‘अपात्र बहिणींसाठी सरकारचे २१ हजार कोटी रुपये पाण्यात’ ही बातमी (२ एप्रिल) वाचली. कसलाही विचार न करता निवडणुकीची रेवडी म्हणून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेअंतर्गत पडताळणी न करता अर्ज भरणार्‍या सर्व महिलांना सरसकट महिना १५०० रुपये अनुदान सरकारकडून देण्यात आले. अशा अपात्र असलेल्याही लाखो बहिणी अर्ज भरतील व योजनेचा लाभ घेतील हे सरकारला ठाऊक नसणे शक्य नाही. पण निवडणूक काळात लोकहिताचे नव्हे तर लोकानुनयी निर्णय घ्यावे लागतात, हे सर्वच राजकारणी जाणून आहेत. अशा निर्णयांची अंमलबजावणी करताना सरकारची तिजोरी नेहमी भरून वाहत असते. मग शेतकर्‍यांची कर्जमाफी करताना ही तिजोरी कशी रिकामी वाटू लागते? सरकारी कार्यालयांमध्ये हजारो जागा रिक्त असतानाही तेथे भरती का केली जात नाही? स्वत:च्या स्वार्थासाठी डोळे झाकून पैसे उडवणारे सरकार गरिबीत दिवस काढत, सरकारी नोकरीची स्वप्ने पाहत रात्रंदिवस अभ्यास करणार्‍या स्पर्धा परीक्षार्थींकडून भरमसाठ असे परीक्षा शुल्क कसे घेते? शेतकर्‍यांचा विरोध असतानाही कोणीही न मागितलेला शक्तिपीठ महामार्ग बनवताना १ लाख कोटी रुपयांचा खर्च करणारे सरकार तरुणांची बेरोजगारी मिटवण्यासाठी कोणती पावले उचलत आहे? की ‘तिजोरीवर ताण’ हा शब्दप्रयोग सरकारने ठरावीक निर्णयांसाठीच राखीव ठेवला आहे?

– जयेश भगवान घोडविंदे, शहापूर (जि. ठाणे)

हा लोकशाहीचा संकोच

सध्याच्या काळात भारतातील विद्यार्थी आंदोलनांकडे पाहण्याचा प्रशासकीय दृष्टिकोन हा लोकशाहीसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. राजेश बाळखंडे (भदंत विमांसा),‘एफटीआयआय’मधील विद्यार्थी किंवा जामिया आणि जेएनयूमधील तरुण यांच्या संघर्षात ‘व्यवस्थेला प्रश्न विचारणे’ हा समान धागा आहे. शिक्षण, फी वाढ वा प्रशासकीय पारदर्शकतेबद्दल या तरुणांशी संवाद साधण्याऐवजी त्यांना ‘व्यवस्थाविरोधी’ वा ‘देशविरोधी’ ठरवण्याची नवी पद्धत रूढ होत आहे. केवळ विचारधारेचा विरोध म्हणून विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करणे, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे किंवा त्यांना विद्यापीठात प्रवेश नाकारणे, हे वैचारिक दडपशाहीचेच निदर्शक आहे. यात लोकशाहीचा संकोच झाल्याचे स्पष्ट दिसून येते.

– ललित अंबळकार, अकोला</strong>

भावनेच्या भरात नको ते…

‘शहाण्याचा शहाणपणा की…’ हा अग्रलेख वाचला. कुठल्याही कलहाच्या मुळाशी असते ती विवेकशून्यता आणि पराकोटीचा अहंकार. असा अहंकार हा डोनाल्ड ट्रम्प यांचा स्थायीभाव आहे. अमेरिकन समाजात ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’सारखा भ्रामक पण राष्ट्रवादी नारा पेरून भावनेच्या उन्मत्त लहरीवर स्वार होऊन ते दुसर्‍यांदा राष्ट्राध्यक्ष झाले. आपला क्षुद्र अहंगंड शमवण्यासाठी ट्रम्प यांनी संपूर्ण पश्चिम आशियाला युद्धाच्या दरीत लोटले आहे आणि उर्वरित जगावर इंधनसंकट आणि महागाई लादली आहे. इराणवर युद्ध लादून त्यांचा तथाकथित उद्देश तर साध्य होताना दिसत नाहीच पण आपल्याच सत्तेवर गंडांतर ओढवून घेण्याचा विदूषकी खटाटोप डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकंदरीत परस्परविरोधी वक्तव्यातून आणि कृतीतून दिसत आहे. थोड्या का होईना पण अमेरिकन जनतेत विवेक जागा आहे म्हणून लाखोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरून ट्रम्प यांच्या राजेशाही मग्रुरीच्या विरोधात निदर्शने करीत आहेत. केवळ भावनेच्या भरात आणि पोकळ राष्ट्रवादाच्या घोषणांना भाळून नको त्या व्यक्तीच्या हाती सत्ता दिल्याने काय होते याची उपरती अमेरिकी नागरिकांना एव्हाना झाली असेल. इतर देशांनीही धडा घेण्यासारखी परिस्थिती आहे.

– ॲड. गणेश शिवाजीराव शिंदे, छत्रपती संभाजीनगर

अधुनिक लहरी महम्मद

‘शहाण्याचा शहाणपणा की…’ हा अग्रलेख वाचताना मी शाळेत सुमारे साठ वर्षांपूर्वी शिकलेल्या इतिहासात रमलो. ज्यांनी दिल्लीतील आपली राजधानी दौलताबादला आणली, सोन्याऐवजी तांब्याची नाणी पाडली. थंडीच्या दिवसात चीनवर स्वारी केली त्यात त्याचेच अनेक सैनिक गारठून मेले, त्या लहरी महम्मद तुघलकाची आठवण झाली. आज ट्रम्प एकीकडे म्हणतात की आम्ही इराणच्या जनतेला न्याय देण्यासाठी लढत आहोत आणि तेथीलच निष्पापांचा ते बळी घेत आहेत. या त्यांच्या लहरीपणाचा परिणाम मात्र जगातील लोकांना भोगावा लागत आहे. ट्रम्प हे अमेरिकन न्यायव्यवस्थेला तरी जुमानतील का हा प्रश्नच आहे.

– प्रकाश विचारे, रोहे