भाजपला विरोध करणार्‍या सर्वांना ‘दिमागी नक्षल’ ठरवले जात आहे. त्यांची वाटचाल रोखण्यासाठी धर्मांध समूहांना रस्त्यावर उतरवण्याशिवाय भाजपकडे पर्याय नाही. त्यामुळे यापुढे धर्मांध समूह अधिकाधिक प्रमाणात रस्त्यावर उतरलेले दिसतील, ते सनातनी विचारांना विरोध करणार्‍यांविरोधात आक्रमक होतील, मात्र त्यांना कोणीही अडवणार नाही…

केंद्र सरकारच्या एका मंत्र्याने एका खासगी चर्चेत मतप्रदर्शन करताना, भाजप आणि केंद्र सरकारचे प्रमुख लक्ष्य फक्त विकास आहे, ते आम्ही साध्य करतो की नाही हे पाहा. तुम्ही समाजामध्ये गोंधळ निर्माण करणार्‍या ‘फ्रिंज एलिमेंट’कडे पाहून आमच्या पक्षाचे आणि सरकारचे विश्लेषण करू नका किंवा त्याबद्दल धारणा बनवू नका, असे सांगितले होते. या मंत्र्याचे म्हणणे होते की, ९५ टक्के गोष्टी आम्ही चांगल्याच करतो. पण, पाच टक्के गोष्टी ‘फ्रिंज एलिमेंट’मुळे बिघडतात. आमच्या दूरगामी लक्ष्यामध्ये ‘फ्रिंज एलिमेंट’ला आम्ही महत्त्व देत नाही… या मंत्र्याचा सगळा युक्तिवाद निसरड्या पायरीवरून केला जात होता हे त्या वेळीही समजत होते. आता स्वतंत्र भारद्वाज नावाच्या उच्चवर्णीय तरुणाचा उद्दामपणा, त्याविषयी समाजमाध्यमांवरून रान उठल्यानंतर त्याला झालेली अटक आणि दिवसभराची कोठडी, यातून ही निसरडी वाट अधिकच स्पष्ट होते.  इथे ‘फ्रिंज एलिमेंट’ म्हणजे अतिरेकी विचारांचा गट. भाजप, विद्यमान केंद्र सरकार आणि हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून हा अतिरेकी गट म्हणजे धर्मांध समूह. हा धर्मांध समूह गेल्या १२ वर्षांत हळूहळू मोठा होत गेला आहे, या गटाचे प्रतिनिधित्व भारद्वाज नावाचा अविवेकी तरुण करतो. अशा उद्दामांची गर्दी देशभर पसरलेली आहे. भारद्वाजने दिल्लीमध्ये जंतर-मंतरवर येऊन गोंधळ घातला आणि मारहाण केली. तोच प्रकार पुण्यामध्ये गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाला विरोध करणार्‍या विद्यानंद बापट यांना मारणार्‍या तरुणाने केला. भारद्वाज आणि पुण्याचा गुंड प्रवृत्तीचा तरुण यांची मानसिकता एकच आहे. ते धर्मांध समूहाचे घटक आहेत. जसजसे जेन-झी, डाव्या विचारांचे तरुण किंवा दलित-आंबेडकरी विचारांचे तरुण रस्त्यांवर उतरून शिक्षण-आरोग्य आणि रोजगारासाठी भाजपच्या राज्या-राज्यांतील तसेच केंद्रातील सरकारविरोधात आक्रमक होतील, तितक्याच प्रमाणात धर्मांध समूहांतील भारद्वाजसारखे घटक हिंसक होत जातील. भारद्वाजच्या घटनेतून या धर्मांध समूहांना पाठीशी घालणार्‍या बलाढ्य शक्तिकेंद्रांनी उघडपणे तसा इशारा दिलेला आहे, ही बाब नाकारता येणार नाही. ही शक्तिकेंद्रे जगभर जाऊन कोणत्या भाषेत बोलतात त्याचा देशातील धर्मांध समूहावर यत्किंचितही परिणाम होत नाही हेही भारद्वाज नावाच्या तरुणाने सिद्ध केलेले आहे.

जंतर-मंतरच्या आंदोलनामध्ये उतरलेले आणि त्यांना पाठिंबा देणारे समूह विचारी-तार्किक बुद्धीचा वापर करणारे होते. त्यामध्ये प्रामुख्याने आंबेडकरीवादी आणि डाव्या विचारांचे गट-पक्ष होते. प्रमुख आंदोलक हे जेन-झी वा जेन-अल्फा या वयोगटाचे प्रतिनिधित्व करत होते आणि त्यांनी धर्माच्या आधारावरील राजकारण नाकारले. हे सर्व घटक भाजपच्या आणि त्याचा वैचारिक आधारस्तंभ असलेल्या हिंदुत्वाच्या राजकारणाला विरोध करणारे होते. या सार्‍यांचे दोन शब्दांमध्ये वर्णन केले गेले ते म्हणजे ‘दिमागी नक्षल’. हा शब्दप्रयोग अत्यंत चतुराईने प्रचलित केला जात आहे आणि त्याचा पहिल्यांदा उच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्यावरून केला. त्यानंतर त्यांनी शनिवारी दिल्लीतील एका महाविद्यालयातील भाषणातही तो केला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर हा शब्दप्रयोग करण्याचे प्रयोजन काय होते? अशा तरुणांच्या गटांसमोर वारंवार हा शब्दप्रयोग करणे हा – या आंबेडकरीवादी, डाव्या विचारांच्या तरुणांच्या संगतीत वावरू नका, तुम्ही दिमागी नक्षल झालात तर आमचे विरोधक ठराल. मग, तुम्हाला विरोधक म्हणून वागणूक दिली जाईल- असा सौम्य शब्दांत दिलेला इशारा होता असे समजण्यास हरकत नाही. त्यातून धर्मांध समूहांनाही संदेश दिला गेला आहे. ‘दिमागी नक्षल’ हे हिंदुत्वविरोधी आहेत, हे लोक आपली सत्ता हिसकावून घेऊ शकतात, त्यामुळे त्यांना कुठल्याही स्वरूपात थांबवले पाहिजे, असे अप्रत्यक्षपणे सूचित करण्यात आले आहे, असे कोणी म्हणू शकेल.

भाजपचे राजकारण धर्माच्या म्हणजेच हिंदुत्वाच्या आधारे उभे आहे. त्यामुळे हिंदुत्व सोडून देऊन भाजपला राजकारण करता येणार नाही. या हिंदुत्वाच्या राजकारणाची गेल्या १२ वर्षांमध्ये सत्तेतील पकड घट्ट होत गेली ती प्रामुख्याने धर्मांध समूहाच्या बळावरच. हिंदुत्वाचा रस्त्यावर राबवला जाणारा अजेंडा नेहमीच या धर्मांध समूहांना हाताशी धरूनच पूर्ण केला जातो. गोमांसाची विक्री केल्याच्या आरोपाखाली मुस्लिमांना मारहाणीच्या कित्येक घटना घडलेल्या आहेत. या मारहाणीत सहभागी झालेल्या हिंदुत्ववादी संस्था-संघटना आणि त्यांचे तरुण बेरोजगार कार्यकर्ते हे धर्मांध समूहच होते. अजेंडा राबवण्यासाठी सरकारला जे काम सत्तेत बसून करता येत नाही ते काम धर्मांध समूहांना रस्त्यावर उतरवून करून घेता येते हे कधीच सिद्ध झालेले आहे. वेळ-काळ आणि गरज बघून या धर्मांध समूहांना रस्त्यावर उतरवले जाते. जंतर-मंतरच्या आंदोलनानंतर सत्तेत बसलेल्या हिंदुत्ववाद्यांना पुन्हा एकदा अजेंडा राबवण्यासाठी धर्मांध समूहांना रस्त्यावर उतरवण्याची गरज भासू लागली असावी. आंदोलनस्थळी जाऊन गोंधळ निर्माण करणे, त्यातून हिंसक परिस्थिती निर्माण करणे, मग समूहाने अडवल्यावर मारहाण करणे आणि ‘मला लोकांनी घेरले होते म्हणून स्वसंरक्षणासाठी हातातील कड्याने मारले’, असा कांगावा करणे हा ट्रॅप असतो. रस्त्यावर उतरून गोंधळ माजवणार्‍या धर्मांध समूहाची ही ‘मोडस-ऑपरेंडी’ असते. स्वतंत्र भारद्वाजने नेमके हेच केले. या ‘भारद्वाज’च्या समूहात तुम्ही सामील झालात तर तुम्ही ‘दिमागी नक्षल’ ठरणार नाही, असेच अप्रत्यक्षपणे सांगितले जात आहे.

मूळ बिहारचा असलेला स्वतंत्र भारद्वाज हा तरुण महात्मा गांधींचा द्वेष करतो, नथुराम गोडसेचा गौरव करतो. त्याला मुस्लीम नकोत. नास्तिक नकोत. दलितही नकोत. भारद्वाजच्या बोलण्यामध्ये या गोष्टी प्रामुख्याने दिसतात. हा तरुण बेरोजगार आहे, त्याला कुठेही नोकरी मिळणे कठीण कारण त्याच्याकडे क्षमता नाही. असे बेरोजगार तरुण गुंडगिरी करतात, त्यांना धर्माचा आधार मिळाला तर त्यांचा धार्मिक अस्त्रासारखा वापर करणे सोपे जाते. भारद्वाजसारखे लाखो तरुण देशभर पसरलेले आहेत, त्यांना भाजपच्या व्हॉट्स-ॲप विद्यापीठाने एकत्र बांधून ठेवले आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. ही विद्यापीठे दिल्लीतील भाजपच्या दोन मुख्यालयांतून कशी निर्माण केली गेली याची अनेक वर्णने करण्यात आली आहेत. जर या धर्मांध समूहाचा उपयोग नसता तर व्हॉट्स-ॲप विद्यापीठे तयारच केली गेली नसती. हे सगळे काम भाजपच्या ज्या समाजमाध्यम विभागातून केले गेल्याचे आरोप होतात तिथे आता नवे लोक आले आहेत. त्यातील अनेक सदस्य अधिक कडवे हिंदुत्ववादी आहेत. त्यातील काहींनी नथुराम गोडसेच्या विचारांचे उघडपणे समर्थन केले होते. याचा अर्थ उघड आहे, भाजपला सत्तेत राहण्यासाठी धर्माध समूहाची सर्वाधिक गरज भासू लागली आहे.

आगामी काळात भाजपचे हिंदुत्व अधिक कडवे होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे भाजपच्या केंद्रातील सरकारची कधी नव्हे इतकी झालेली कोंडी. त्यातून बाहेर पडण्यासाठी भाजपला अधिक कडव्या हिंदुत्वाचा आधार घेण्याशिवाय पर्याय नाही. या कोंडीमध्ये ‘दिमागी नक्षल’ हा शब्दप्रयोग का वापरला गेला याचा उलगडा होऊ शकतो. जंतर-मंतरच्या आंदोलनाने भाजपचे हिंदुत्व नाकारून त्यांच्या मूळ विचारांवरच कुर्‍हाड मारली. भाजप आणि केंद्र सरकारची नैतिकता बेगडी ठरवली. भ्रष्टाचाराला थारा देणार नाही असे म्हणणार्‍या सरकारमध्ये भ्रष्टाचार माजल्याचे सिद्ध झाले. नोटाबंदी करून देश दहशतवादमुक्त करण्याचा दावा ‘पहलगाम’ने खोटा ठरवला. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचे अड्डे पुन्हा बळकट झाले.  पाकिस्तानने इराण-अमेरिका युद्धात मध्यस्थी केली. अमेरिकेच्या दबावामुळे व्यापारकरार एकतर्फी होऊ लागला. चीनमधून होणारी आयात दिवसागणिक वाढत गेली. थेट परदेशी गुंतवणूक अत्यल्प आली. परदेशी पैसा देशाबाहेर गेला. देशातील श्रीमंत देश सोडून जात आहेत. परीक्षांचे घोटाळे झाले. शिक्षण व्यवस्थेमध्ये हिंदुत्वाचा अजेंडा राबवला गेला, व्यवस्था सुधारली नाही. शाळा-शाळांची दुरवस्था झाली आहे, शालेय विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. तरुणांकडे कौशल्य शिक्षण नाही, त्यांना नोकरी मिळत नाही. बेरोजगारी वाढू लागली आहे. आर्थिक विकासाच्या दराबाबतही वाद निर्माण झाले आहेत. जंतर-मंतरच्या आंदोलनानंतर केंद्रीय मंत्र्यांच्या कथित दैवत्वाला जेन-झींनी धक्का दिला आहे. अशी सगळी प्रचंड मोठी कोंडी झाली असेल तर केंद्र सरकारला आधार फक्त हिंदुत्वाचा राहतो.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गुजरात या उत्तरेकडील राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. हिंदुत्व नाकारणारे, डाव्या विचारांचे मतदार वाढत गेले आणि त्यांनी काँग्रेस आणि डाव्या पक्षांना मते दिली तर, या चिंतेत भाजप आहे. म्हणूनच भाजपला विरोध करणार्‍या सर्वांना ‘दिमागी नक्षल’ ठरवले जात आहे. भाजपला या कथित ‘दिमागी नक्षलां’ची वाटचाल रोखावी लागणार आहे आणि त्यासाठी धर्मांध समूहांना रस्त्यावर उतरवण्याशिवाय पर्याय नाही. पुढच्या काळात धर्मांध समूह अधिकाधिक प्रमाणात रस्त्यावर उतरलेले दिसतील, ते हिंदुत्वाला, सनातनी विचारांना विरोध करणार्‍यांविरोधात आक्रमक झालेले दिसतील. त्यांना कोणीही अडवणार नाही, सत्ता त्यांच्या बाजूने असेल, पोलीस यंत्रणा त्यांच्या बाजूची असेल.

कथित ‘दिमागी नक्षलां’चा विरोध कमी होण्याची शक्यता नाही, ते भाजपला आणि त्यांच्या धर्माच्या आधारावरील राजकारणाला विरोध करतील, त्यांचा विरोध जसा वाढेल तशी धर्मांध समूहांनाही ताकद दिली जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. असे समूह कुठेही अराजकता निर्माण करू शकतात. कथित ‘दिमागी नक्षल’ आणि धर्मांध समूह यांच्यातील संघर्ष आता अटळ आहे असे दिसते.