‘अर्थाग्नीचा भडका’ हा अग्रलेख (१४ ऑक्टोबर) वाचला. परकीय गुंतवणूक घटत असताना आणि जागतिक युद्धस्थितीमुळे महागाईचा भडका उडालेला असताना, केवळ अनिवासी भारतीयांच्या ठेवींच्या भरवशावर रुपया सावरण्याचे केंद्र सरकारचे व रिझर्व्ह बँकेचे गणित साफ चुकताना दिसते. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील भूमिकेचा बदल झाला आहे.

आज जे सत्तेत आहेत, ते जेव्हा विरोधक होते तेव्हा महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून तत्कालीन सरकारवर तुटून पडत असत. आंदोलने केली जात असत. मात्र आज स्वत: सत्तेत आल्यावर त्याच ज्वलंत प्रश्नांवर मौन बाळगले जात आहे. सत्ताधार्‍यांचे आर्थिक संकटांकडे दुर्लक्ष झाले आहे. वाढती महागाई, तरुणांमधील बेरोजगारी आणि देशातील दुष्काळसदृश परिस्थिती यांमुळे सामान्य माणूस होरपळत आहे. परंतु सरकार आणि रिझर्व्ह बँक ठोस उपाययोजना करण्याऐवजी केवळ आकडेवारीचे खेळ खेळण्यात व्यग्र आहेत.

राजकीय फायद्यासाठी सामाजिक मुद्द्यांचा बळी दिला जात आहे. केवळ राजकीय यशापयशावर आणि निवडणुकांवर लक्ष केंद्रित करून देशाच्या मूळ आर्थिक समस्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे की काय, अशी शंका सामान्यांच्या मनात निर्माण होत आहे. जर हे चित्र असेच राहिले, तर बेरोजगारी आणि महागाईचा हा भडका देशाच्या अर्थव्यवस्थेला आणखी गर्तेत नेईल. सरकारने तातडीने अंतर्गत उत्पादन वाढवणे, रोजगारनिर्मिती आणि महागाई नियंत्रणासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

अभिजीत रजपूत, सांगली

कष्टाचे मोल सुरक्षित राहील?

‘अर्थाग्नीचा भडका’ हा अग्रलेख वाचला. एमपीएससी पेपरफुटीप्रकरणी  विद्यार्थ्यांचे आंदोलन असो की दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) आंदोलन असो, या संतापामागे एकच भावना आहे, ती म्हणजे दिवस-रात्र मेहनत करून (तो अभ्यास असो, शेती असो वा अन्य कुठलेही काम) केवळ प्रशासकीय पातळीवरील अनागोंदी आणि भ्रष्टाचारामुळे त्यावर पाणी फिरत असेल तर ते स्वीकारार्ह नाही! या अस्वस्थतेमागे मुख्य कारण असते ते अर्थकारण!

शेअर बाजारात अधिक पैसा मिळेल म्हणून गुंतवणूक करावी आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे त्याची माती व्हावी यामागेही असते ती केवळ आर्थिक अस्वस्थता आणि आपण काहीच करू शकत नाही ही हतबलता! शेअर बाजार ज्या वेगाने आपटतो त्या वेगाने वर जात नाही, परिणामी विक्रमी चलनवाढ, रुपयाच्या अवमूल्यनाचे विदारक सत्य समोर आणणारी आहे. ही कुरूपता झाकण्यासाठी वरवर केले जाणारे उपाय हेच हाताबाहेर गेलेल्या बेरोजगारीचे आणि महागाईचे कारण आहे. महागाईचा कडेलोट झाल्यामुळे एकंदरच युद्धसदृश सामाजिक परिस्थिती निर्माण झाली, हे आताचे भीषण वर्तमान आहे. रोज कोणत्या ना कोणत्या आवश्यक वस्तूचे दर वाढत आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे दर प्रक्षोभास कारण ठरत आहेत.

ठिकठिकाणी चाललेली आंदोलने ही त्याचीच परिणती. ज्ञानेश कुमार आणि पेपरफुटी ही केवळ निमित्ते आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँकेबरोबरच सरकारनेही महागाई आणि चलनवाढ यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही तरी उपाययोजना करणे क्रमप्रपात आहे. पण तसे काही सरकार करताना दिसत नाही, ही वेगाने वाढत जाणार्‍या अर्व्यवस्थेची शोकांतिका. अशाने लोकांच्या कष्टाचे मोल सुरक्षित कसे राहणार? अनिरुद्ध बर्वे, कल्याण</strong>

महागाई नियंत्रणासाठी उपाययोजना हव्या

‘अर्थाग्नीचा भडका’ हे संपादकीय (लोकसत्ता- १४ ऑक्टोबर) वाचले. आज शेअर बाजारातील घसरण आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घसरते मूल्य ही केवळ आर्थिक आकडेवारी नसून त्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या आयुष्यावर होत आहे. रुपया घसरला की इंधन, आयात केलेल्या वस्तू आणि उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल महागण्याची शक्यता वाढते. परिणामी वाहतूक खर्चापासून दैनंदिन गरजेच्या वस्तूंपर्यंत प्रत्येक गोष्टीवर महागाईचा ताण जाणवतो.

एक गुंतवणूकदार म्हणून बाजारातील घसरण निश्चितच चिंताजनक आहे. सामान्य माणूस आपल्या कष्टाच्या पैशांतून भविष्यासाठी गुंतवणूक करतो. अशा वेळी बाजारातील अनिश्चितता त्याच्या आर्थिक सुरक्षिततेबद्दल प्रश्न निर्माण करते. मात्र केवळ बाजारातील चढ-उतारांकडे न पाहता देशाच्या आर्थिक धोरणांचा दीर्घकालीन परिणाम समजून घेणेही आवश्यक आहे. जागतिक परिस्थितीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असला, तरी सरकारने निर्यात वाढवणे, देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देणे, रोजगारनिर्मिती करणे आणि महागाई नियंत्रणात ठेवणे यांवर ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. भारताची अर्थव्यवस्था सक्षम होण्यासाठी केवळ आश्वासनांपेक्षा परिणामकारक कृती महत्त्वाची आहे. आर्थिक विकासाचा खरा अर्थ तेव्हाच साध्य होईल, जेव्हा त्याचे फायदे सामान्य नागरिकांच्या जीवनात दिसतील आणि त्यांना आर्थिक स्थैर्याचा विश्वास वाटेल. कोमल डफळ, वसई

अर्थनिरक्षर ठेवण्यातच धन्यता

‘अर्थाग्नीचा भडका’ हा अग्रलेख वाचला. आपल्याकडे अर्थसाक्षरता फारशी नाही. शेअरबाजार वर गेला की खाली आणि रुपया घसरला की चढला यावर अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करा हे पंतप्रधानांनी आपल्याला २०१४ मध्येच पटवून दिले. मनमोहन सिंग हे भारतातले सर्वांत बुद्धिमान व लोकाभिमुख अर्थतज्ज्ञ होते, पण त्यांनी देशाचे नुकसान केले यावर आपण विश्वास ठेवला आणि विद्यमान सरकार निवडून दिले. या सरकारने कोणत्याही नियोजनाशिवाय नोटा बदलून आपल्या कार्यक्षमतेची चुणूक दाखवली. पुढे, दरवर्षी काही लाख कोटी रुपये काढून घेत रिझर्व्ह बँकेत फारसा ‘रिझर्व्ह’ राहणार नाही याची दक्षता घेतली. जीएसटी विधेयकात शेकडो दुरुस्त्या करून जनतेच्या प्रश्नांप्रति आपण किती ‘सजग’ आहोत हे दाखवून दिले. अर्थमंत्र्यांबद्दल तर न बोलणेच बरे. सर्व सामाजिक व राजकीय प्रश्नांचे मूळ आर्थिक प्रश्नांत असते (८५ कोटी लोकांना फुकट अन्न देऊन हे प्रश्न सोडवता येत नाहीत) आणि दुर्दैवाने आपली शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांना अर्थनिरक्षर ठेवण्यात धन्यता मानते. यात काही सुधारणा होईल अशी आशा बाळगणे एवढेच आपल्या हाती. डॉ. चंद्रकांत संकलेचा, नाशिक

देशाच्या सुरक्षेपेक्षा मोठे काय?

‘‘हनी ट्रॅप’विरोधात संरक्षण दलाचे ‘ऑपरेशन फायर वॉल’ आहे तरी काय?’ हे ‘विश्लेषण’ वाचून प्रकर्षाने जाणवले की राष्ट्रसुरक्षेचा मंत्र घेतलेले अशा हनी ट्रॅपमध्ये कसे काय अडकतात? जेव्हा कुणीही देशाच्या संरक्षण विभागात भरती होते तेव्हा त्या व्यक्तीने तनमनधन अर्पून देशाची सेवा करणे अपेक्षित असते, मग कालांतराने ही मंडळी हनी ट्रॅपमध्ये कशी काय अडकतात? संपूर्ण देश ज्यांच्याकडे आदराने बघतो, मान देतो त्यांना असे देशद्रोही कृत्य कसे करावेसे वाटते, कोण जाणे. संरक्षण साधनांची माहिती, नकाशे देणे हा देशद्रोह आहे, हे त्यांना कळत नाही का? ‘ब्लॅकमेल’ करण्याजोगी कृत्ये का करावीत? आणि ब्लॅकमेलमुळे एखादी लपवण्याजोगी गोष्ट समजा उघड झाली तर जे काही होईल ते देशाच्या सुरक्षेपेक्षा मोठे कसे काय? संरक्षण दलातील सर्वांचे वेळोवेळी मानसशास्त्रीय समुपदेशन व अवलोकन होणे अत्यावश्यक आहे. माया भाटकर, बाणेर (पुणे)

अज्ञातवासातील गृहमंत्र्यांचे पुनरागमन

‘राहुल गांधींनी पराभवासाठी तयार राहावे!’ ही गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याची बातमी (लोकसत्ता- १४ ऑक्टोबर) वाचली. ‘पेलेट गन’ वापरानंतर अज्ञातवासात गेलेले गृहमंत्री राजकारणात पुनरागमन करण्याच्या बेतात असल्याचे संकेत दहा-पंधरा दिवसांतील घडामोडी पाहता मिळत होते. यानिमित्ताने, शहांची पडद्याआड डावपेच आखून व सारा सारीपाट आपल्या बाजूचा झाल्यावरच त्याबाबत वाच्यता करण्याच्या, या रणनीतीची पुन्हा एकदा उजळणी झाली. याला विरोधक धक्कातंत्राने उत्तर देतात की आपला ढिसाळपणा जगासमोर मांडतात, हे पाहायचे. एकंदरीत, ‘मी परत आलोय!’ हे सिद्ध करण्याच्या नादात सामान्य जनता भरडली जाणार नाही, याचे भान ठेवणे हे आजच्या परिस्थितीत महत्त्वाचे वाटते.  शैलेश पुरोहित, मुंबई</strong>