‘हार्पर्स बझार’ या फॅशन-क्षेत्रात जागतिक आघाडी मिळवणाऱ्या नियतकालिकाशी सुतराम् संबंध नसलेले ‘हार्पर्स’ हे वैचारिक अमेरिकी नियतकालिक. त्याच्या संपादकपदी १९७६ मध्ये लुइस लॅपम (स्पेलिंग मात्र ‘लेविस लॅपहॅम’सारखे) आले आणि मधल्या उण्यापुऱ्या वर्षभराचा अपवाद वगळता २००७ पर्यंत ‘हार्पर्स’चे संपादकपद त्यांनी सांभाळले. या तीन दशकांत ‘न्यू यॉर्कर’, ‘अॅटलांटिक’ या अमेरिकी नियतकालिकांपेक्षा ‘हार्पर्स’ची निराळी ओळख त्यांनी निर्माण केली. त्यामुळेच, २३ जुलै रोजी रोममध्ये झालेल्या त्यांच्या निधनानंतर न्यू यॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट आदींनी आदरांजली-लेख प्रकाशित केले. जगभर विखुरलेले ‘हार्पर्स’चे एकेकाळचे वाचकही ‘सडेतोडपणाचे धडे देणारा संपादक गेला’ म्हणून हळहळले. भारतीयांसाठी लॅपम यांची आणखी एक ओळख म्हणजे : ‘बीटल्स’ या गाजलेल्या बॅण्डचे भारताशी काय गूळपीठ आहे, हे शोधण्यासाठी महेश योगींच्या केवळ अमेरिकेतील आश्रमात घिरट्या न घालता, भारतात येऊन त्या वेळच्या ‘अध्यात्म/ शांती/ व्यक्तिवाद/ व्यसन’ लाटेची इत्थंभूत दखल घेणारे वार्तांकन त्यांनी केले होते. हेही वाचा >>> लालकिल्ला : भाजपमध्ये घमासान? या लॅपम यांचे घराणे श्रीमंत. आजोबांनी जुगारात पैसा उडवला, तरीही केम्ब्रिजमध्ये उच्चशिक्षणाची हौस लुइस लॅपम भागवू शकले आणि इतिहासाचा प्राध्यापक होण्यापेक्षा पत्रकार होण्याचा, प्रासंगिक लेखन करण्याचा निर्णयही घेऊ शकले. मात्र नोकरी बरी, असे ठरवून आधी ‘सान फ्रान्सिस्को एग्झामिनर’ आणि मग ‘सॅटरडे ईव्हिनिंग पोस्ट’ या वृत्तपत्रांत ते काम करू लागले. भारतात आले होते, ते ‘सॅटरडे ईव्हिनिंग पोस्ट’साठी. नंतर भारताबद्दलच फार असे काही त्यांनी लिहिले नाही. अमेरिकनांना आठवणारे त्यांचे लिखाण हे बड्या-पैसेवाल्या अमेरिकनांमुळे आपल्या लोकशाहीचा पाया कसा खचतो आहे, याचा त्यांनी घेतलेला बिनधास्त वेध. या लिखाणातून पुढे ‘मनी अॅण्ड क्लास इन अमेरिका’, ‘लाइट्स, कॅमेरा, डेमॉक्रसी’ आदी पुस्तकेही झाली. पण ‘तुमचेही घराणे बडेच ना? मग तुम्ही हे लिहिताय?’ यासारख्या प्रश्नाला ‘अहो मला (जातीच्या) बाहेर गेलेला ब्राह्मण समजलात तरी चालेल’ या त्यांनी दिलेल्या उत्तरातून भारताविषयीचे- आणि माणसांविषयीचे- त्यांचे आकलन प्रतीत होई. ‘आकड्यांतून चटपटीतपणे बातमी/ माहिती सांगणे’ ही त्यांनी हार्पर्समधून रुळवलेली पद्धत. न्यू यॉर्करने लांबचलांब आणि ‘भिंतीवरल्या माशीची भूमिका घेऊन, दिसते तेच लिहा’ अशी पद्धत रुळवली; तर यांनी ‘हार्पर्स’मध्ये कमी शब्दांतल्या लेखांमध्ये ‘मी’ असेल तर वाचकांशी नाते जोडले जाते, हे सिद्ध करून दाखवले. वादांचे व्यासपीठ म्हणून ‘हार्पर्स’ला ओळख दिली. उत्तरायुष्यात ‘लॅपम्स क्वार्टरली’तून एकेका संकल्पनेला वाहिलेले सकस लिखाण देण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता.