सर्वाधिक ३४ सामने, दोनदा गोल्डन बॉल सन्मान आणि गट फेरीपासून अंतिम फेरीपर्यंत सर्व सामन्यांत गोल. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत असे विक्रम नावावर असलेला पृथ्वीतलावरील एकमेव माणूस- लिओनेल मेसी. त्याने निवृत्ती घेतली. मेजर लीग सॉकर स्पर्धेत तो इंटर मायामी क्लबकडून खेळेल, पण आंतरराष्ट्रीय सामन्यांत तो आता अर्जेंटिनाच्या आकाशी-पांढर्या पट्ट्यांच्या किंवा पूर्ण निळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही.
विश्वचषक स्पर्धेतील १९ जुलैचा अंतिम सामना अर्जेंटिना स्पेनकडून हरली, तेव्हाच लिओचे पाय आता थकल्याचे अनेकांना जाणवले. तो सामना पूर्ण पाहिला गेला तो एकाच आशेवर की, सर्जनाचा असा एखादा अनिंद्य क्षण येईल, ज्या क्षणी मेसीच्या पायाचा स्पर्श झाल्याने हुरळून तो चेंडू एखादा गोल किंवा गोलसंधीत रूपांतरित होईल. पण अशा परीकथा पुस्तकातच शोभतात. ते चांगलेही. मानवी क्षमतेला असलेले वयाचे कुंपण त्यामुळे लख्खपणे लक्षात येते.
मेसीने निवृत्त होताना जे पत्र लिहिले, त्यातही याचा उल्लेख केला. ‘देशासाठी खेळताना मी माझे सर्वोत्तम दिले. आता देण्यासारखे काही उरले नाही.’ तसेही फुटबॉलसारखा दमवणारा खेळ २१ वर्षे सातत्याने खेळणे काही सोपे नाही. तेही अशा स्थित्यंतराच्या काळात, ज्यात कला-कौशल्याला वेग-तंत्रज्ञानाची जोड आणि शारीरिक-मानसिक कणखरतेचे परिशिष्ट आवश्यक. मेसीने खेळायला सुरुवात केली, तेव्हा ‘इन्स्टाग्राम’चा जन्मही झाला नव्हता. परवा निवृत्ती त्याने ‘इन्स्टाग्राम’वर जाहीर केली, एवढे सांगितले तरी हे स्थित्यंतर किती वेगळे आणि अवघड आहे, हे लक्षात यावे.
मेसीची सुरुवातही अशीच अवघड. खरे तर अनघड. सहाव्या वर्षापासून त्याने अर्जेंटिनातील रोझारिओस्थित नेवेल्स ओल्ड बॉइज संघाकडून खेळायला सुरुवात केली. पुढे सहा वर्षे तो या क्लबकडून खेळला आणि ५०० गोल मारले. म्हणजे आकडेमोडच करायची, तर दर पाचव्या दिवसाला प्रत्यक्ष सामन्यात तो एक गोल मारत होता. हा पराक्रम सुरू असतानाच दहाव्या वर्षी त्याला ‘ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सी’ असल्याचे निदान झाले. शरीराची वाढ खुंटवणारा विकार. त्याच्या भाळी आलेले शारीरिक ठेंगणेपण यापायी. पण, वडील जॉर्ज यांनी स्वत:च्या आरोग्य विम्यातील पैसे खर्चून उपचार सुरू ठेवले. नेवेल क्लबनेही पाठिंबा दिला. पुढे तर जवळपास संपूर्ण कारकीर्दभर वडील जॉर्ज हेच मेसीचे व्यवस्थापक म्हणून काम करत राहिले.
अर्जेंटिनाच्या क्षितिजावर मेसीचा उदय झाला, तेव्हा दिएगो मॅरेडोना नावाचा सूर्य मावळून एक दशक उलटले होते. मधल्या काळात अर्जेंटिनासारख्या नायकत्वाच्या नुसत्या स्पर्शाने उजळून निघणार्या भावनिक संघाला तसा खेळाडू मिळाला नव्हता. तो मेसीच्या रूपाने मॅरेडोनाच संघाचा प्रशिक्षक असताना गवसला. पुढे मग ऑलिम्पिक सुवर्णपदक (२००८), विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपद (२०१४), कोपा अमेरिका उपविजेतेपद (२०१६), मग या स्पर्धेचे दोनदा जेतेपद (२०२१, २०२४) आणि विश्वविजेतेपद (२०२२) अशी मेसीच्या कारकीर्दीची कमान चढतीच आहे. अर्जेंटिनासाठी २०७ सामने, १२५ गोल आणि गोलसाठी निर्माण केलेल्या संधी, दिलेले पास तर अनेकानेक.
पण मेसी असा केवळ आकड्यांत बसवता येत नाही. त्याचे वैशिष्ट्य हे की, थोडी संधी आहे असे वाटले, तरी त्याच्या डोक्यात चेंडू कोणकोणत्या कोनांतून, दोन खेळाडूंच्या फटींतून, डोक्यांवरून गोलजाळ्यात पोहोचू शकतो, याचे भौमितिक चित्र तयार होते. मग ते पूर्ण करायला त्याला कोण कुठे आहे, हे मान वर करून पाहावेही लागत नाही. हे केवळ वैयक्तिक पदलालित्याच्या कौशल्यावर शक्य होत नाही, त्यासाठी सुरू असलेल्या खेळाच्या लयीचे आकलन व्हावे लागते. ते मेसीला इतरांपेक्षा खूप लवकर होते, म्हणून तो महान.
शारीरिक वाढीला आक्रसणार्या विकारावर त्याने कायमच मात केली, ती अशी, तल्लख बुद्धीने. मेसीचे फुटबॉलविश्वाला देणे काय, तर वेगाच्या नशेने ताकदवान केलेल्या खेळाला ‘देखणे’ करता येते, याचे भान. मेसीची सगळी कारकीर्दच अशी, पट्टीच्या गवयाने एखादा अनवट राग उलगडून दाखवावा तशी. विलंबितमधील ठेहराव, द्रुत गतीतील तल्लीनता, तानांतील आक्रमकता आणि असा लीलया गळा फिरवून पुन्हा षड्जाच्या शालीनतेवर. मेसीच्या अर्जेंटिनाला २०२६ चा विश्वचषक मिळाला नाही, तेव्हा षड्ज न लागल्याची हुरहुर फुटबॉल रसिकांना लागली खरी. पण त्यानंतरही त्याने वेळीच थांबून दाखवून दिले की, निषादाच्या अपूर्णतेची गोडी षड्जाला अधिक परिपूर्ण बनवते.
