एखाद्या महनीय व्यक्तीशी पूर्वनियोजित प्रश्नावलीद्वारे साधलेला संवाद म्हणजे मुलाखत. हिंदीत याला मोठा चपखल शब्द सापडतो, तो म्हणजे ‘साक्षात्कार’! ‘हे हृदयीचे ते हृदयी’ असे असते हे हितगुज. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी १९४९ ते १९९४ अशा ४५ वर्षांच्या काळात पाऊणशेहून अधिक मुलाखती विविध संवादकांना; वृत्तपत्रे, नियतकालिके, आकाशवाणीसारखी माध्यमे यांना दिल्याचे दिसून येते. मुलाखतदार नुसता प्रतिष्ठित असून चालत नाही, तर मुलाखतकारही तितकाच मातब्बर असावा लागतो. तर्कतीर्थांना पु. ल. देशपांडे, प्रा. मे. पुं. रेगे, डॉ. सुधीर रसाळ, श्रीराम पुजारी, डॉ. सुधाकर पवार, सुधीर गाडगीळ यांच्यासारखे नामवंत मुलाखतकार लाभले म्हणून त्यांच्या मुलाखती एखाद्या समाजप्रेषितास शोभाव्यात, अशी ती साक्षात्कारी प्रवचने ठरली. तर्कतीर्थांच्या मुलाखतींचा बाज प्रवचनसदृश दीर्घ राहिला आहे.
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आलेल्या माध्यम सुकाळाने मुलाखतींचे स्वरूप जे दीर्घोत्तरी उत्तरांसारखे होते, ते एकदम एका वाक्यात उत्तर, असे वस्तुनिष्ठ होऊन गेले. अशी एक तर्कतीर्थांची मुलाखत प्रख्यात मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी घेतली होती, तशीच वसंतराव बोराटे यांनीही. ‘देव मानता का?’ असा थेट खिंडीत गाठणारा प्रश्न विचारल्यावर तितक्याच धीट व थेटपणे तर्कतीर्थ उत्तर देतात, ‘विश्वाची अवर्णनीय, अनिर्वचनीय चैतन्यशक्ती मानतो.’ देव पारोसे राहतात म्हणून तक्रार करणाऱ्या सुविद्या पत्नीस देव्हाऱ्यातील सारे देव कृष्णार्पण करून निरुत्तर करणारे तर्कतीर्थ उर्वरित आयुष्यात कर्मकांडमुक्त केवळ मानसपूजा करतात. हे असते एकेकाळी संध्यास्नानाशिवाय पाणीही प्राषन न करणाऱ्या एका अनुष्ठानिक पुरोहिताचे बुद्धिप्रमाण परिवर्तन!
तर्कतीर्थांनी दिलेल्या मुलाखती वैविध्यपूर्ण आहेत, त्या विषय, आशय, शैली, स्वरूप, प्रकार अशा सर्वांगांनी. आपल्या सर्वप्रकारच्या मुलाखतींमधून तर्कतीर्थांनी सनातन विचारांना तिलांजली देत नवमानवतावाद, विवेकवाद, बुद्धिप्रामाण्यवाद प्रमाण मानून नवपथदर्शी असे समाजप्रबोधन केले आहे. त्यांच्या अधिकांश मुलाखती दैनिक ‘केसरी’ व ‘नवभारत’ मासिकातून प्रकाशित झाल्या.
तर्कतीर्थांनी दिलेल्या आत्मपर मुलाखतींमधून एकप्रकारे त्यांचे आत्मचरित्रच साकारते. आपल्या जडणघडणीच्या अनुषंगाने त्यांनी ज्या परात्मपर मुलाखती दिल्या, त्यातून त्यांच्या अध्ययन, अध्यापन आणि मानसिक घडणीवर प्रकाश पडतो. तर्कतीर्थांच्या ज्या व्यक्ती व विचारकेंद्रित मुलाखती आहेत, त्यातून त्या व्यक्तींशी असलेला तर्कतीर्थांचा अनुबंध अधोरेखित होतो. धर्म, संस्कृती, तत्त्वज्ञान यांसारखी क्षेत्रे खरे तर तर्कतीर्थांसाठी घरचे आंगणच; पण तिथेही ते आपला वेगळा ठसा उमटविल्याशिवाय राहात नाहीत. राजकारण, शिक्षण, भाषा आणि साहित्य अशा पठडीबाहेरील विषयांवर मुलाखती देण्यास तर्कतीर्थ कधी कचरले नाहीत वा खचलेही नाहीत. सर्वविषयस्पर्शी प्रज्ञा व प्रतिमा लाभलेल्या तर्कतीर्थांची तुम्ही कोणतीही मुलाखत वाचा वा ऐका, ती तर्कनिष्ठ, सात्त्विक व नवमत प्रकटणारी असणारच.
तर्कतीर्थ मनुष्यवेल्हाळ गृहस्थ. त्यांच्या गोतावळ्यात कुमार गंधर्व, यशवंतराव चव्हाण, स्वामी केवलानंद सरस्वती, मानवेंद्रनाथ रॉय यांच्यासारखे दिग्गज असणे, हे तर्कतीर्थांची सामाजिक प्रतिष्ठा सूचित करणारे खरे! भारतीय संस्कृती, दलित समाज, सती प्रथा, बुद्धिप्रामाण्यवाद, ईश्वराचे रूप, अण्वस्त्र बंदी, संविधान, आरक्षण, राम जन्मभूमी, समान नागरी कायदा, ग्रंथालये, भाषा, साहित्य यांसारख्या विषयांवरील तर्कतीर्थांच्या प्रदीर्घ मुलाखती त्यांच्या व्यासंग वैचित्र्याचा प्रत्यय देतात. त्यांच्या काही मुलाखतींना जिवंतपणीच शाश्वत मूल्य (अर्काइव्हल व्हॅल्यू) लाभले. आज त्या यूट्यूबवर उपलब्ध आहेत. परमार्थ मंदिर – मशिदीत नसून माणसात आहे, हे समजावणारे तर्कतीर्थ मनुष्यलक्ष्यी विचारक म्हणून समाजप्रेषित सिद्ध होतात. त्यांचे मुलाखतीतील विचार प्रवचनकाराच्या निरूपण नि दृष्टांताने युक्त असल्याने त्या एकाच वेळी वाचनीय, श्रवणीय आणि विचारणीय सिद्ध होतात. म्हणून त्यात साक्षात्काराची प्रचीती येत राहते. या मुलाखती म्हणजे इतिहासाच्या आधारे वर्तमानाची केलेली भविष्यलक्ष्यी समीक्षा असते. ते वर्तमानाचे भाषांतर होत, भविष्याचे भाष्य केव्हा बनून जाते, हे लक्षातही येत नाही. म्हणून त्यांची मुलाखत घेणारे संवादक स्वाध्याय करून जात; पण मुलाखत घेताना त्यांच्या लक्षात यायचे की, आपली परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांच्या स्वानुभूत प्रज्ञेपुढे कुचकामी होती. तर्कतीर्थांनी आपल्या प्रत्येक मुलाखतीतून काही नवी दृष्टी दिली नाही, असे कधी झालेच नाही.
