सन १९२३ ते १९३० हा काळ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या जीवनातील धर्मसुधारणा व समाजसुधारणा कार्यातील सक्रियतेचा होता. धर्मग्रंथातील ग्राह्य-अग्राह्य यांचा विवेकी विचार करून त्यांच्याबद्दलचा अभिप्राय आचारधर्म बनविला पाहिजे, या मताचे तर्कतीर्थ होते.

भारतीय प्राचीन धर्मसाहित्य वेद, ब्राह्मण ग्रंथ, अरण्यक, उपनिषद, श्रुती, स्मृतिग्रंथ इत्यादी रूपांत आढळते. पैकी स्मृतिग्रंथ धर्मशास्त्राचे विवरण करतात असे दिसून येते. या परंपरेत लिहिलेला स्मृतिग्रंथ म्हणजे मनुस्मृती होय. हा ग्रंथ वर्णाश्रम समर्थक असल्याने वादग्रस्त ठरला आहे. ग्रंथात १२ अध्याय आहेत. त्यातील श्लोक संख्या २६८४ इतकी आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या-तिसऱ्या शतकात हा ग्रंथ रचला गेल्याचे मानले जाते. याच्या पहिल्या अध्यायात सृष्टी निर्मिती, चार युगे, चार वर्ण, त्यांची कामे यांचे वर्णन असून त्यात ब्राह्मण वर्गाचे वर्चस्व विशद केले आहे. दुसऱ्या अध्यायात ब्रह्मचर्य, गुरुसेवा इत्यादी संस्कारांचे विवेचन आहे. तिसऱ्या अध्यायात विवाह प्रकार, विवाह विधी, श्राद्ध चर्चा आहे. चौथा अध्याय हा गृहस्थाश्रम, भक्ष्याभक्ष, नरक प्रकार यांचे वर्णन करतो, तर पाचवा स्त्रीधर्म शुद्धाशुद्ध विवेचनास समर्पित आहे. सहाव्या अध्यायात चार आश्चर्ये सांगितली आहेत. सातव्या अध्यायात राजधर्माचे प्रतिपादन आढळते. आठव्या अध्यायात व्यवहार, साक्ष, गुन्हे, न्यायदान पद्धतींवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. नवव्या अध्यायात स्त्रीरक्षण, स्त्रीस्वभाव, अपराधांसाठी दंड वर्णन आहे. दहावा अध्याय वर्णसंस्कारांची मीमांसा करतो. अकराव्या अध्यायात पाप-पुण्य चर्चा आहे. बारावा अध्याय त्रिगुण वर्णन, वेद प्रशंसा करतो.

असे सांगितले जाते की, भारतात बौद्ध धर्माचे वर्चस्व निर्माण झाल्यानंतर साहजिकच ब्राह्मणांच्या सामाजिक वर्चस्वास उतरती काळा आली, त्या काळात समाजातील ब्राह्मण्य माहात्म्य अधोरेखित करून त्याचे पुनरुज्जीवन व सक्षमीकरणाच्या हेतूने मनुस्मृती लिहिली गेली. यावर पहिला हल्ला महात्मा फुले यांनी करून त्यातील विषमतेवर बोट ठेवत विरोध केला. नंतर २५ डिसेंबर १९२७ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले. मनुस्मृती दहनाच्या वेळी तर्कतीर्थ महाडला उपस्थित होते. त्यांनी मनुस्मृतिदहनानंतर तिची राख पुडीत बांधून घेऊन नंतर मुंबईत डॉ. आंबेडकर यांची भेट घेऊन ती राख स्वत:च्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कपाळी लावून चर्चा केल्याची माहिती डॉ. आंबेडकरांच्या आयुष्याचे अभ्यासक रत्नाकर गणवीर आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पत्रव्यवहारात आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन, त्यातील चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या समर्थनाविरोधात केले होते. त्यांची अशी धारणा होती की, मनुस्मृतीतील विवेचन हे जातिव्यवस्थेस प्रोत्साहन देणारे आहे, तद्वतच जातिव्यवस्थेतील उच्च-नीचता समर्थक असल्याने दलितांचा माणूस म्हणून जगण्याचा हक्क हिरावून घेणाऱ्या अनेक गोष्टी त्यात आहेत. जातिभेदाची बीजे समाजात रुजविण्याचे कार्य मनुस्मृती करत असल्याने तिचे दहन करण्यात आले होते. या संदर्भातील आपली भूमिका डॉ. आंबेडकर यांनी ‘फिलॉसॉफी ऑफ हिंदूइझम’ आणि ‘हू वेअर द शुद्राज’, ‘अनाहायलेशन ऑफ दी कास्ट’सारख्या ग्रंथांमधून विशद केली आहे.

तर्कतीर्थांचे म्हणणे उपरोक्त पत्रव्यवहारातून स्पष्ट होते. त्यांनी त्यात म्हटले आहे की, ‘मनुस्मृती’ हा ग्रंथ प्राचीन भारतीय सामाजिक व धार्मिक जीवन दाखवितो. ती समाजरचना विषमतेच्या व पिळवणुकीच्या तत्त्वावर आधारलेली होती, म्हणून संस्थेचे नैतिक मूल्य ध्यानात घेऊन आज जी भारतीय समाजरचना करायची आहे, त्यास मनुस्मृतीचा विरोध आहे. म्हणून मनुस्मृती जाळणे, हे लाक्षणिक अर्थाने योग्य आहे. परंतु, भारतीय प्राचीन समाजाच्या धार्मिक, सामाजिक, आर्थिक जीवनाचा इतिहास समजण्याचे ते एक उत्कृष्ट साधन आहे, म्हणून त्याची उपयुक्तता कायम मानली पाहिजे.’ असे असले तरी मनुस्मृतीतील अंतर्विरोध कोणीच नाकारू शकत नाही. तो तर्कतीर्थांनीही कधी नाकारलेला नाही. ‘हिंदुधर्माची समीक्षा’ आणि ‘वैदिक संस्कृतीचा विकास’सारखे ग्रंथ लिहून तर्कतीर्थांनी धर्म आणि संस्कृतीविषयक आपली पुरोगामी व प्रागतिक भूमिका वारंवार विशद केली आहे. ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय’मधील अनेक भाषणे, लेख, मुलाखती, प्रबंधलेखन यातूनही हे वेळोवेळी आणि वारंवार प्रत्ययास येते. जिज्ञासूंनी ते मुळातून वाचावेत. त्याबाबत विचार करताना ही मते शतकापूर्वीची होती याचेही भान वाचकांनी ठेवणे आवश्यक आहे.

drsklawate@gmail.com

Story img Loader