‘लेसन्स इन केमिस्ट्री’ या पुस्तकावर आलेली टीव्ही मालिकाही गाजली आणि त्या मालिकेमुळे नंतर पुस्तकही जगात दूरवर पोहोचले. पुस्तकाच्या लेखिका बॉनी गार्मस या तर गेल्या चार वर्षांतल्या मुलाखतींमधून आपल्याला नोकरीवरून काढून टाकण्याच्या घटनेचे आभार मानतायत आणि ९८ प्रकाशकांनी नाकारल्यानंतर जन्माला आलेल्या या पहिल्या पुस्तकाने केलेल्या खपाच्या विक्रमाकडे आश्चर्याने पाहातायत. जयपूर साहित्य महोत्सवासह जगभरातील पुस्तक महोत्सव गाजविण्याच्या व्यापातच गेलेल्या या चार वर्षांत त्यांनी दुसरी कादंबरीदेखील लिहिली, हे विशेष. ‘पेक ॲण्ड पेक’ नावाची ही कादंबरी ऐंशीच्या दशकातील अमेरिकेत घडते. कादंबरीचे कथानक काव्याला वाहिलेल्या ज्या मासिकाभोवती फिरते, त्याचेही नाव ‘पेक ॲण्ड पेक’ हेच. कवी-मासिकाचे संपादक-मालक आणि शब्दांच्या पसार्यात चालणारे कथायुद्ध यात आलेय. आता नव्या पुस्तकाच्या निमित्ताने सुरू असलेल्या नव्या मुलाखत-माळांतील काही आवर्जून वाचाव्या अशा खालील दुव्यांवर.
* https://tinyurl.com/23yhefpv * https://tinyurl.com/3dkp7cxb
केन पारितोषिक आणि एआय वाद…
आफ्रिकेचे बुकर ही ओळख असलेले आणि फक्त कथेसाठी दिले जाणारे ‘केन’ पारितोषिक यंदा वेगळ्याच कारणासाठी अधिक चर्चेत आले. पारितोषिक झिम्बाब्वेमधील ‘ब्लू फायटर’ नामक कथेला जाहीर झाले. पण त्यानंतर काहीच दिवसांनी ‘द अटलांटिक’च्या संकेतस्थळावर आलेल्या लेखात ही कथा कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून लिहिली गेल्याचा आरोप करण्यात आला. हरारे येथील कुटुंबात रंगीत मासे पाळणार्या कफल्लक कुटुंबप्रमुखाची गोष्ट ‘ब्लू फायटर’मध्ये आलीय. त्या कथेची पडताळणी या पारितोषिकासाठी आलेल्या पूर्वीच्या कथांशी केली गेली. आधीच्या सार्या गोष्टी या मानवी असून यंदाची विजेती कथाच एआयचा आधार घेऊन लिहिण्यात आल्याचा दावा अटलांटिकच्या लेखात आलाय. त्यामुळे कथा, अटलांटिकचा लेख आणि नंतरचे वाद असा सगळाच कुतूहल उत्प्रेरक भाग खालील दुव्यांमध्ये सापडेल.
* https://tinyurl.com/yc7prnfy * https://tinyurl.com/myyjafjh, * https://tinyurl.com/6f5y8by * https://tinyurl.com/3md4vm2p
रॉबर्ट फ्रॅन्कचे घर…
एक युरोपातील छायाचित्रकार १९५५ साली शीष्यवृत्तीच्या बळावर युद्धोत्तर अमेरिकेच्या १० हजार मैलांची वाट तुडवतो आणि त्यात तब्बल २८ हजार छायाचित्र काढतो. फ्रान्समध्ये १९५८ साली प्रकाशित झालेल्या ‘अमेरिकन्स’ हे ८३ छायाचित्रांचे पुस्तक आजही दृश्यकलादर्दींच्या निवडकांमध्ये गणले जाते. या पुस्तकाचा कर्ता छायाचित्रकार रॉबर्ट फ्रॅन्क याच्या घरावर लिहिला गेलेला दीर्घ लेख या आठवड्यापुरता प्लाऊशेअरच्या ताज्या अंकात वाचायला मिळतोय. लेख वाचनाआधी अभ्यास म्हणून गेल्याच वर्षी ‘गार्डियन’ने या पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित करणारा छायाचित्रनिबंध प्रकाशित केला आहे. तो वाचून झाल्यानंतर पुस्तकाची यूट्युब रपेट फक्त पूरक दृश्यवाचन म्हणून.
* https://tinyurl.com/22ywn4wa * https://tinyurl.com/8xu8sa2d * https://tinyurl.com/bddc8cb6
