वर्षातील १० अथवा ५० पुस्तकांच्या याद्या ब्रिटन आणि अमेरिकेतील सर्वच महत्त्वाच्या माध्यमांत नोव्हेंबरपासून झळकू लागतात. कमी अधिक फरकाने, क्रमांकावर या याद्यांमध्ये बहुतांश सारखी पुस्तके असतात. ‘लिटररी हब’ची ही यादी महत्त्वाची यासाठी असते की ती ‘टाइम’, ‘न्यू यॉर्कर’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’सह तीन-चार डझन महत्त्वाच्या संस्थांची तपासणी करून कुठले पुस्तक सर्वाधिक वेळा यादीत झळकले, त्याची यादी करते. यंदा ५८ माध्यमसंस्थांच्या १००३ पुस्तकांच्या यादीतून काढलेली ही परमोच्च यादी. ती इथे देण्याचे आणखी एक कारण प्रथम स्थानावर दोन्ही लेखिका भारतीय असल्याचे. ‘द लोन्लिनेस ऑफ सोनिया आणि सनी’ पुस्तकासाठी किरण देसाई आणि ‘मदर मेरी कम्स टू मी’ पुस्तकासाठी अरुंधती रॉय. या यादीत नंतरची पुस्तके कोणती ती येथे पाहता येईल. त्याचबरोबर दिले गेलेले ५८ याद्यांचे दुवे दिवस संपेपर्यंत वाचता येऊ शकतील.

● https://tinyurl.com/f96ykkwc

एक भारतीय सूचीदेखील…

‘लिटररी हब’च्या वार्षिक सर्वेक्षण यादीमध्ये नसलेल्या यादीतील एक ही ‘व्होग इंडिया’ची. त्यात किरण देसाई, अरुंधती रॉय असणे स्वाभाविकच. पण इतर चांगली भारतीय पुस्तके कोणती याची माहिती होते. गीतांजली श्री यांच्या पुस्तकाचा नवा अनुवाद. भारतीय संविधानाच्या इतिहासावरचे शशी थरूर यांचे पुस्तक, ऊर्दू कवितांचा, मल्याळम कथा कादंबऱ्यांचा अनुवाद आणि काश्मीरमधील कथांचा अनुवाद असा बराच नवा माहिती-मसाला या यादीत आहे. पुस्तकावर कॅप्सूल रिव्ह्यू असल्याने आणि ही पुस्तके जवळपासच्या दुकानांत उपलब्ध असल्याने आवर्जून पाहावी अशी.

● https://tinyurl.com/y43succ4

पुस्तके लोकप्रिय का होतात?

पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने गेला संपूर्ण आठवडाभर समाजमाध्यमांतील मराठी समुदायाने पुस्तकांची पाठराखण अनुभवली. पुढल्या आठवड्यापर्यंत त्यांचे पडसाद राहतीलच. पण पुस्तके लोकप्रिय का होतात, नावदेखील माहिती नसलेल्या लेखकाच्या पाच-दहा-पन्नास आवृत्त्या विकल्या गेल्याचा तपशील ऐकायला मिळतो. तोवर नाव माहिती असलेल्या दिग्गज लेखकांच्या देखील मुंगी पावलांचा पाठलाग करीत येणाऱ्या प्रती दिसत असतात. तर अलीकडच्या काही खूपविक्या पुस्तकांच्या निमित्ताने या आठवड्यात ‘गार्डियन’मध्ये आलेला हा वाचनीय निबंध.

● https://tinyurl.com/4verjbpv