‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय’ प्रकल्पातील १७ वा खंड हा ‘स्मृतिगौरव’ म्हणून संपादित केला आहे. यात १९३७ ते २०२३पर्यंतच्या ८६ वर्षांच्या कालखंडात सुमारे ९० विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी स्मृती, गौरवपर लेख लिहिले आहेत. या लेख शीर्षकांमधील तर्कतीर्थ व्यक्तिमत्त्वाची नुसती गुणवैशिष्ट्ये न्याहाळली, तरी हा माणूस दशांगुळे वर उरतोच. महाराष्ट्राचा सत्पुत्र, उपेक्षितांचा पुढारी, बुद्धिवादी वेदांती, शतकाचा साक्षीदार, प्रकांडपंडित, धर्मसमीक्षक, संस्कृती भाष्यकार, प्रबोधनपुरुष, समाजसुधारक, इहवादी ऋषी, ज्ञानभास्कर, चालता-बोलता ज्ञानकोश अशी विशेषणे बहाल करताना मान्यवर थकत नाहीत. कारण सुमारे सात दशकांच्या सक्रिय जीवनात या माणसाने पायाला भिंगरी लावत जग पालथे घातले! त्यांच्या वक्तृत्वाच्या मोहिनीने विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील महाराष्ट्र एकीकडे फिदा होत होता, तर दुसरीकडे प्रबुद्ध.

अनंत विष्णू पाटणकरांनी १९५३मध्ये ‘मी व माझे वक्तृत्व’ शीर्षक ग्रंथ संपादित केला आहे. यातील तर्कतीर्थांची मुलाखत वाचताना उमजत जाते की, तर्कतीर्थांनी पहिले जाहीर भाषण केले १९२४मध्ये. पश्चिम खान्देशातील सोनगीर (जि. धुळे) येथे संपन्न पंडित परिषदेत अखिल भारतातील सर्व जगद्गुरू (शंकराचार्य), धर्ममार्तंड, संस्कृत पंडित इत्यादी सनातनी पीठाचार्यांसमोर ‘हिंदू धर्म परिवर्तनशील आहे’ असे बजावणाऱ्या एका तरुण संस्कृत पंडिताने (वय वर्षे अवघे २३) धीटाईने केलेले भाषण उपस्थित सर्वांना निरुत्तर नि अवाक करणारे ठरले होते! सन १९५३पर्यंतच्या तीन दशकांत सहस्रा भाषणे देणारा हा प्रगल्भ वक्ता; त्याने नंतरच्या चार दशकांत किती भाषणे दिली असतील, त्याची नोंद नाही. परंतु समग्र वाङ्मयात पूर्ण लिखित संहितांच्या रूपात उपलब्ध भाषणे केवळ शंभर-सव्वाशे मिळणे, याचे कारण त्यांच्यातील बोलण्याचा अमाप उत्साह आणि तितकाच लेखनाचा आळसही!

वक्ता म्हणून तर्कतीर्थ तयारी करून बोलत. पूर्वविचार नि स्वाध्याय असायचा. वक्तृत्वात व्यासंगी वाचन, चिंतन आपसूक झरत राहायचं. चपखल दृष्टांत देण्याची हातोटी होती. सनातन संदर्भ घेऊन, मिथक, चरित्र, कथा, आख्यायिकांच्या आधारे त्यांचे आधुनिक परिशीलन करण्याचे कसब हे त्यांच्यातील वक्त्याचे अंगभूत कौशल्य होते. याच वक्तृत्वाच्या कौशल्यावर या माणसाने कायदेभंगाच्या चळवळीत बागलाण (कळवण, मांगीतुंगी, नामपूर) प्रांतातील हजारो आदिवासींचे संघटन करीत केलेल्या जंगल सत्याग्रहात ब्रिटिशांची झोप मोडली होती. वक्तृत्वात तर्क नि तत्त्वज्ञानाचे बेमालूम मिश्रण श्रोत्यांना हमखास आपले करीत असे. वादविवादाची सवय त्यांना वक्ता बनवत गेली. वैचारिक प्रबुद्धता येत गेली, तसे त्यांचे वक्तृत्व फुलत गेले ‘सरमन्स माऊंटन’सारखे! विषय श्रोत्यांवर बिंबविण्याची कला भाषणांच्या रियाजातून समृद्ध होत गेली. कोटी, टीका यांना फाटा देत गंभीर विवेचन म्हणजे त्यांचे भाषण; पण प्रसंगी आचार्य अत्रेंसारख्या पट्टीच्या वक्त्यासही प्रतिवाद करीत निरुत्तर करणारे ठरले.

चांगला वक्ता इतरांच्या वक्तृत्वगुणांचा अभ्यासक असतो. तर्कतीर्थांनी पाटणकरांना दिलेल्या मुलाखतीत आपल्या समकालीन वक्त्यांच्या वक्तृत्वगुणांची नोंद करीत पुढील निरीक्षणे नोंदविली आहेत- १) आचार्य विनोबा भावे- उच्च भावुकता व प्रासादिकता, २) स्वातंत्र्यवीर सावरकर- प्रतिभाशक्ती व ध्येयनिष्ठ स्वप्नशीलता, ३) बॅरिस्टर मुकुंदराव जयकर- ऐट व इंग्रजीचा झोकदारपणा, ४) प्रा. श्री. म. माटे-वेधक भाषा व विवेचकता, ५) महामहोपाध्याय द. वा. पोतदार- स्वाभाविक वाचाशक्ती (वाचासिद्धी), पुष्कळ अवलोकन (निरीक्षण), ६) आचार्य दादा धर्माधिकारी- ध्येयवादीपणा व खोचक विनोदबुद्धी, ७) न. वि. तथा काकासाहेब गाडगीळ- समयसूचकता, विचारशीलता, कोटिक्रम-कुशलता, ८) प्रा. गोवर्धन पारीख- स्वाभाविक वाचाशक्ती व कोटिक्रम-चातुर्य, ९) आचार्य प्र. के. अत्रे- विनोदबुद्धी, उत्साह व भाषाचातुर्य, १०) यशवंतराव चव्हाण- मर्मज्ञता व समयज्ञता, ११) दिनकरशास्त्री कानडे- गांभीर्य व ओजस्विता, १२) श्रीपाद शंकर नवरे- कोटिक्रम व मुद्देसूदपणा. ज्या वक्त्यास इतर वक्त्यांच्या वक्तृत्वगुणांची पारख असते, तो आपले वक्तृत्व इतरेजनांपेक्षा हटके राहावे, यासाठी नित्य सजग नि सहज साधना करत राहतो.