राष्ट्रीय स्तरावरील राजकारणामध्ये काही दखलपात्र घडामोडी घडताना दिसतात. त्यातून आमूलाग्र बदलाची अजून तरी शक्यता दिसत नाही. पण या घडामोडी होणे तसे अपेक्षित होते. त्याचा अंदाज दिल्लीत राजकारण करणार्यांना आलेला होता. या घडामोडी हाताळायच्या कशा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. एकमेकांशी जोडलेल्या तीन घडामोडींचा उल्लेख करता येईल. एक – पश्चिम बंगालच्या पराभवानंतर पहिल्यांदाच विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक होत आहे. दोन – मोदी सरकारला केंद्रात १२ वर्षे पूर्ण होत आहेत. तीन – मोदी सरकारच्या गैरकारभाराविरोधात, भ्रष्टाचाराविरोधात कॉक्रोच जनता पार्टी आंदोलन करत आहे.
दुसरी घडामोड ही मोदी सरकारच्या आणि भाजपच्या राजकारणाचे उत्सवीकरण आहे. भाजप आणि ‘एनडीए’तील घटक पक्षांचे सर्व मुख्यमंत्री मिळून दिल्लीत राजकीय आनंद साजरा करणार आहेत. या मध्यवर्ती घडामोडींच्या भोवती ‘इंडिया’ आघाडीचे आणि कॉक्रोच जनता पार्टीचे भविष्य फिरणार आहे.
केंद्रात एक तप सत्ता सांभाळून ठेवणे हे काम सोपे नाही. सत्तेवरील पकड सैल होऊ नये यासाठी काय काय करावे लागते आणि केले गेले हे लोकांनी पाहिलेले आहे. जे ऐकत नाहीत, त्यांना चाबकाचा धाक दाखवून गप्प करावे लागते, ज्यांना हेच सत्ताधारी बरे आहेत असे वाटते त्यांना काही तरी बक्षीस देत राहावे लागते. विद्यमान सत्ताधारी पक्षाने म्हणजे भाजपने या दोन्ही गोष्टी वारंवार केल्या आहेत, त्यात खंड पडू दिलेला नाही. बाकी, भ्रष्टाचाराची वगैरे मोकळीक दिलेली असू शकते. ती कोणतेही सरकार देत असते. या भ्रष्टाचाराच्या खेळातील खेळाडूंकडून आपल्या सत्तेला त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाते, तशी घेण्यात आली आहे. त्यामुळे बारा वर्षांत एकदाही भाजपला आपण केंद्रातील सत्तेतून बाहेर फेकले जाऊ अशी भीती निर्माण झाली नाही. कधी कधी अतिआत्मविश्वास घात करून जातो, तसे २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत झाले. पण भाजपवाले त्या धक्क्यातून सावरले, आता ते सत्तेची बारा वर्षे पूर्ण करणार आहेत. अशा वेळी उत्सव साजरा केला जाणार यात आश्चर्य वाटण्याजोगे काहीही नाही. पण, हा उत्सव भाजपमधील बदलाचीही सुरुवात असू शकते. या संभाव्य घडामोडींना इतक्यात वेग आलेला नाही. त्यामुळे त्याची दिशा कोणती असेल हे आत्ताच सांगता येत नाही. त्याकडे लक्ष द्यावे लागेल हे निश्चित.
भाजपचे हे उत्सवीकरण होत असताना लोकांच्या असंतोषाचा चेहरा म्हणून कॉक्रोच जनता पार्टी आंदोलनाच्या मैदानात उतरलेली आहे. ही पार्टी अजून पार्टीच आहे, त्याने आंदोलनाचे गंभीर रूप अजून तरी घेतलेले नाही. तिला दिल्लीमध्ये जंतर-मंतरवर निदर्शने करण्याची परवानगी केंद्राकडून मिळाली, तिथे लोकांची गर्दी जमली होती, अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला हे मान्य करावे लागेल. त्यामुळे या पार्टीकडे लक्ष वेधले गेले आहे. भाजपच्या बारा वर्षांच्या सत्तेनंतर असे एखादे आंदोलन, एखादी पार्टी रस्त्यावर उतरणे वगैरे घटना होत असतात. केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना वेळोवेळी आंदोलने झाली. पूर्वीच्या आंदोलनांमध्ये आणि आत्ताच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या असंतोषामध्ये फरक आहे. स्वातंत्र्यानंतर देशाचे राजकारण काँग्रेसविरोधी विचारांवर पुढे गेले. या काँग्रेसविरोधी विचारांमध्ये सगळेच होते. डावे-कम्युनिस्ट, समाजवादी, संघवाले-त्यांचे जनसंघ व भाजपवाले असा सगळा गोतावळा होता. या सगळ्यांचा म्हणून काही विचार नव्हता. ते फक्त काँग्रेसविरोधी होते. नाहीतर ‘जनता प्रयोग’ यशस्वी झाला असता. मुद्दा असा की, काँग्रेसच्या विरोधात आंदोलने झाली. काही तीव्र झाली, त्यातून काँग्रेसची सरकारे कोसळली. वैचारिक बैठक नसूनही सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना नेता केले गेले, त्यांच्या भोवती गोतावळा जमला. त्यांनी पूर्वीचेच काँग्रेसविरोधी राजकारण केले. कथित घोटाळे बाहेर काढले. या आंदोलनाने अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या कुठलीही वैचारिक बैठक नसलेल्या दुसर्या एका नेत्याला पुढे आणले, त्याने निवडणुकीचे राजकारण केले. दिल्लीत सत्ता मिळवली. भाजपने केंद्रात सत्ता मिळवली. काँग्रेसवाले स्वत:च्या पायावर दगड मारून घेतात असे म्हटले जाते. ही आंदोलने म्हणजे त्याचाच प्रकार होता. हीच आंदोलने भाजपच्या विरोधात झाली असती तर ‘शहरी नक्षल’ म्हणून बदनामी करून अण्णा हजारे- अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या तमाम समर्थकांना तुरुंगात टाकले असते. म्हणूनच कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन किती पुढे जाईल याबाबत उत्सुकता आहे. या पार्टीतील लोक ‘आप’चे समर्थक होते, ते अण्णा हजारेंच्या आंदोलनातून आले आहेत. त्या वेळीही केंद्रातील सत्ताधार्यांविरोधात लोकांचा संताप होता, त्यांच्याविरोधात आंदोलन झाले पाहिजे असे लोकांना वाटत होते. ते उभे राहिल्यावर लोकांनी रामलीला मैदानावर गर्दी केली. आत्ताही मोदी सरकारविरोधात संताप असेल आणि त्याविरोधात कोणी आंदोलन करणार असेल तर लोकांना हवे असेल. त्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी हे माध्यम असू शकते. बाकी आत्ता या पार्टीबद्दल काही सांगण्याजोगे नाही. ही पार्टी लोकांच्या अपेक्षा किती पूर्ण करते यावर आंदोलनाचे भवितव्य ठरेल. या पार्टीला खर्या विरोधकांनी बळ दिले तर काय होईल हे पाहिले पाहिजे. ही पार्टी स्वत:हून काही करू शकेल असे नाही. या पार्टीला कोणी तरी आधार द्यावा लागेल. अण्णा आंदोलनाला संघाने ताकद दिली होती. तशी ताकद कॉक्रोच जनता पार्टीच्या मागे कोणी उभी करेल का, हा मुद्दा महत्त्वाचा आहे.
विरोधी पक्षीय आघाडी दखल घेईल?
या पार्श्वभूमीवर, ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीकडे आणि विरोधकांच्या पुढच्या वाटचालीकडे पाहता येऊ शकते. ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांना पुन्हा एकदा ऐक्याचे प्रयत्न करावे लागतील. ‘द्रमुक’ आणि ‘माकप’ हे दोन पक्ष काँग्रेसवर चिडलेले आहेत. तमिळनाडूमध्ये काँग्रेसने ‘द्रमुक’ला सोडून ‘टीव्हीके’शी आघाडी केल्यामुळे आपला विश्वासघात झाला असे ‘द्रमुक’ला वाटते. केरळमध्ये निवडणुकीत काँग्रेसने ‘माकप’वर आरोप केले होते, त्यामुळे हा पक्ष वैतागलेला आहे. तृणमूल काँग्रेसला स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. ‘इंडिया’ आघाडीमध्ये हे सगळे मतभेद दिसत असले तरी, ही आघाडी काँग्रेस भोवतीच फिरेल आणि काँग्रेसचे नेतृत्व इतर घटक पक्षांना मान्य करावेच लागेल. ममता बॅनर्जींकडे आता सत्ता नाही, त्यांना लोकसभेत खासदार होण्यासाठी वेगळी धडपड करावी लागत आहे. सप वगैरे पक्षांना उत्तर प्रदेशचे राजकारण अधिक महत्त्वाचे आहे. तिथे पुढच्या वर्षी विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे ‘इंडिया’ आघाडीमध्ये कितीही विसंगती असल्या आणि मतभेद असले तरी काँग्रेस काय करेल हेच महत्त्वाचे आहे. कॉक्रोच जनता पार्टीबद्दल काँग्रेसने मतप्रदर्शन केलेले नाही किंवा ठोस भूमिका घेतलेली नाही. अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर ‘आप’ची निर्मिती झाली आणि ती काँग्रेसलाच मारक ठरली. या कॉक्रोच जनता पार्टीतून दुसरा ‘आप’ जन्माला येऊ नये याची दक्षता काँग्रेसला पहिल्यापासून घ्यावी लागेल. नाही तर दुसरा ‘आप’ भाजपसाठी अप्रत्यक्ष फायद्याचा ठरण्याची धोका असू शकतो. वैचारिक आधार नसलेले अनेक लोक अण्णांच्या आंदोलनाकडे आकृष्ट झाले होते. तसेच आत्ताही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातून पुन्हा काँग्रेसविरोधी राजकारणाला गती मिळू शकेल. कॉक्रोच जनता पार्टी ही काँग्रेसच्या राजकारणाला नख लावणार नाही याची रणनीती काँग्रेसने आखली पाहिजे. खरेतर ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचे काय करायचे याचा निर्णय घेणे गरजेचे आहे.
भाजप आत्ता कोणत्या दिशेने चालला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. लोकांमधून असंतोष उसळू शकतो याचा अंदाज भाजपला आलेला आहे. अशा असंतोषातून काँग्रेसला सरकारे गमवावी लागली. तसे आपल्याबाबतीत होऊ नये याची काळजी भाजप घेताना दिसतो. तमिळनाडूमध्ये अण्णामलाई यांना भाजपने मोकळे केले आहे. हे अण्णामलाई आपला राजकीय पक्ष काढून वा ‘एनजीओ’ स्टाइलने सामाजिक काम करत राहतील. अण्णामलाई हे भाजपचेच आहेत, त्यांना संघाचे पाठबळ असू शकते. तमिळनाडूमध्ये भाजप या हिंदुत्ववादी पक्षाला थेट राजकारण करता येणार नाही. विजय आणि ‘टीव्हीके’ यांच्याविरोधातील जनमत हळुहळू तयार होऊ लागेल मग, ते आपल्याकडे वळण्याचा प्रयत्न अण्णामलाई करू शकतील. जे काम भाजपला करता येत नाही ते अण्णामलाई करतील. जिथे जिथे भाजप सरकारविरोधात असंतोष निर्माण होईल तिथे तिथे असे ‘अण्णामलाई’ निर्माण होण्याची शक्यता आहे. केंद्रीय स्तरावर कॉक्रोच जनता पार्टीचे भाजपकडून अपहरण होण्याआधीच काँग्रेसने हालचाली केल्या पाहिजेत. अण्णा आंदोलनाला किंवा इंदिरा गांधींविरोधातील आंदोलनाला संघाने आधार दिला. तेच काम कदाचित काँग्रेसला करावे लागेल. कॉक्रोच जनता पार्टीला काँग्रेसने आतून बळ दिले तर हे आंदोलन काँग्रेसच्या ताब्यात येईल. आत्ता कदाचित काँग्रेस वा ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्ष भाजपविरोधात थेट लढू शकत नाहीत. ‘ईडी’- ‘सीबीआय’पासून अनेक गोष्टी आड येऊ शकतात. पण, भाजप ‘अण्णामलाई’ प्रयोग करत असताना काँग्रेसनेही त्याच मार्गाने प्रत्युत्तर दिले पाहिजे. कॉक्रोच जनता पार्टीला कोणता वैचारिक आधार आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही. संविधान आणि डॉ. आंबेडकरांचे नाव या पार्टीच्या लोकांनी घेतलेले आहे. या दोन्ही प्रतिमांना काँग्रेसचा विरोध असण्याचे कारण नाही. कॉक्रोच जनता पार्टी भाजपविरोधात टोकाची लढाई लढू शकेल का, हे स्पष्ट झालेले नाही. त्यांचे आंदोलन प्रेशर कुकरची शिट्टी ठरली तर त्याचा फायदा भाजपलाच होईल. काँग्रेसला हे ताजे आंदोलन देशाच्या आगामी राजकारणासाठी वापरून घेता येऊ शकेल. तसे करण्यात गैर काय आहे? ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीची तयारी करावी लागेल. त्यासाठी एखाद्या आंदोलनावर स्वार होता आले तर चुकीचे ठरणार नाही.
