साहित्यिकांत भौतिकतेपलीकडचे जग निर्माण करण्याची कलाकुशलता येते ती सर्जनातील वैचित्र्यपूर्ण खेळी नि कसरतीतून! हा कल्पनेचा खेळ तो हेतुत: कधी करतो आपसूक, कधी न कळता जन्मतोही!! प्रतिभा अलौकिक वरदान असते. ती लेखक आणि साहित्यिकातील सीमारेषाही म्हणता येईल. विशेषत: त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावना वाचत असताना हे जाणवते. या प्रस्तावना त्यांना एकीकडे बहुप्रज्ञ सिद्ध करतात, तर दुसरीकडे या प्रतिभेच्या आश्चर्यकारक विभ्रमाची प्रचीती देतात. विभ्रम (इल्युजन) वास्तवास नवे अमूर्त, अज्ञेय, अनाकलनीय असे क्षितिज बहाल करत संभावनांच्या सर्व सीमारेषा पार करणारी प्रज्ञा असते खरी!

तर्कतीर्थांनी आपल्या सर्व ग्रंथांना लहान-मोठ्या प्रस्तावना लिहिल्या आहेत. त्या स्वलेखनाचे भूमिका विवेचन ठरत. परंतु, त्यांनी अन्यांच्या ग्रंथांना ज्या प्रस्तावना लिहिल्या, त्याही स्वग्रंथ प्रस्तावनांप्रमाणे समरसून लिहिलेल्या दिसतात. ज्यांना औपचारिक प्रस्तावना व साचेबंद प्रस्तावना म्हणता येतील, अशा शेकडो प्रस्तावना उपलब्ध आहेत. विशेषत: तर्कतीर्थ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष असतानाच्या काळात (१९६०-८०) जे शेकडो ग्रंथ त्यांनी विविध क्षेत्रीय तज्ज्ञांकडून लिहून घेतले, ती त्यांची स्वनियोजित निर्मिती होती. त्यात मौलिक ग्रंथ होते तसेच भाषांतरित ग्रंथही मोठ्या संख्येने होते. त्यांनी अध्यक्ष म्हणून लिहिलेल्या प्रस्तावना पठडीतल्या होत्या. यात सन्माननीय अपवाद ग्रंथांना तर्कतीर्थांनी स्वतंत्र प्रस्तावना लिहिल्याचे दिसते.

‘मराठी विश्वकोश’मधील तर्कतीर्थांचे संपादक सहकारी म्हणून अनेक वर्षे कार्यरत राहिलेल्या रा. ग. जाधव यांनी ‘शास्त्रीजी’ या व्यक्तिमत्त्व चरित्रांकनात अनेक नोंदी, निरीक्षणे नोंदविली आहेत. ‘टपालातून आलेल्या व्याख्यान निमंत्रणांना त्यांनी कधी नकार दिलेला नाही.’ तसेच अन्य एकाने प्रस्तावनांसंदर्भातही असेच निरीक्षण नोंदविल्याचे दिसते. शेकडो भाषणे देणारे नि प्रस्तावना लिहिणारे तर्कतीर्थ खऱ्या अर्थाने समाजपुरुष व सार्वजनिक चरित्र होते. प्रस्तावना लिहिलेल्या ग्रंथांचे प्रकार तरी किती वैविध्यपूर्ण? कोश, लेखसंग्रह, भाषांतरित ग्रंथ, समग्र वाङ्मय, वैचारिक ग्रंथ, आत्मकथा, कादंबरी, काव्यसंग्रह, तत्त्वज्ञान ग्रंथ, भाषणसंग्रह संशोधन ग्रंथ, स्फूटसंग्रह, पत्रसंग्रह. त्याला काही पारावार नाही!

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष असण्याच्या काळात तर्कतीर्थांनी विज्ञान, तंत्रज्ञानविषयस्पर्शी अनेक ग्रंथांची निर्मिती केली. या विषयातील अनेक कोशही निर्माण केले. ‘वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा कोश’, ‘इंग्रजी-मराठी स्थापत्य-शिल्प कोश’, ‘आयुर्वेदीय महाकोश’ त्यांपैकी होत. ‘परिभाषा, संज्ञांबाबत न्यूनगंड न बाळगता शब्द आत्मसात केल्याशिवाय मराठी ज्ञानभाषा करता येणार नाही, याचे भाषिक मर्यादाभान तर्कतीर्थांना होते. ‘वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा कोश’ या प्रस्तावनेचा समारोप करताना त्यांनी जे मत व्यक्त केले होते, ते उदारमतवादी होते. त्यांनी लिहिले होते की, ‘‘पश्चिमी विज्ञान व तंत्र यांच्या संज्ञा व परिभाषा स्वभाषेत उचलून घेऊन आत्मसात करण्यात अनमान करू नये. त्याबरोबर देशी भाषा किंवा संस्कृतमधील पर्यायही अन्वर्थक रूपाने घेता आल्यास त्यांच्या बरोबरीने वापरावे. आंतरराष्ट्रीय किंवा इंग्रजी संज्ञा वा परिभाषा तशाच ठेवल्याने विज्ञान व तंत्र यांचे अर्जन करणे अधिक सुलभ होईल. विज्ञान व तंत्र यांचा दैनंदिन अतिवेगशाली विकास पश्चिमी भाषांमध्ये होत आहे. असा वेग व विकास साधण्याइतकी गती भारतीय साहित्याला अजून यावयाची आहे. त्यास अवकाश आहे. आपण सध्या मंद अशा अनुकरणावस्थेत आहोत. अशा स्थितीत आपल्या ज्ञानार्जनाचा सांधा मजबूत व कायम ठेवण्याकरिता शब्दांची उचल चालू ठेवणे अत्यंत हितावह आहे. नव्या संज्ञा व परिभाषा निर्माण करण्याचे प्रयत्नही जरूर करावेत; पण त्यात शुद्धीकरणाचा अशुद्ध हेतू असू नये.’’

प्रस्तावनाकार म्हणून तर्कतीर्थांनी जो वस्तुपाठ महाराष्ट्रास घालून दिला आहे, त्यानुसार ग्रंथ वाचल्याशिवाय प्रस्तावना लिहायची नाही, हा कटाक्ष त्यांच्या लेखन कसोटीचा अंगभूत भाग होता, हे लक्षात येते. कोणतेही कीर्तिमान स्थापण्याची त्यांची ईर्ष्या व स्पर्धा नव्हती. त्यांच्या कितीतरी प्रस्तावना ललितबंध शोभतील अशा आहेत.