अमेरिकेत नव्वद वर्षांपूर्वी म्हणजे बरोब्बर २३ नोव्हेंबर १९३६ रोजी साप्ताहिक स्वरूपात ‘लाइफ’ नियतकालिकाचा जन्म झाला, तेव्हा ‘छायाचित्र पत्रकारिता’ अशी वेगळी चूल म्हणून साप्ताहिकाकडे कुणी पाहिले नाही. पण दुसर्या महायुद्धात अमेरिका उतरल्यानंतर पुढल्या २५ ते ३० वर्षांपर्यंत अमेरिकेच्या चारपैकी एका घरात त्याची प्रत सापडेल, इतक्या खपाच्या स्तरावर ते पोहोचले.
‘टाइम’ साप्ताहिकाच्या मालकमंडळींकडून छायाचित्रकलेचा गांभीर्याने विचार व्हायला लागल्यानंतरच्या काळात ‘छायाचित्र पत्रकारितेचे जनक’ असेच या साप्ताहिकाचे स्वरूप झाले. पुढे न्यू यॉर्कर, प्ले बॉय आणि अमेरिकी नव पत्रकारितेचे स्तंभ लोकप्रिय करणार्या वृत्तमासिकांच्या धबडग्यात १९७८ ते २००० या कालावधीत साप्ताहिकाचे मासिकात रूपांतर झाले. मात्र गेल्या अनेक वर्षांत- २००० ते २०२६ या काळात ते फक्त विशेषांकाच्या स्वरूपात बेदखल आणि मृत होते. आता या २३ नोव्हेंबरपासून म्हणजे २६ वर्षांनी ते पुन्हा छापील आवृत्तीसह बाजारात दाखल होईल, ही ताजी बातमी.
अर्थातच आता काळ बदललाय. आपल्या खिशात कमी आणि डोळ्यांसमोर अधिक काळ असलेल्या मोबाइलच्या कंपन्यांनी कॅमेराच्या ‘मेगापिक्सल’ची क्षमता महिन्यागणिक वाढवण्याच्या काळात ‘लाइफ’ येतोय. तोही छायाचित्रपत्रकारितेचा आपला पूर्वीचा बाज राखत. त्यामुळे त्याच्याकडे आधीची आणि आताची पिढी कशी पाहाते, ४५ डॉलर किंमतीच्या पहिल्या आकर्षक गुळगुळीत कागदावरील कार्ली क्लॉस या मॉडेल तसेच या मासिकाच्या मालकिणीचेच मुखपृष्ठ असलेल्या २५० पानांच्या लठ्ठ अंकाचे कितपत स्वागत होऊ शकते, याची चर्चा सध्या छायाचित्रप्रेमींमध्ये सुरू झालीय.
युद्ध, युद्धानंतरची बदलती अमेरिका, जागतिक राजकारण, बदलते सांस्कृतिक जीवन आणि सामान्य माणसांचे जगणे ‘लाइफ’ने जगापुढे छायाचित्रकौशल्याद्वारे मांडले. दुसर्या महायुद्धाची समाप्ती चुंबनाद्वारे साजरी करणार्या महिलेच्या छायाचित्रापासून लाइफची शेकडो छायाचित्रे पुढल्या पिढीच्या छायाचित्रकारांना घडवत राहिली.
सुपरमॉडेल कार्ली क्लॉस आणि तिच्या पतीच्या मालकीच्या ‘बेडफोर्ड मीडिया’ने ‘लाइफ’ मासिकाला पुन्हा उभारण्याची घोषणा केली. नव्या मासिकाचा विषय अमेरिकी जनमानसावर केंद्रित करणारा असून सध्याच्या विविध प्रश्नांनी वेढलेल्या काळात सामान्य लोक कसे जगतात याचे दृश्यनिबंध त्यात असतील. बदलत्या वेगवान दृश्यसंस्कृतीला ‘लाइफ’ कसा जीव लावायला शिकवते, ते लवकरच कळेल.
