अलियापूर (तमिळनाडू) येथे २३ नोव्हेंबर, १९५६ रोजी रेल्वे अपघातात दीडशेहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा. पक्ष मजबुतीसाठी ऑगस्ट, १९६३ मध्ये केंद्रीय मंत्रीपदाचा स्वेच्छात्याग करून पक्ष संघटनकार्य स्वीकारले. महंमद पैगंबरांच्या पवित्र केसाच्या (हजरत बाल) चोरीनंतर त्वरित छडा लावून देशाच्या एकात्मतेचे रक्षण. परदेश प्रवासातही जाकिटाच्या आत फाटका सदरा वापरून काटकसरीचे आदर्श जीवन अंगीकारणारा देशाचा एकमेव पंतप्रधान. १९६५ च्या भारत-पाक युद्धात देशास उन्मादी होऊ न देता ‘जय जवान, जय किसान’ संदेश देऊन देशासाठी समर्पित होण्यास जनतेस भाग पाडणारा पंतप्रधान.
अशा लालबहादूर शास्त्रींचे निधन भारत-पाक शांती संवाद घडवून आणताना ११ जानेवारी, १९६६ रोजी ताश्कंद, उझबेकिस्तान, रशियात झाल्यावर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी त्यांच्या जीवन व कार्याचा धावता आढावा घेणारा स्मृतिलेख फेब्रुवारी, १९६६च्या ‘नवभारत’ मासिकात प्रकाशित केला होता. लक्ष्मणशास्त्री जोशी ‘तर्कतीर्थ’ म्हणून उदयाला आले ते काशी येथे तर्कतीर्थ पदवीचे संपादन करून. लालबहादूर वर्माचे ‘लालबहादूर शास्त्री’ होणे, यातही त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची ‘शास्त्री’ पदवी संपादन केली हे कारण होते, हे किती जणांना माहीत आहे?
प्रस्तुत स्मृतिलेखात तर्कतीर्थांनी स्पष्ट केले आहे की, लालबहादूर शास्त्री हे महात्मा गांधी आचार-विचारांचे सच्चे वारसदार होत. महात्मा गाधींनी असहकार आंदोलन सुरू केले, तेव्हा लालबहादूर अवघे १७ वर्षांचे होते. या आंदोलनात त्यांनाही तुरुंगवास भोगावा लागला. महाविद्यालयीन शिक्षणावर बहिष्कार घालत ते स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय झाले. त्या वेळी बनारस हिंदू विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक बाबू भगवानदास, पुरुषोत्तमदास टंडन, डॉ. संपूर्णानंद, आचार्य कृपलानी, जयप्रकाश नारायण प्रभृती मान्यवरांचा सहवास लाभला व लालबहादूर शास्त्री पूर्ण गांधीवादी काँग्रेस नेते झाले.
१९२६ मध्ये लालबहादूर शास्त्री लाला लजपत राय संस्थापित ‘सर्व्हंट्स ऑफ दि पीपल्स सोसायटी’चे सदस्य झाले. १९२१ ते १९४५ अशी सलग २५ वर्षे ते स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय राहिले. १९३५ ते १९३८ ते उत्तर प्रदेश प्रांतिक काँग्रेसचे सचिव होते. ते १९५१ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव झाले. १९५६-५७ची सार्वजनिक निवडणूक काँग्रेसने शास्त्रीजींच्या कुशल नेतृत्वात जिंकली. १९६० मध्ये केरळ काँग्रेसमधील मतभेद मिटविण्यात शास्त्रीजींचे मुत्सद्दीपण कारणीभूत ठरले होते. १९४६ मध्ये पंडित गोविंदवल्लभ पंतांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश मंत्रिमंडळात ते संसदीय सचिव म्हणून नियुक्त झाले. १९५२ मध्ये उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर निवडून गेले. रेल्वेमंत्री झाले. १९५७ ला अलाहाबद (पश्चिम) मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. १९६३ च्या नेपाळ-भारत सामंजस्य संवादात शास्त्रीजींची शिष्टाई सहाय्यभूत ठरली होती.
जवाहरलाल नेहरूंचे २७ मे, १९६४ रोजी निधन झाल्यावर १६ जून, १९६४ रोजी त्यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारली. पंतप्रधान म्हणून त्यांना अवघे दीड वर्ष कार्य करता आले आणि ते ११ जानेवारी, १९६६ रोजी निवर्तले. नेहरूंची पोकळी शास्त्रीजींनी अल्पावधीत भरून काढली. नेहरूंनंतर कोण, याचे सकारात्मक प्रत्यंतर लोकशाहीने दिले होते. लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाल्यावर मँचेस्टरहून (इंग्लंड) प्रसिद्ध होणाऱ्या दैनिक ‘द गार्डियन’ने ‘अत्यंत अल्पावधीत परिणामकारक ठरलेला प्रभावी पंतप्रधान’ म्हणून त्यांची प्रशंसा केली होती. २ ऑक्टोबर, १९०४ रोजी जन्मलेला हा ‘आचरणीय गांधी’. शिक्षकाचा मुलगा असणे हा त्यांचा संस्कारवारसा होता. पत्नी ललिता देवी यांनी ‘मेरे पति, मेरे देवता’ शीर्षकाचे अपवादात्मक वस्तुनिष्ठ आत्मचरित्र लिहिले आहे. त्यातून कळणारे शास्त्रीजी राजकीय चरित्रापेक्षा ‘मूल्यवान चरित्र’ ठरतात आणि आदर्शाचे महामेरू म्हणून पुढे येतात. ज्याच्या राजरथाचे चाक भूमीस स्पर्श करून शकले नाही, असा हा आधुनिक धर्मराज होता. परवा ‘ऑपरेशन सिंदूर’ घडले. त्या वेळी आपणास कुणालाच ना १९६५ चे भारत-पाक युद्ध आठवले, ना लालबहादूर शास्त्रींचे स्मरण झाले. सामूहिक, सामाजिक स्मरणशक्ती नेहमीच क्षीण, क्षणिक आणि अल्पायू असते हेच खरे!
– डॉ. सुनीलकुमार लवटे
drsklawate@gmail.com