झटपट लोखंडी पूल उभारणे किंवा दुर्गम रस्ते बांधणे ही महत्त्वाची कामे लष्करी अभियंते करतातच; पण विजेची गरज कमी असलेली किंवा कमी वेळात काम करणारी उपकरणे घडवणे, इंधन वाचवण्याचे उपाय शोधणे, कमी वजनाची- वाहून नेण्यास हलकी पण भक्कम साधने तयार करणे… असा लष्करी अभियांत्रिकीचा पसारा आहे. तो आणखी वाढवून, पर्यावरणाची कमीत कमी हानी होईल याचीही काळजी घेण्याचे व्यवधान लष्करी अभियांत्रिकी विभागाचे माजी प्रमुख (इंजिनीअर-इन-चीफ) लेफ्टनंट जनरल बी. एस. धालीवाल यांनी रुळवले.
या लष्करी उच्च पदावर मे २००६ मध्ये त्यांची नियुक्ती झाली आणि ऑगस्ट २००७ मध्ये ते निवृत्त झाले. यानंतर, पंजाबचे तेव्हाचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी त्यांना ‘मुख्यमंत्र्यांचे प्रमुख तांत्रिक सल्लागार’ या पदावर नेमले आणि पुढे मुख्यमंत्री बदलले तरी, २०१८ पर्यंत ते या सल्लागारपदी कायम राहिले. या लष्करी आणि नागरी क्षेत्रांतीलही कामगिरीसाठी त्यांना पुरस्कार मिळाले; तसेच ‘बदल व्यवस्थापना’च्या क्षेत्रात त्यांचा अधिकार सर्वमान्य झाला. अशा कृतार्थ आयुष्याची अखेर अवघ्या ७८ व्या वर्षी, ३० मे रोजी झाली. लेफ्ट. जन. धालीवाल हे पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) स्नातक. इथून ते आधी ‘बेंगॉल सॅपर्स’मध्ये गेले, मग लष्करी अभियांत्रिकी सेवेच्या अनेक तुकड्यांमध्ये अधिकारपदी राहून, पुढे ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ या दुर्गम रस्ते व आनुषंगिक पायाभूत सोयी उभारण्याच्या विभागातही त्यांना वरिष्ठ पदे मिळाली. ‘त्यांच्या दीर्घ कारकीर्दीत त्यांना मिळालेली काही पदे विशेष प्रतिष्ठेची मानली जात नसूनही, त्यांच्या नेतृत्वामुळे त्यांची तिथली कारकीर्दही झळाळली’ असा अभिप्राय त्यांच्या काही परिचितांनी नोंदवला आहे.
या अभिप्रायांचे कारण ठरले ते ‘द जनरल कॉल्ड त्सुनामी’ हे त्यांचे ४०० हून अधिक पानी आत्मचरित्र! या पुस्तकात लष्करी विनोदाची पखरण आहे, पण हेवेदावे किंवा विषाद यांचा मागमूसही नाही. तांत्रिक सुधारणांची संधी हुडकणे आणि ती सुधारणा प्रत्यक्ष करणे हा प्रवास, त्यातले इतरांचे सहकार्य, असे बारकावे मात्र पुस्तकात भरपूर आहेत. पुण्यातल्याच कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंगचे प्रमुखपद म्हणजेच ‘कमांडंट’पद त्यांनी ऑक्टोबर २००४ मध्ये स्वीकारले आणि डिसेंबर २००४ हा तमिळनाडूत त्सुनामी-संहाराचा महिना ठरला. मदतकार्यावर देखरेखीसाठी तातडीने त्यांना चेन्नईकडे रवाना करण्यात आले आणि तिथे कामाचा झपाटा आणि उत्तुंग झेप हे दोन्ही दिसल्यामुळेच त्यांना अनौपचारिकपणे ‘त्सुनामी जनरल’ हे टोपणनाव मिळाले! लष्कराचे इंजिनीअर-इन-चीफ झाल्यावर त्यांनी पर्यावरणनिष्ठ अभियांत्रिकीचा पुरस्कार हिरिरीने केला, परिणामी लष्करी अभियांत्रिकी विभाग २००७ च्या ‘गोल्डन पीकॉक पर्यावरणनिष्ठ उद्योग पुरस्कारां’पैकी नवोन्मेष पुरस्काराचा मानकरी ठरला.
इतरांना प्रोत्साहन देणार्या लेफ्ट. जन. धालीवाल यांनी, अगदी एका तळावर ‘कमी वीज वापरून अधिक वेगाने कपडे धुणे/ वाळवण्याचे काम करणारे यंत्र’ बनवल्याचेही कौतुक केले. नौकानयन (रोविंग-वल्हवणे), समुद्रातील डायव्हिंग या अनवट खेळांमध्ये ते निपुण होते. नौकानयन संघटनेचे नेतृत्वही त्यांनी केले. त्यांच्या निधनाने, लष्कराच्या इंजिनीअर-इन-चीफ पदाला वलय मिळवून देणारे व्यक्तिमत्त्व लोपले आहे.
