पृथ्वीचा ७१ टक्के भाग व्यापून अविरतपणे सर्व काही सहन करणारा आपला महासागर आजपासून सुमारे ४.६ अब्ज वर्षांपूर्वी तयार झाला! पृथ्वीचा जन्म होत होता, त्यावेळी ती अतिउष्ण वायूचा गोळा किंवा ढगाच्या स्वरूपात होती आणि प्रचंड वेगाने गरगरा फिरत होती. या फिरण्यामुळे लोह, निकेल यांसारखे जड धातू व इतर जड मूलद्रव्ये पृथ्वीच्या पोटात स्थिरावली. तर सिलिकॉन, ॲल्युमिनियम यासारखी कमी वजनाची मूलद्रव्ये मधल्या स्तरावर थांबली. अतिशय कमी वजनाच्या मूलद्रव्यांपासून पृथ्वीचा पृष्ठभाग आणि तेव्हाचे वातावरण तयार झाले.
पृथ्वीच्या त्यावेळेच्या पाच हजार ते सहा हजार अंश सेल्सियस इतक्या जास्त तापमानात हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन अशी मूलद्रव्ये सुटय़ा अवस्थेत न राहता इतर मूलद्रव्यांशी व एकमेकांशी रासायनिक संयोग करत गेली. त्यापासून ऑक्साइड, कार्बाइड, नायट्रेट अशी संयुगे निर्माण होत गेली. हायड्रोजन मूलद्रव्य हे ऑक्सिजन, नायट्रोजन आणि कार्बन यांच्याशी संयोग करत अनुक्रमे पाणी, अमोनिया, हायड्रोकार्बन आणि मिथेन तयार करीत गेले. तेव्हाच्या पृथ्वीवरच्या अतिउष्णतेमुळे सर्वच मूलद्रव्ये वाफ होऊन बाहेरच्या थरात निसटत होती.
पृथ्वी जसजशी थंड होत गेली तसतसे वायुरूप पदार्थाच्या संघननाने द्रवरूपात परिवर्तन झाले. या संघननाने वृष्टी होऊ लागली. पृथ्वीच्या अतितप्त पृष्ठभागावर पाण्याचे थेंब पडल्यावर त्यांचे लगेच बाष्पीभवन होत होते. अशा रीतीने काही लक्ष वर्षे सतत पाऊस पडला आणि आज आपल्याला जो समुद्र दिसतो आहे, तो निर्माण होऊ लागला.
वातावरणातील अमोनिया आणि मिथेन पाण्यात विरघळून जमिनीवर मिसळू लागले आणि त्यापासून तयार होणारी संयुगे तत्कालीन समुद्रात मिसळली. समुद्रात होत गेलेल्या अशा रासायनिक उत्क्रांतीचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रथिने, कबरेदके आणि मेद या मूलभूत पदार्थाचा उगम! तेव्हाच्या समुद्राला हाल्डेन या शास्त्रज्ञाने ‘हॉट डायल्युट सूप’ असे नाव दिले. त्यातच पहिल्यावहिल्या सजीवाची निर्मिती झाली. म्हणजेच समुद्र हा पहिल्या सजीवाच्या जन्माचा साक्षीदार तर होताच, पण त्यापुढे होत गेलेल्या जीवशास्त्रीय उत्क्रांतीचा मोठा आधार होता. सर्व अपृष्ठवंशीय प्राणी समुद्रातच तयार झाले. ही उत्पत्ती आणि अनेक सजीवांचा विकास अंदाजे तीन अब्ज वर्षांपासून सुरू झाला आहे. त्यावेळेस सर्वच पृथ्वी पाण्याने व्यापलेली होती. आज जे भूखंड दिसतात ते खूप नंतर निर्माण झाले. आजही अतिसूक्ष्म जिवाणूंपासून ते महाकाय ‘ब्ल्यू व्हेल’पर्यंतची पराकोटीची जैवविविधता महासागरातच आढळून येते. पृथ्वीवरचा हा एकमेव साक्षीदार आहे.. या अव्याहत चालणाऱ्या कालचक्राचा!
डॉ. नंदिनी विनय देशमुख
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org