विसाव्या शतकाची ती पहाट वेळ होती. दिवस होता २७ जानेवारी, १९०१. एका लक्ष्मणाने काळरेषा ओलांडत पृथ्वीवर पाऊल टेकले. तिथी होती चैत्र तृतीया अमृतसिद्धी योग चालून आलेला. लक्ष्मणाने पितृइच्छा शिरसावंद्या मानत वेदांती पंडित होण्याचे तेराव्या वर्षी ठरवले नि तत्कालीन दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाईस प्रयाण केले. तिथे प्रज्ञानंद स्वामींचे शिष्य शिरोमणी नारायणशास्त्री मराठे वेदशाळा चालवत. तशा तिथे अनेक वेदशाळा कार्यरत होत्या.

पण ही वेदशाळा राष्ट्रीय भावनेने प्रेरित शिष्य घडवी. म्हणून पिंपळनेरच्या बाळाजीपंतांनी आपल्या सुपुत्रास तिथे दाखल केले होते. त्यांचे स्वप्न होते, पुत्राने लोकमान्य टिळकांसमोर संस्कृत प्रवचन करावे. वेद, न्याय, व्याकरण, अलंकार पारंगत लक्ष्मणाने तर्कतीर्थ होण्याचे स्वप्न उराशी बाळगून विश्वनाथाच्या काशीस १९१८ ला प्रयाण केले. तिथे ते नवन्याय, तर्क पारंगत होऊन तर्कतीर्थ सिद्ध झाले. परत कसबे, वाई मुक्कामी येऊन वेदाध्यापन प्राज्ञपाठशाळेत गुरूंच्या मार्गदर्शनाखाली सुरू केले.

पण कोरड्या अध्यापनात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींचा जीव रमेना. त्यांनी धर्मसुधारणार्थ जीवन वेचायचा संकल्प केला. सन १९२३ ते १९३० या काळात हरप्रकारे प्रयत्न करूनही सनातनी धर्मपंडित शब्दप्रामाण्य काही केल्या सोडेनात म्हणून या पंडिताने शास्त्र संन्यास घेऊन शस्त्र संकल्प अंगीकारला! महात्मा गांधींनी प्रज्वलित केलेल्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या यज्ञकुंडात स्वत:च्या आयुष्याची समिधा करून या पंडिताने शस्त्रसंस्कार अंगीकारत स्वातंत्र्य देवतेची पूजा बांधली.

आदिवासी बंधू- भगिनींच्या मनात अमोघ वाणीने स्वातंत्र्य यज्ञाच्या ज्वाला धुमसत ठेवल्या. जल, जंगल, जमीन, आमचे इमान नि इनाम मानत ब्रिटिश साम्राज्यवादी वृत्तीच्या विरोधात उभे ठाकले. तुरुंगवास, सक्तमजुरी सोसली. नि मार्क्सवादाने प्रज्वलित मन नवमानवतावादी बनवले. वैज्ञानिक विचारधारा शिरोधार्य मानत सनातन धर्माजागी राष्ट्रधर्म श्रेष्ठ मानत वेदांना मानवी प्रश्न सोडवण्याचे साधन बनवून शब्द्रप्रमाण विचारांजागी बुद्धिप्रामाण्यवादी विवेकबुद्धी अंगीकारत सनातन विचारधारेस आधुनिक बनविण्याचा कृत संकल्प केला. त्याचमुळे मार्क्सवाद अपूर्ण वाटून पूर्ण मानवकल्याणाची पूजा बांधण्याचा प्रण करत नवी ज्ञानसाधना स्वातंत्र्योत्तर काळात आरंभली.

१९६० ला महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रुजताच राजकारणाचा त्याग करत स्वत:स ज्ञानमग्न योगी केले. शस्त्रसंपन्न, उन्नत अखंड, ज्ञानयज्ञाची कास धरली. विझलेल्या यज्ञकुंडाच्या राखेत सुवर्णांकित मुंगूस जन्मू शकतो तर न विझणाऱ्या ज्ञानयज्ञाच्या अग्निशलाका निरंतर पेटता पलिता बनून राहतील व माणसाचं जीवन स्वर्णांकित होईल याची काळजी प्राच्यविद्योस विश्वकल्याणाचे साधन बनवत आपल्या तर्कसमिधा वाहात ज्ञानयज्ञ विझू न देण्याचा कृतसंकल्प केला नि यज्ञ सुफळ संपूर्ण झाला.

२७ मे १९९४ रोजी जीवनाची इतिकर्तव्यता अमृतसिद्धी योग व्हावा म्हणून इहलोकीचा अवतार समाप्त करत स्वर्गलोकातील चौसष्ट कला मानवी कल्याणाचे शास्त्र बनवले. पृथ्वी आणि आकाश आता शस्त्र बनले ते केवळ विकास शस्त्रपूजेजागी अखंड ज्ञानसाधना योग सिद्धीस नेला तो तर्क, विवेक शाश्वत राहावा म्हणून! आज शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षाची सांगता होण्याच्या पूर्व मासांती तर्कविचार- तर्कतीर्थविचार हा चिरंतन, शाश्वत विकास मंत्र व्हावा म्हणून निरोपाचा विडा घेत हे सदर सुफळ संपूर्ण करत नव्या ज्ञानसाधनेचा संकल्प आम्ही करीत आहोत. या वर्षातील जनजागरण हे एकविसाव्या शतकाचे संशोधन साधन ठरेल असे उपक्रम भविष्यकाळी हाती घेतले जातील.

एकदा प्रज्वलित झालेला हा ज्ञानयज्ञ भविष्यात विझू नये म्हणून तर नित्य नव्या समिधांची आहुती पडत रहावी असा प्रयत्न राहील. बुद्ध, सचित्र चरित्र पट, तर्कतीर्थ समग्र साहित्याचे देश- विदेश भाषा – लिपीत रूपांतर समग्र तर्कतीर्थ साहित्याची नवी समीक्षा, पुनर्वाचन व विचार पुनरुज्जीवनाद्वारे तर्कतीर्थ जीवनकार्याची आवर्तने नित्य उठत राहतील असे भविष्यकाळात पाहिले जाईल. त्यासाठी ‘लोकसत्ता’चे हे वार्षिक विचारपीठ आज अस्तंगत झाले तरी हा सूर्यास्त नव्या सूर्योदयाची पहाट बनून उदयमान होत राहील. हे ज्ञानयज्ञाचे कुंड विझणार नाही अशा नित्य नव्या समिधांची सातत्यपूर्ण आहुती योजना म्हणजे शाश्वत ज्ञानोदय होय.

(सदर समाप्त)

drsklawate@gmail.com