भारतात साठोत्तरीतल्या चित्रपटांमध्ये पांडू हवालदार आणि त्याचा धोंडू अंमलदार यांचे चेहरे ठरून गेलेले असत. म्हणजे जगदीश राज खुराणा यांच्यासारख्या एखाद्या व्यक्तीला १४४ चित्रपटांत पोलिसी ‘खाक्या’ पोशाखात पाहावे लागे. तशा पोलिसी भूमिका न बजावताही मालिकांच्या जागतिकीकरणाच्या ओघामुळे लान्स रेडिक हे जगदिशांना ओळखीचे झालेले होते. दोन हजारोत्तर काळात आपल्याकडल्या बाळबोध मालिकांपासून विलग झालेली नवी पिढी ‘फ्रेंड्स’, ‘डेक्स्टर’ आणि इतर चांगल्या परदेशी मालिकांमध्ये खऱ्या अर्थाने मनोरंजन शोधू लागली. त्यातलाच नवा वर्ग हा पडद्यावर पोलिसी रुबाबात वावरत त्या ऐटीचीही वैविध्यपूर्ण छाप पाडणाऱ्या लान्स रेडिक याचाही प्रचंड चाहता होता. अभिनयाच्या कारकीर्दीला टीव्ही मालिकांमधील पोलिसाने करून त्या पदाचा दरारा उंचावत नेणाऱ्या या अभिनेत्याला ‘द वायर’, ‘बॉश’ मालिकांनी जगभरच्या टीव्हीघरांत लोकप्रियता मिळाली. एक पिढी ‘ओटीटी’ माध्यमाचे भारतात स्वागत करण्यास सज्ज झाली, तेव्हा जॉन विक आणि इतर माध्यमांतील त्याच्या भूमिका फक्त त्याच्या अस्तित्वाने खणखणत होत्या. बाल्टिमोर, मेरीलॅण्ड येथील सुखवस्तू कृष्णवंशीय कुटुंबात जन्मलेल्या लान्स यांचे शिक्षण संगीतात झाले. तेही श्रीमंती हौसेइतपत नाही, तर शास्त्रीय संगीतात पदवी मिळवण्याइतपत. सुरुवातीला बोटीमध्ये दिवसा गाणारा जेवणवाढपी (वेटर) आणि रात्री वृत्तपत्र वितरण यंत्रणेत पेपरांच्या घडय़ा बांधण्याचा उद्योग त्याला चरितार्थासाठी करावा लागला. त्यातून कुटुंबाचे भागेना आणि वृत्तपत्रांच्या घडय़ा घालताना पाठदुखीने घेरलेला जाच सुटेना म्हणून दुसरा मार्ग त्याला शोधावा लागला. १९९० साली ‘येल स्कूल ऑफ ड्रामा’मधून अभिनयाचे धडे गिरवत त्याने टीव्ही मालिकांतून अभिनयाची उमेदवारी सुरू केली.
Already have an account? Sign in