‘आता तुमची सुटका नाही !’ या मथळ्याची बातमी (लोकसत्ता- १ नोव्हेंबर) वाचली. लोकशाहीत निवडणूक आयोग हा सत्ताधार्यांचा सोयीस्कर कारभार चालवणारा विभाग नसून सत्तांतराची प्रक्रिया निष्पक्ष ठेवणारी घटनात्मक संस्था आहे. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधकांनी उपस्थित केलेले प्रश्न पंतप्रधान म्हणतात त्याप्रमाणे ‘अफवा’ न मानता तपासले गेले पाहिजेत. मात्र राहुल गांधी यांनी ‘आता तुमची सुटका नाही’ असा दिलेला इशारा आणि जनमहाभियोगाच्या माध्यमातून केलेले शक्तिप्रदर्शन हे लोकशाहीतील उत्तरदायित्वापेक्षा राजकीय संघर्ष अधिक तीव्र करणारे ठरू शकते.
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३२४(५) नुसार मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणे कठोर आहे. त्यामुळे सभागृहाबाहेरील जनमहाभियोग हा घटनात्मक महाभियोगाचा पर्याय ठरू शकत नाही. आयोगाच्या अनियमिततेचे पुरावे सक्षम घटनात्मक व्यासपीठावर मांडण्याची जबाबदारी विरोधी पक्षीयांनी पार पाडायलाच हवी. त्याचवेळी भाजपनेही विरोधकांच्या आरोपांची केवळ खिल्ली उडवून प्रश्न संपत नाहीत, हे लक्षात घ्यावे.
मुळात निवडणूक आयोगाने आपल्या निर्णयांमधून निष्पक्षता सिद्ध करण्याबरोबरच पारदर्शकतेबाबत जनतेचा विश्वास संपादन केला पाहिजे. कारण निवडणुकीत केवळ उमेदवारांचा विजय महत्त्वाचा नसतो, तर त्या विजयामागील प्रक्रियेची विश्वासार्हताही महत्त्वाची असते कारण मतदारांचा विश्वास हरवला, तर लोकशाहीचा विजय केवळ कागदावर उरेल.
– योगेश महादेव जाधव, पारनेर (जि. अहिल्यानगर)
भाजपने आता मानसिकता बदलावी
‘देशाविरोधात कटकारस्थान’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षीयांवर केल्याचे वृत्त व त्यालागतचे ‘आता तुमची सुटका नाही’ या राहुल गांधी यांच्या इशार्यासंबंधीचे वृत्त (लोकसत्ता- १ नोव्हेंबर) वाचले. विरोधकांच्या प्रत्येक क्रियेला सत्ताधार्यांनी प्रतिक्रिया देण्याचे बंधन नाही आणि विरोधकांस कसे ताब्यात ठेवायचे याचे तंत्र विद्यमान सत्ताधार्यांनी गेल्या काही वर्षांत वापरलेलेही आहे. तरीसुद्धा गेल्या काही आठवड्यांत, विरोधकांवर टोकाचे आरोप करण्याइतकी धडकी सत्ताधार्यांना भरण्याचे कारण काय? प्रशासन, पोलीस, नियामक संस्था या राज्यकर्त्यांच्या अंकित असताना विरोधकांना देशविरोधात कटकारस्थाने करायला वाव कोठून मिळणार असादेखील प्रश्न पडू शकतो. अर्थात, निवडणूक काळात गुंडपुंड जामिनावर सुटून बाहेर का येतात, तसेच एखाद्या तुरुंगात बसून एखादा कैदी कार्यरत कसा राहू शकतो याचा खुलासा कोण करणार?
सत्ताधारीविरोधी सभेला प्रतिमोर्चा काढून उत्तर देण्याच्या उद्योगाने भाजपच्या नेत्यांची केवळ अपरिपक्वता उघड होते. विरोधात असल्यापासून भाजप आपणच बळी असल्याचे दाखवत आला आहे, हे ‘व्हिक्टीम कार्ड’ खेळण्याचे डावपेच आता कितपत चालतील, याचा विचार करून कालानुरूप त्या पक्षाने आपली मानसिकता बदलणे आवश्यक वाटते.
– शैलेश न. पुरोहित, मुंबई
ही करमाफी व्यावहारिक आहे?
‘पुढील २०वर्षे नवी मुंबईकरांवर करवाढ नाही-गणेश नाईक’ ही बातमी (लोकसत्ता- १नोव्हेंबर) वाचली. नवी मुंबईतील निवासी इमारतींवरील घरपट्टी आणि पाणीपट्टीत पुढील २०वर्षे व वाढ करता शहरातील दुकाने, हॉटेल, माहिती तंत्रज्ञान केंद्र आणि डेटा सेंटर यांसारख्या तरुणाईला रोजगार मिळवून देणार्या आस्थापनांवर मात्र वाढीव कर आकारणार हे वाचून आश्चर्य वाटले! वनमंत्री गणेश नाईक यांच्या या राजकीय घोषणेमुळे यापुढे सर्वसामान्यांना रोजगार मिळवून देणारी आस्थापने या भागात येण्याचे टाळून तिसर्या मुंबईत जातील हा विचार कोण करणार? येणार्या २० वर्षांत नवी मुंबईतील वाढत्या लोकसंख्येच्या तरुणाईवर यामुळे बेरोजगारीचे संकट वाढवणे हे सामाजिकदृष्ट्या व्यवहारिक आहे का?
– प्रवीण आंबेसकर, ठाणे</strong>
कुंभमेळ्याची उधळपट्टी थांबवा!
आज महाराष्ट्राचा शेतकरी भीषण दुष्काळाच्या तडाख्यात सापडला असून, राज्य पर्यावरणीय संकटात असताना शासन मात्र कुंभमेळ्याच्या भव्य आयोजनावर अब्जावधी रुपयांची उधळपट्टी करत आहे.बळीराजाच्या घामावर उभ्या राहिलेल्या करदात्यांच्या पैशांची ही उधळपट्टी अत्यंत संतापजनक आणि अन्यायकारक आहे.
‘मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा’ हा संतांचा संदेश विसरून कोट्यवधी रुपये तात्पुरत्या सुविधांवर आणि प्रसिद्धीवर उडवले जात आहेत.हा निधी वाचवून थेट दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या कर्जमुक्तीसाठी, वीजबिल माफीसाठी आणि त्यांना तात्काळ आर्थिक आधार देण्यासाठी वापरला पाहिजे. तसेच या पैशातून दुष्काळग्रस्त भागांत पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची शाश्वत व्यवस्था करणे आणि गुराढोरांच्या जिवाचे रक्षण करण्यासाठी तातडीने चारा छावण्या उभारणे आवश्यक आहे. देव मंदिरांत किंवा नदीच्या पात्रात शोधण्यापेक्षा संकटात सापडलेल्या शेतकर्याचे अश्रू पुसण्यातच खरा धर्म आहे.प्रशासनाने या सोहळ्यांची उधळपट्टी तातडीने थांबवून संपूर्ण निधी दुष्काळ निवारणासाठी वळवावा. कारण आज जर शेतकरीच जगला नाही तर उद्या कुंभमेळे साजरे करायला या मातीत माणूसच उरणार नाही.
– विजय म्हस्के पाटील, छत्रपती संभाजीनगर शहर
आदिवासी संस्कृतीचा विसर?
‘कुंभमेळ्याच्या सोहळ्यात राष्ट्रपती सहभागी’ झाल्याचे वृत्त (लोकसत्ता- १ नोव्हेंबर) वाचून महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आदिवासी समूहाचे पर्यावरणप्रेमी संस्कार विसरल्या की काय, असा प्रश्न पडला. आदिवासी संस्कृतीच्या संवेदनशील मनास महाराष्ट्रातील दुष्काळ दिसत कसा नाही? लालबाहादूर शास्त्री यांचे एक दिवस उपोषणाचे आवाहन आणि ‘जय जवान जय किसान’ ही घोषणासुद्धा नेहरूद्वेषाच्या भरात विसरली गेली की काय? की, धर्म ही अफूची गोळी आणि राजकारण हे त्यावरील गोड आवरण, इतकेच खरे?
– रंजन र. इं. जोशी, ठाणे
चिं. वि. जोशी यांचा तिसरा देश!
‘गलिव्हरचे मर्म’ हे शनिवारचे संपादकी (३१ ऑक्टोबर) वाचले. त्यात म्हटल्याप्रमाणे खरोखरच गलिव्हरचे अनुभव केवळ बाल/किशोरांच्या आकलनास मोहवणारे, कल्पनेस पंख लावणारे एवढ्यापुरते मर्यादित नसून त्यात राजकीय आशयही आहे. याच लेखात, ‘आपल्याला माहीत असलेला गलिव्हरचा प्रवास दोन देशातच आटोपतो’ असाही उल्लेख आहे. परंतु मराठीतील सुप्रसिद्ध विनोदी लेखक चिं. वि. जोशी यांनी ‘आंधळ्यांचा देश’ नावाची एक कथा लिहिली आहे. ती माझ्या आठवणीप्रमाणे ‘गलिव्हर्स ट्रॅव्हल्स’ यावर आधारित आहे. त्यात तिसर्या देशाचा उल्लेख आहे.
या कथेत ‘बोगोटा’ हा नायक डोंगराच्या पलीकडे आंधळ्याच्या देशात चुकून जातो. तेथील सर्वजण आंधळे असतात. डोळ्याच्या जागी केवळ खाचा असतात. हे लोक नायकाला पकडतात. त्याच्या बोलण्यातील ‘दिसणे, पाहणे, दृष्टिक्षेप, नजर’ वगैरे आंधळ्यासाठी अनाकलनीय शब्दांनी त्याला ते वेडा ठरवतात. त्याचे डोळे चाचपडून पाहतात व ते नष्ट करण्याचा निर्णय घेतात. जेणेकरून बोगोटा त्यांच्या दृष्टीने शहाणा होईल, आंधळ्यांना वाटते. परंतु सुदैवाने बोगोटाच्या प्रयत्नास यश येऊन तो आपली सुटका करून घेतो, आपल्या मुलखात परत येतो.
जोनाथन स्विफ्ट लिखित ‘गलिव्हर्स ट्रॅव्हल्स’च्या तिसर्या वा चौथ्या भागात या अंधदेशाचा उल्लेख असेल किंवा नसेलही; पण समाजाबद्दल आणि राजकीय मतांबद्दलही वेळोवेळी कथात्म लिखाणातून नर्मविनोदी भाष्य करणारे चिं. वि. जोशी यांनी मराठी वाचकांना ‘तिसरा देश’ दाखवला होता, याची नोंद व्हावी!
– रा. शं. ताकमोगे, पनवेल
