‘‘शब्दांत जेव्हा ताकद गोळा होते, तेव्हा ती शब्दांतच गोठून राहात नाही. ती ताकद शब्दांतून माणसात पेरली जाते. पेटलेली माणसे शब्दांना घडवितात. पेटलेले शब्द माणसांना घडवितात.’’ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी हे आपले प्रेरक विचार एका साहित्यिक लेखात मांडले होते. प्रसंग होता, सातारा येथे संपन्न झालेल्या ६६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा. संमेलनाध्यक्ष होते संगीत नाटककार, संपादक विद्याधर गोखले. दैनिक ‘पुढारी’, कोल्हापूरने संमेलन विशेषांक १२ फेब्रुवारी, १९९३ मध्ये प्रकाशित केला होता. त्यातील हा वैचारिक लेख.

यात तर्कतीर्थ आपणास समजावतात की, ‘‘साहित्य हे एक सामर्थ्य आहे. व्यक्तीच्या जीवनाप्रमाणे राष्ट्राच्या जीवनात जेव्हा आव्हाने येतात, तेव्हा ती पेलण्याचे सामर्थ्य राष्ट्रास साहित्य देते. हे सामर्थ्य शस्त्राने प्राप्त होत नसून ते विचारांतून येते. साहित्य संमेलने हा एक आनंद सोहळा असतो. यात सर्व धर्माच्या, वर्गाच्या व प्रांतांच्या भाषेच्या लोकांनी सहभागी व्हायला हवे. यामुळे परस्परांतील प्रेमभाव वाढीस लागतो. कलेच्या निखळ आनंदाने लोक एकमेकांशी बांधले जातात. ‘वैर’ संपते आणि ‘मैत्र’ सुरू होते. म्हणून अशी साहित्य संमेलने आजच्या स्थितीत उपकारक सिद्ध होतात. ‘भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे’ असे संत ज्ञानेश्वरांनी म्हणून ठेवले आहे, याचा हाच अर्थ आहे.

साहित्य कलांचा व्यवहार हा मानवी जीवनातील एक अपरिहार्य असा व्यवहार आहे. चिरंतन आणि शाश्वत मूल्यांचे भरण- पोषण होण्यासाठी साहित्य कलांच्या व्यवहारात सर्व लोकांनी सक्रियपणे सहभागी झाले पाहिजे. तरुण, विचारवंत, साहित्यिक, राजकारणी सर्वांनी सहभागी होऊन ‘आनंद कल्लोळ’ निर्माण केला पाहिजे. मराठी पिंडाचा खरा धर्म उत्तुंग भरारी घेण्याचा आहे. जीवाची बाजी लावून आपले ईप्सित साध्य करून घेण्याचा मराठी माणसाचा स्वभावधर्म बनून गेला आहे. ‘ब्रह्मविद्योचा सुकाळू’ करण्यासाठी याच मराठी पिंडाने अंधश्रद्धेचे पहाड फोडले आहेत.

देशातील लेखक, विचारवंत, कलावंत, शास्त्रज्ञ आणि संशोधक यांनी सामर्थ्याने निर्माण केलेले जे विचारधन असते, तेच खरे तर समाज पुरुषाचे मोठे धन आहे, त्यावरच देश ओळखला जातो. समाजाची ओळखदेखील याच धनसंचयातून होत असते. समाजाचे जीवन प्रभावी होते आणि प्रवाही होते, ते याच धनाने! समाज जिवंत राहतो तो त्याच्याजवळ असणाऱ्या भौतिक साधनसुविधांनी नव्हे, तर त्याच्याजवळ असणाऱ्या सांस्कृतिक मूल्य आणि विचारमूल्यांवर. त्यावरच देश जिवंत राहिलेले आहेत, असा इतिहासाचा दाखला आहे.

साहित्य संमेलनाकडे सारेच घटक एवढ्या आत्मीयतेने का पाहतात? राजकारण्यांना त्यात एवढा रस का वाटतो? सरकार त्याला अनुदान का देते? हजारो कार्यकर्ते दिवस-रात्र मेहनत घेऊन संमेलनाची मांडामांड का करतात? लाखो रुपये त्यासाठी गोळा का केले जातात? या सर्व प्रश्नांचे उत्तर एकच आहे. साहित्य हे एक सामर्थ्य आहे. व्यक्तीच्या जीवनाप्रमाणे राष्ट्राच्या जीवनात जेव्हा आव्हाने येतात, तेव्हा ती पेलण्याचे सामर्थ्य शस्त्राने प्राप्त होत नाही, तर विचारांतून येते. आजच्या काळातदेखील भारतीय लोकशाहीपुढे उभ्या असलेल्या आव्हानांना सामोरे जाण्याचे बळ हे साहित्य देणार आहे. म्हणूनच साहित्य संमेलनाचे महत्त्व सर्वाधिक आहे.

साहित्यिक हा राष्ट्राच्या प्रतिष्ठेचा स्वयंभू विजयध्वज आहे हे राज्यकर्त्यांना, सत्ताधीशांना, वित्ताधीशांना जाणवले पाहिजे आणि त्यासाठी लेखकांच्या लेखणीची धार त्याला नीट जाणवली पाहिजे. अशा साहित्याची आज खरी गरज आहे. सच्चा उद्गार मुळातच कमी असतो हे खरे; पण सच्चा उद्गारांच्या दिशेने जाणारी तरुण लेखक मंडळी ही उद्याची विजयपताका आणतील. साहित्य संमेलनातून लेखक निर्माण होणार नाहीत; पण असलेल्या लेखकांत नवी प्रतिभा, नवोन्मेष, नवा जोम निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे.’’ तर्कतीर्थ आपला हा आलेख ज्या ललित बंध स्वरूपात सादर करतात, त्यामुळे त्याची लेखनशैली शब्दसामर्थ्याने नटून नाचू लागते आणि तेव्हा लक्षात येते की, तर्कतीर्थांना केवळ विचारच वश नव्हते, तर शब्दकळेचे अंगही त्यांच्या लेखनप्रपंचाचा अविभाज्य भाग होता.