Lal killa bharat Jodo BJP Rahul Gandhi congress political benefit ysh 95 | Loksatta

लालकिल्ला : ‘भारत जोडो’चा फायदा भाजपला होईल?

काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेला दक्षिणेमध्ये लोकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे, हे मान्य केले पाहिजे.

लालकिल्ला : ‘भारत जोडो’चा फायदा भाजपला होईल?
लालकिल्ला : ‘भारत जोडो’चा फायदा भाजपला होईल?

महेश सरलष्कर

मिळतील ते मुद्दे काढून भाजप ‘भारत जोडो’ यात्रेला आणि राहुल गांधी यांना विरोध करत असल्याचे दर्शवत असला तरी, ही यात्रा यशस्वी झाली तर त्याचा राजकीय लाभ कसा मिळवायचा याची गणिते भाजपने आखलीही असतील!

काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेला दक्षिणेमध्ये लोकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे, हे मान्य केले पाहिजे. काँग्रेसने कितीही नाकारले तरी, या यात्रेचे नेतृत्व राहुल गांधी हेच करत आहेत. मध्यंतरी एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले की, मी अन्य यात्रेकरूंप्रमाणे पदयात्रा करत आहे, माझ्या नेतृत्वाखाली ही यात्रा चाललेली नाही. पण, लोक अन्य ११७ यात्रेकरूंना भेटायला, त्यांच्याशी चर्चा करायला येत नाहीत वा काँग्रेसचे नेतेही या यात्रेकरूंसाठी पदयात्रेत सहभागी होत नाहीत. ही यात्रा काँग्रेसची असून ती राहुल गांधी यांच्याच नेतृत्वाखाली पुढे निघालेली आहे. भारत भ्रमणाच्या यात्रा काढल्या जातात, तेव्हा आयोजकांना (राजकीय पक्षांना) त्याचा राजकीय लाभ मिळणे अपेक्षित असते. ‘भारत जोडो’ यात्रेतून काँग्रेसला राज्या-राज्यांतील आगामी विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीत जागांच्या वा मतांच्या टक्केवारीतील वाढीचा फायदा होणे अपेक्षित आहे. त्यामुळे या यात्रेचा भाजपला लाभ होईल का, असा प्रश्न विचारणे कदाचित विचित्र वाटू शकेल. पण राजकारणामध्ये कुठल्या घडामोडींचा वा घटकाचा कोणाला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष लाभ होईल हे सांगता येत नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत पुलवामामधील दहशवादी हल्ला झाला नसता तर, खरोखरच राष्ट्रवादाचे इतके भरते आले असते का, आणि भाजपला प्रचंड यश मिळाले असते का, यासारखे प्रश्न अन्यथा विचारले गेले नसते!

काँग्रेसमध्ये एकाच वेळी ‘भारत जोडो’ यात्रा सुरू आहे, राहुल गांधी यांच्याकडे लोक राजकीय नेता म्हणून आशेने पाहात असल्याचे दिसू लागले आहे, आणि त्याच वेळी काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्ष पदासाठी निवडणूकही होत आहे. या निवडणुकीत राहुल गांधी हे उमेदवार असणार नाहीत. त्यामुळे दोन दशकांच्या कालावधीनंतर काँग्रेसला गांधीतर पक्षाध्यक्ष मिळेल. पक्षाध्यक्ष अशोक गेहलोत होतील वा शशी थरूर, हा फार महत्त्वाचा प्रश्न नाही. पक्षाध्यक्ष कोणीही असो त्यांना गांधी कुटुंबाच्या सल्ल्याशिवाय अंतिम निर्णय घेता येणार नाहीत. असे असले तरी, राहुल गांधी हे पुन्हा पक्षाध्यक्ष होत नाहीत, ही बाब काँग्रेसच्या संघटनात्मक मजबुतीसाठी योग्यच म्हटली पाहिजे. भाजपमध्येही खरी सत्ता मोदी-शहा या दोघांच्या ताब्यात आहे, हे भाजपमधील प्रत्येकाला माहिती आहे. म्हणजे भाजपचे पक्षाध्यक्षही नामधारीच. राहुल गांधी पक्षाध्यक्ष होणार नसल्यामुळे काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप भाजपला करता येणार नाही. काँग्रेसचे पक्षाध्यक्षपद गांधीतर नेत्याकडे असेल व तो पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी स्वतंत्र प्रयत्न करू शकेल. बंडखोर नेत्यांनी पक्षाध्यक्ष पदासंदर्भात घेतलेल्या आक्षेपांनाही उत्तर दिले जाईल. कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध असलेला पूर्णवेळ पक्षाध्यक्ष काँग्रेसला मिळेल. राहुल गांधी भेटत नाहीत तर, निदान पक्षाध्यक्षांकडे तरी कार्यकर्त्यांना थेट संपर्क करता येईल, तिथे त्यांना गाऱ्हाणी मांडता येतील. पक्ष चालवण्याची प्रत्यक्ष जबाबदारी राहुल गांधींच्या खांद्यावर नसल्याने ते ‘भारत जोडो’ यात्रेसारखे अनेक उपक्रम हाती घेऊन लोकांशी संवाद वाढवू शकतील. पण, त्यातून राहुल गांधींबाबत लोकांच्या आशा-आकांक्षा वाढू शकतील, त्यांच्याकडे पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणूनही पाहिले जाऊ शकते. ‘भारत जोडो’ यात्रा ही विरोधकांच्या एकजुटीसाठी नव्हे तर, काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी होत असल्याचे पक्षाचे माध्यम विभागप्रमुख जयराम रमेश यांनी स्पष्ट केले आहे. हीच मंडळी राहुल गांधींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी राजकीय वातावरणनिर्मिती करू शकतात. भाजप याच एका क्षणाची वाट पाहात असल्यास नवल नाही!

‘भारत जोडो’ यात्रेतून राहुल गांधी यांना माध्यमांमधूनही प्रसिद्धी दिली जात आहे. टीशर्ट वगैरे मिळतील ते मुद्दे काढून भाजप ‘भारत जोडो’ यात्रेला आणि राहुल गांधी यांना विरोध करत असल्याचे दर्शवत असला तरी, ही यात्रा यशस्वी झाली तर त्याचा राजकीय लाभ कसा मिळवायचा याची गणिते भाजपने आखलीही असतील!

भाजपला देशभर सुमारे ४०-४२ टक्के मते मिळतात. म्हणजे सुमारे ६० टक्के मते भाजपच्या विरोधात असतात. ही विरोधी मते विरोधी पक्षांची एकजूट नसल्याने विखुरली जातात. ही मते एकत्र झाली तर लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करणे फारसे अवघड नाही. विरोधकांचे महाआघाडी करण्याचे आत्तापर्यंत झालेले सर्व प्रयत्न फोल झाले आहेत. त्यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे विरोधी पक्षनेत्यांची पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा. आत्ता विरोधी पक्षनेते, ‘पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत वेळ येईल तेव्हा विचार करू’, असे म्हणत असले तरी, नितीशकुमार यांच्या झंझावाती भेटीगाठी फक्त भाजपचा पराभव करण्यासाठी होत नाहीत, त्यांना पंतप्रधान बनायचे आहे, ही भावना कुठेही लपत नाही. ‘भारत जोडो’ यात्रा जितकी यशस्वी होईल, तितकी काँग्रेसमध्ये ऊर्जा निर्माण होईल, संघटनाही ढवळून निघेल. राहुल गांधी हे पक्षातील सर्वोच्च नेते असल्याने तेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात, असा दावा काँग्रेसला करता येईल. मग, भाजपविरोधातील लढाई ही सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष अशी न राहता, मोदी विरुद्ध विरोधकांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणजेच राहुल गांधी अशी अध्यक्षीय होऊन जाईल. या अध्यक्षीय निवडणुकीत २०१९ मध्ये मोदींनी विरोधी पक्षांवर मात केली होतीच. २०२४ मध्येही कदाचित त्याची पुनरावृत्ती होऊ शकते.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘मोदींविरोधात आहेच कोण’, असा प्रश्न भाजप पुन्हा विचारेल. कदाचित भाजपकडूनच राहुल गांधींचे नाव चर्चेत आणले जाईल. विरोधी पक्षांना नको असेल वा आवडले नाही तरी लोकसभेची निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी होऊन जाईल. ‘भारत जोडो’ यात्रेचा अप्रत्यक्ष फायदा भाजप करून घेऊ शकतो. ‘भारत जोडो’ यात्रेतील कोणालाही अपेक्षित नसलेला हा संभाव्य धोका काँग्रेस आणि विरोधकांना लक्षात घ्यावा लागेल. मोदींविरोधात कोण, असा प्रश्न भाजपकडून उपस्थित होण्याआधीच काँग्रेसने भाजपला निरुत्तर केले तर, लोकसभेची निवडणूक भाजपसाठी मोठे आव्हान ठरेल! नितीशकुमार वा शरद पवार या नेत्यांनी, ‘काँग्रेसशिवाय विरोधकांची महाआघाडी होऊ शकत नाही’, हे स्पष्ट केले आहे. आता काँग्रेसनेही पंतप्रधानपदासंदर्भातील भूमिका विरोधकांसाठी स्पष्ट केली तर, गेल्या वेळी विरोधकाच्या एकजुटीमध्ये आलेल्या अडचणीवर मात करता येऊ शकेल. ‘भारत जोडो’ यात्रेला दक्षिणेत मिळणारा प्रतिसाद आणि लोकांचा उत्स्फूर्त सहभाग उत्तरेकडील राज्यांमध्ये कायम राहिला तर, काँग्रेसला भाजपविरोधातील थेट लढतींमध्ये लाभ होऊ शकतो. उत्तरेकडे लोकसभेच्या सुमारे दोनशे जागांवर भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होते. गेल्या वेळी या बहुतांश जागा भाजपने जिंकल्यामुळे प्रचंड यश मिळवून मोदी पुन्हा पंतप्रधान झाले. काँग्रेसने विरोधकांच्या महाआघाडीचे नेतृत्व करण्याचा खटाटोप न करता केवळ उत्तरेकडील दोनशे जागांवर लक्ष केंद्रित केले तर, विरोधकांच्या महाआघाडीला भाजपची घोडदौड रोखता येऊ शकेल. ‘भारत जोडो’ यात्रेच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबूत करणे हे मुख्य ध्येय असेल तर, काँग्रेसला मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, झारखंड, गुजरात या राज्यांमध्ये लोकसभेच्या अधिकाधिक जागा जिंकता आल्या पाहिजेत. लोकसभेच्या निवडणुकीनंतर कदाचित सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष म्हणून विरोधकांच्या महाआघाडीचे नेतृत्व काँग्रेसला करता येईल आणि कदाचित राहुल गांधी यांचे नावही अग्रभागी आणता येईल. पण, तोपर्यंत भाजपचा पराभव करणे हे सर्व विरोधकांचे एकमेव ध्येय ठरवून भाजपचा पंतप्रधानपदाचा मुद्दा निरर्थक करावा लागेल. हा संदेश विरोधकांपर्यंत काँग्रेसला पोहोचवता येऊ शकतो आणि तसे करताना ‘भारत जोडो’ यात्रेच्या यशाचे रूपांतर राजकीय लाभातही करता येऊ शकते. त्यातून भाजपला होणारा संभाव्य राजकीय फायदाही टाळता येऊ शकतो. ‘भारत जोडो’नंतर काँग्रेस आणि अन्य विरोधक लोकसभा निवडणुकीसाठी कशी तयारी करतील, या प्रश्नामध्ये ‘भारत जोडो’ यात्रेचा भाजपला लाभ होईल का, हाही प्रश्न दडलेला आहे.

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
साम्ययोग : ‘घामाच्या फुलां’चे फलित

संबंधित बातम्या

अन्वयार्थ : पायलट यांचा बोलविता धनी कोण ?
चाँदनी चौकातून : छोटं राज्य असलं तरी..
लोकमानस : फुकटेगिरीच्या दोन तऱ्हा..
लालकिल्ला : भाजपची गुजरातसाठी चाणाक्ष खेळी?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Monkeypox संदर्भात WHO ची मोठी घोषणा! आतापासून ‘हे’ असेल मंकीपॉक्सचं नवीन नाव, त्वरित वापरण्याचे केले आवाहन
‘पैठणी’ चित्रपटाचा ट्रेलर आता रुपेरी पडद्यावर; आनंद व्यक्त करत सायली संजीव म्हणाली…
“गरजेपेक्षा जास्त क्रिकेट…” संघांच्या व्यस्त वेळापत्रकावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधाराने व्यक्त केला संताप
मुंबई: रेल्वे गाड्यांवर दगडफेकीच्या घटनांमध्ये वाढ; मध्य-पश्चिम मुंबई उपनगरीय हद्दीत सर्वाधिक घटना
“वडिलांना झालेला कर्करोग आणि बारावीचा अभ्यास…” शरद पोंक्षेंच्या लेकीने सांगितला ‘तो’ प्रसंग