राजकीय व्यंगचित्रांनी कधी कुणाच्या भावना दुखावतील सांगता येत नाही. उदाहरणार्थ भारतातील नेहरू/ आंबेडकरांच्या काळातले प्रख्यात व्यंगचित्रकार के. शंकर पिलै ऊर्फ शंकर १९८९ मध्येच निवर्तले, पण त्यांच्यावर कडाडून आणि गंभीर टीका त्यानंतर २३ वर्षांनी झाली. अशी टीका पॅट ओलिफन्ट यांना त्यांच्या हयातीत अनेकदा झेलावी लागली होती आणि आठवड्याभरापूर्वी झालेल्या त्यांच्या निधनानंतरही कदाचित ती होत राहील. पण कारकीर्दीचा बहुतेक काळ अमेरिकेसारख्या देशात घालवल्याने त्यांना व्यंगचित्रांसाठी कधी ‘देशद्रोही’ ठरवले गेले नाही, एवढेच काय – ‘धर्मद्रोही’ अशी टीका होऊनसुद्धा पुढे काहीच कारवाई झाली नाही.

ऑस्ट्रेलियात १९३५ साली जन्मलेल्या या व्यंगचित्रकाराचे पॅट्रिक हे मूळ नाव ख्रिस्ती संतांची नावे मुलांना ठेवण्याच्या परंपरेनुसारच ठेवले गेले असेल, पण अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर १९८० च्या दशकात तिथल्या काही धर्मरक्षकांकडून होणार्‍या बाल- लैंगिक शोषणाची जी प्रकरणे उघडकीस येऊ लागली, त्यावर भाष्य करण्यासाठी ‘सेंट पेडोफिलिया’ असे पात्र पॅट यांनी चितारले आणि तत्कालीन कॅथोलिक खवळले. हा असाच राग त्यांना निराळ्या कारणासाठी झेलावा लागला तो आशियाई (विशेषत: चिनी) लोकांच्या सुळसुळाटामुळे गांजलेली स्वातंत्र्यदेवता त्यांनी चितारली तेव्हा. मग ‘ते पराकोटीचे वंशवादी आहेत’ हा आक्षेप वारंवार होऊ लागला.

पॅट यांच्या राजकीय अर्कचित्रांना नावे ठेवणारे लोकसुद्धा मग हाच आक्षेप वारंवार उगाळू लागले. ‘अमेरिका छळ करत नाही, समजलं ना?’ असे म्हणणार्‍या तत्कालीन अमेरिकी परराष्ट्रमंत्री काँडोलीझा राइस यांना छळवादी ललनेच्या पोशाखात दाखवणे. बराक ओबामा यांचा चेहरा कुठल्याशा पॉलिनेशियन बेटावरल्या खडकशिल्पासारखा आहे आणि कौतुकाने बघायला अमेरिकी लोक आले आहेत, जॉर्ज डब्ल्यू बुश हे महिलांची पर्स हाती घेऊन उभे आहेत, निक्सनच्या हाती नेहमी बंदूक आहे अशी व्यंगचित्रे त्यांनी काढली. त्यातून त्यांचा निष्पक्षपातीपणा दिसला. प्रसारमाध्यमांचे कामच तथाकथित ‘समर्थकां’ची टीका झेलण्याचे असते (आणि यांपैकी काही तर ‘मी काही समर्थक वगैरे नाही, पण-’ म्हणणारेही असतात,) हे पॅट यांना माहीत असावे.  सडेतोड तिरकसपणामुळे त्यांनी पौगंडावस्थेत शाळा सोडली आणि ॲडलेडमध्ये ‘द न्यूज’ या वृत्तपत्राच्या कला विभागात उमेदवारी करता करता स्वत:हून ते व्यंगचित्रकला शिकले.

ऑस्ट्रेलियातून अमेरिकेत १९६४ मध्ये आले आणि ‘डेन्व्हर पोस्ट’मध्ये त्यांनी काढलेली व्यंगचित्रे खोचक असल्यामुळेच अमेरिकेतील अन्य राज्यांतल्या वृत्तपत्रांमध्ये, मग जगातल्या इतर देशांतही छापली जाऊ लागली. १९७० व ८० च्या दशकात सर्वाधिक ‘सिंडिकेट’ होणारे व्यंगचित्रकार म्हणून लौकिक वाढत असताना याच काळ्यापांढर्‍या चित्रांपैकी काही अर्कचित्रांची ब्राँझ शिल्पे आणि तैलचित्रे करून ती त्यांनी कलादालनांतही मांडली. खरे तर २०१५ मध्येच त्यांनी काम थांबवले होते. पण ही निवृत्ती त्यांनी ट्रम्पचे व्यंगचित्र काढण्यासाठी तात्पुरती सोडली. फटकळपणा, त्यासाठी लागणारा तिरकसपणा ही वैशिष्ट्ये आजच्या काळात लोप पावत असताना, ‘पुलित्झर पारितोषिकाने माझी कला न पाहाता, राजकीय आशयला महत्त्व दिले- आता मी नाही या बक्षिसाला मोजत’ असा पॅट ओलिफन्ट यांचा लोभस उद्धटपणा चिरंतन स्मरणीय ठरतो!