणारच नाही.