भारतात साठोत्तरीतल्या चित्रपटांमध्ये पांडू हवालदार आणि त्याचा धोंडू अंमलदार यांचे चेहरे ठरून गेलेले असत. म्हणजे जगदीश राज खुराणा यांच्यासारख्या एखाद्या व्यक्तीला १४४ चित्रपटांत पोलिसी ‘खाक्या’ पोशाखात पाहावे लागे. तशा पोलिसी भूमिका न बजावताही मालिकांच्या जागतिकीकरणाच्या ओघामुळे लान्स रेडिक हे जगदिशांना ओळखीचे झालेले होते. दोन हजारोत्तर काळात आपल्याकडल्या बाळबोध मालिकांपासून विलग झालेली नवी पिढी ‘फ्रेंड्स’, ‘डेक्स्टर’ आणि इतर चांगल्या परदेशी मालिकांमध्ये खऱ्या अर्थाने मनोरंजन शोधू लागली. त्यातलाच नवा वर्ग हा पडद्यावर पोलिसी रुबाबात वावरत त्या ऐटीचीही वैविध्यपूर्ण छाप पाडणाऱ्या लान्स रेडिक याचाही प्रचंड चाहता होता. अभिनयाच्या कारकीर्दीला टीव्ही मालिकांमधील पोलिसाने करून त्या पदाचा दरारा उंचावत नेणाऱ्या या अभिनेत्याला ‘द वायर’, ‘बॉश’ मालिकांनी जगभरच्या टीव्हीघरांत लोकप्रियता मिळाली. एक पिढी ‘ओटीटी’ माध्यमाचे भारतात स्वागत करण्यास सज्ज झाली, तेव्हा जॉन विक आणि इतर माध्यमांतील त्याच्या भूमिका फक्त त्याच्या अस्तित्वाने खणखणत होत्या. बाल्टिमोर, मेरीलॅण्ड येथील सुखवस्तू कृष्णवंशीय कुटुंबात जन्मलेल्या लान्स यांचे शिक्षण संगीतात झाले. तेही श्रीमंती हौसेइतपत नाही, तर शास्त्रीय संगीतात पदवी मिळवण्याइतपत. सुरुवातीला बोटीमध्ये दिवसा गाणारा जेवणवाढपी (वेटर) आणि रात्री वृत्तपत्र वितरण यंत्रणेत पेपरांच्या घडय़ा बांधण्याचा उद्योग त्याला चरितार्थासाठी करावा लागला. त्यातून कुटुंबाचे भागेना आणि वृत्तपत्रांच्या घडय़ा घालताना पाठदुखीने घेरलेला जाच सुटेना म्हणून दुसरा मार्ग त्याला शोधावा लागला. १९९० साली ‘येल स्कूल ऑफ ड्रामा’मधून अभिनयाचे धडे गिरवत त्याने टीव्ही मालिकांतून अभिनयाची उमेदवारी सुरू केली. धिप्पाड आणि बलदंड शरीर, करडी आणि कोरडी नजर, करारी शोभणारे व्यक्तिमत्त्व यांना त्याने कॅमेऱ्यासमोर संस्कारित केले. ‘द वायर’मधील केड्रिक डिनयल्स या व्यक्तिरेखेत त्याने जीव ओतला. २००२ ते २००८ या कालावधीत अमेरिकेत चाललेल्या या मालिकेची जगभरातील टीव्हीवर प्रसारणांतून (ओटीटीपूर्व काळात) आवर्तने झाली. या कालावधीत अधिकृत आणि अनधिकृतरीत्या ‘द वायर’ डीव्हीडी मार्गानेही अनेक देशांत जाऊन पोहोचली आणि हा पोलिसी ड्रामा जागतिक वगैरे बनला. या भूमिकांनंतर फ्रिंज (२००८ ते १३), बॉश (२०१४ ते २०) आणि जॉन वीक सिनेमालिका (२०१४-२३) यांमधून लान्स रेडिक यांनी आपल्या कामाचा ठसा नोंदवला. मायकेल कॉनेली या खूपविक्या लेखकाने बॉश या त्याच्या कादंबरीत रचलेल्या अर्विन अर्विग या पात्राचे लान्स रेडिकने पडद्यावर सोने कसे केले, हे अनेक मुलाखतींमधून सांगून कादंबरीतल्या मुख्य व्यक्तिरेखेइतकाच रेडिकच्या अभिनयाचा सन्मान केला. ‘लॉस्ट’, ‘अमेरिकन हॉरर स्टोरी: कोव्हेन’, ‘द ब्लॅकलिस्ट’, ‘वन नाइट इन मियामी’, ‘एंजल हॅज फॉलन’, ‘गॉडझिला व्हर्सेस काँग’ हे त्याच्या भूमिका असलेले गाजलेले काही चित्रपट. पण त्याचा करारी पोलिसी आवाज कित्येक व्हिडीओ गेम्समध्ये वापरण्यात आला. गेल्या आठवडय़ाअखेरीस वयाच्या साठाव्या वर्षी अकाली निधनामुळे समाजमाध्यमांमध्ये भारतीय चाहत्यांनीही वाहिलेली आदरांजली ही या कलाकाराच्या कामाला मोठी पोचपावती होती.