‘विषारी दारूचे १६ बळी’ ही बातमी (लोकसत्ता- ३० मे) वाचली. हे बळी मिथेनॉल मिश्रित विषारी दारूचे आहेत. खरे तर मिथेनॉल या रसायनाचे उत्पादन हाताळणी, वापर तसेच विक्री यासाठी राज्यात नागपूर येथील ‘पेट्रोलियम ॲण्ड एक्स्प्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन’ (पेसो) तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडून परवाना घ्यावा लागतो. हा परवाना अनिवार्य आहे. संबंधित व्यक्तीस मिथेनॉल कसे विकले गेले याचा कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. यावर इतक्यात जास्त भाष्य केले जाणार नाही हे उघड आहे.
मिथेनॉलची हाताळणी, शुद्धीकरण, साठवण इत्यादी प्रक्रिया करण्याच्या ३० वर्षांच्या अनुभवानंतर सांगतो की, आमच्या काही रासायनिक प्रक्रियांसाठी अशुद्ध मिथेनॉल मिळत असे. त्यानंतर त्याचे शुद्धीकरण करावे लागे. त्यानंतर योग्य प्रकारे परवान्यासह प्रक्रिया, हाताळणी, साठवण व नंतर विक्री या सर्वासाठी अत्यंत काळजी घ्यावी लागे. अर्थात पूर्व परवान्याशिवाय हे करता येत नाही. परंतु भारतात कायद्याच्या कशी चिंधड्या उडवल्या जातात यावर भाष्य न केलेले बरे. आपल्या देशात कायदा व सुव्यवस्था केव्हा सुधारणार हा मोठा प्रश्न आहे. सरकारी व निमसरकारी विभागात मोठ्या प्रमाणात लाचखोरी आहे हे सर्वाना माहीत आहे म्हणून आता ‘न खाने दूंगा’ हे फक्त कागदावर नको तर प्रत्यक्षात येईल तो सुदिन असेच म्हणावे लागेल.
माधव विनाय वैद्य, पुणे
पाळेमुळे खणणार्यांचे हात स्वच्छ आहेत?
पुण्यामध्ये विषारी दारूच्या सेवनाने पिंपरी-चिंचवडमध्ये १६ बळी गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहे की याची सखोल चौकशी होईल व या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढू. ही तर नेहमीचीच भाषा झाली. पाळेमुळे खणण्याचे काम प्रत्यक्ष करणार कोण? ज्यांनी हे करायचे त्यांचेच हात हप्तेबाजीने रंगलेले आहेत, हे मुख्यमंत्र्यांना माहीत नसेल तर याला काय म्हणावे! या घटना घडल्यानंतर शोधमोहीम राबवण्यापेक्षा अगोदरच दखल घेतली असती तर १६ जीव वाचले असते. मद्यामधून शासनाला मिळणारा महसूल महत्त्वाचा, की गरिबांचे प्राण व प्रपंच महत्वाचे याचा विचार मुख्यमंत्र्यांनी करावा.
प्रवीण नारकर, ठाणे पश्चिम
अशी आवाहने ‘खाशां’साठी नव्हेत…
‘काटकसरीच्या आवाहनाला केराची टोपली’ (लोकसत्ता- ३१ मे) हे वृत्त वाचून कुणाला आश्चर्य वाटले असेल तरच तो बातमीचा विषय होऊ शकतो. मुळात असे आवाहन जनतेसाठी असते. मंत्री, अधिकारी, मर्जीतली माणसे ‘अष्टौप्रहर जनसेवेत गुंतलेली असल्याने’ त्यांच्यासाठी त्यातून अदृश्य सूट गृहीत धरलेलीच असते. याच अंकातील ‘चांदनी चौकातून’ या सदरात विधान परिषद निवडणूक जागा वाटप संदर्भात महायुतीत एकमत होत नसल्याने दोन उपमुख्यमंत्री व मोठ्या शिष्टमंडळासहित मुख्यमंत्र्यांनी दोन दिवस दिल्लीत ठाण मांडून बसल्याचा किस्सा आहे. त्यातही काहीच गैर नसते… कारण ही मंडळी ‘खास’! काटकसर, त्याग जनतेने करणे आणि त्यापायी उद्भवणार्या हालअपेष्टाही जनतेनेच सोसणे, हेच अपेक्षित असते… मंत्री, आमदार, खासदार, अधिकारी अशा ‘जास्त समान’ माणसांसाठी ते आवाहन कसे बरे लागू असेल? ‘आवाहना’मुळे त्यांच्या रोजच्या गडबडीच्या वेळापत्रकात काडीमात्र फरक पडेल तरी कसा?
श्रीकृष्ण साठे, नाशिक
हा तर मोठाच प्रश्न!
‘‘अच्छे दिन’ खरंच आलेत?’ हा लेख (रविवार विशेष, ३१ मे) वाचला. अच्छे दिन खरच आलेत का, हा सगळ्यांनाच वारंवार पडणारा एक मोठा प्रश्नच आहे. मोदी सरकारच्या कारकीर्दीला आता १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. भले काही क्षेत्रांत अच्छे दिन आले असतील पण सर्व सामान्य जनतेसाठी काही अच्छे दिन आलेले दिसत नाहीत. वाढत चाललेल्या महागाईमुळे जनतेचे कंबरडे मोडले आहे. सामान्य जनतेचे घरखर्चाचे बजेट बिघडले आहे.
नामदेव गणपत राव, नवीन पनवेल</strong>
वर्षानुवर्षे डोळ्यांत न्यायाची आशा…
‘उच्च न्यायालयांत ६४ लाख प्रकरणे प्रलंबित!’ (लोकसत्ता – ३१ मे) हे वृत्त वाचले. हे भारतीय न्यायव्यवस्थेसमोर मोठे आव्हान ठरत आहे. खटले दीर्घकाळ प्रलंबित राहत असल्यास किंवा त्यावर योग्य वेळी निर्णय होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांचा भारतीय न्यायव्यवस्थेवर असणारा विश्वास कमी होण्याची शक्यता निर्माण होते. सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील सर्व उच्च न्यायालयांना जलद गतीने न्यायनिवाडा व्हावा तसेच प्रलंबित खटले लवकर निकाली काढून न्यायव्यवस्थेतील विलंब कमी व्हावा यासाठी नेमकी कालमर्यादा निश्चित करून दिल्याने न्यायालयीन प्रक्रियेला गती मिळू शकते. परंतु उच्च न्यायालयांसोबतच देशभरातील कनिष्ठ न्यायालयांमध्ये मोठ्या प्रमाणात खटले प्रलंबित का राहतात याच्या कारणांचा शोध घेणेदेखील तितकेच गरजेचे आहे. न्यायाधीशांची अपुरी संख्या, न्यायालयीन पायाभूत सुविधांचा अभाव, गुंतागुंतीची कायदेशीर प्रक्रिया, अपुरे मनुष्यबळ, पुरावे सादर करण्यास होणारा विलंब आणि त्याचबरोबर ‘तारीख पे तारीख संस्कृती’ या कारणांमुळे न्यायव्यवस्थेच्या कार्यप्रणालीमध्ये दिरंगाई होते. एकूणच भारताच्या सर्वोच्च न्यायालयापासून ते कनिष्ठ पातळीवरील जिल्हा व सत्र न्यायालयांमध्ये आजघडीला पाच कोटी ५० लाखांपेक्षा अधिक खटले प्रलंबित असल्याचे दिसून येते. एकंदरीत तालुका तसेच जिल्हा पातळीवरच्या न्यायालयाचे निरीक्षण केल्यास असंख्य कर्जबाजारी, गरीब आणि डोळ्यांमध्ये न्यायाची आशा घेऊन वर्षानुवर्ष न्यायालयांच्या पायर्या झिजवणारे लोक असल्याचे दिसून येईल.
राजेश नंदनवरे, छत्रपती संभाजीनगर
‘एनटीए’च्या विश्वासार्हतेचा मुद्दा
‘पुन्हा परीक्षा गोंधळ’ ही ‘सीयूईटी’ परीक्षेतील गोंधळाबाबतची बातमी (लोकसत्ता- ३१ मे) बातमी वाचली. देशभरात सध्या नीट परीक्षेतील पेपरफुटीचे प्रकरण गाजत असतानाच देशभरातील विद्यापीठ प्रवेशांसाठी राष्ट्रीय पातळीवर होणार्या ‘सीयूईटी’ या दुसर्या मोठ्या परीक्षेतही प्रचंड गोंधळ उघड झाल्यामुळे परीक्षांचे आयोजन करणार्या ‘राष्ट्रीय परीक्षा संस्थे’ची (नॅशनल टेस्टिंग एजन्सी- एनटीए) अकार्यक्षमता दुसर्यांदा उघड झाली आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी बसत असतात.कष्ट करत असतात. अभ्यास करत असतात. अशा पेपरफुटीमुळे, गोंधळामुळे त्यांची स्वप्ने धुळीला मिळतात. गरीब आणि मध्यमवर्गीय मुले यात होरपळून निघतात. या विद्यार्थांचे भविष्य परीक्षेवरच अवलंबून असते. अशा वेळी कोणावर विश्वास ठेवायचा? ज्या यंत्रणेवर परीक्षेची जबाबदारी असते. तीच यंत्रणा कुचकामी असेल तर दोष कोणाला द्यायचा? हा एक मोठा प्रश्न आहे. नीट, यूपीएससी, सीबीएसई, सीयूईटी अशा महत्त्वाच्या परीक्षांवर तरी शासनाने अंकुश ठेवला पाहिजे. ज्यांच्यावर परीक्षा घेण्याची, त्यामुळेच प्रश्नपत्रिका संरक्षणाचीही जबाबदारी असते त्यांच्यावर अंकुश राहिला तरच विद्यार्थ्यांचा परीक्षा क्षेत्रावर विश्वास बसेल.
संभाजी दुधमल, सासवड
एवढ्यासाठी पंतप्रधान. संरक्षण मंत्रालय?
‘नीट परीक्षा नियंत्रण पंतप्रधानांकडे’ ही बातमी वाचली. एक नेहमीची परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पंतप्रधान व संरक्षण मंत्रालयाला यात उतरावे लागत असेल तर ते अत्यंत लाजिरवाणे आहे. यावरून मुलकी यंत्रणा कशा किडीने पोखरल्या गेल्यात हे दिसून येते. मग ही कीड भ्रष्टाचार वा अकार्यक्षमता किंवा जबाबदारीबद्दल असलेल्या बेफिकीरपणाची असेल. टपाल खात्याऐवजी आता प्रश्नपत्रिका हवाई दल देशभर पोहोचवणार. शत्रूपासून देशाचे संरक्षण करता करता आता हवाई दलाला अशी मुलकी कामे करावी लागण्याची वेळ येणे दुर्दैवी आहे. देशाच्या विकासाची कामे करण्यासाठी विकास योजना आणणे व देश प्रगतीपथावर कसा चालेल हे पाहणे प्रधानांचे मुख्य काम. पण त्यांना आता या नेहमीच्या कामासाठी पण स्वत: लक्ष घालावे लागते हे, संबंधित मंत्रालय व त्या मंत्रालयाचे मंत्री यांना ती कामे पार पाडण्यात पूर्ण अपयश आल्याचे सिद्ध करणारे आहे. इतका गोंधळ असूनही या यंत्रणेतील एकावरही जबाबदारी निश्चित होत नाही अथवा करता येत नाही हे एका अर्थाने संपूर्ण सरकारचे अपयश आहे. त्या अर्थाने हे सरकार नापास झाले आहे असेच वाटते. अशोक साळवे,मालाड (मुंबई)
