‘वावदूक आणि वानप्रस्थ’ हा अग्रलेख (१० जुलै) वाचला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सध्या वानप्रस्थाकडे जाण्याची गरज आहे. विशेष हे, की त्यांना वानप्रस्थाकडे नेण्यासाठी तेथील जनता आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर वापर करत आहे. वाढत्या वयाच्या पार्श्वभूमीवर त्यांची स्मरणशक्ती, निर्णयक्षमता आणि मानसिक तंदुरुस्ती या विषयांवर माध्यमे, तज्ज्ञ तसेच नागरिक खुलेपणाने चर्चा करू शकतात, ही लोकशाही व्यवस्थेची महत्त्वाची बाजू. यातून लोकशाहीची खरी ताकद दिसून येते. -मयूरी मूलमुले, नाशिक
हा उथळपणा आश्चर्यकारक
‘‘इंट्युशन कोर्स’ची आधुनिक बुवाबाजी!’ हा लेख (१० जुलै) वाचला. मुलांवर असे प्रयोग करण्यापूर्वी पालकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून चिकित्सा करावी, असे वाटते. अभिनेत्री हेमामलिनी करत असलेल्या जाहिरातीचा उल्लेख लेखात केला हे उत्तम झाले. या बाई खासदार आहेत, मात्र जाहिरात करतात ‘वॉटर प्युरिफायर’ची. पण नागरिकांना पिण्यायोग्य पाणी सहज उपलब्ध व्हावे, यासाठी त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे नाही का? ही माणसे इतकी उथळ कशी? -धनंजय मदन, पनवेल</p>
वैज्ञानिक पडताळीस सामोरे जा
‘‘इंट्युशन कोर्स’ची आधुनिक बुवाबाजी!’ हा लेख (१० जुलै) वाचला. स्पर्धेच्या दडपणाखाली अनेक पालक मुलांच्या नैसर्गिक विकासापेक्षा त्यांना ‘असामान्य’ बनविण्यामागे लागतात. याच असुरक्षिततेचे रूपांतर काही संस्था आर्थिक संधीत करतात. याहून गंभीर बाब म्हणजे अशा दाव्यांना प्रसिद्ध व्यक्तींचे समर्थन लाभणे. समाजातील प्रभावशाली व्यक्तींनी कशाचाही प्रचार करण्यापूर्वी त्यामागील वैज्ञानिक पुराव्यांची जबाबदारीने छाननी करणे अपेक्षित असते. एखादा दावा खरोखरच मानवी मेंदूविषयीच्या आपल्या विद्यमान ज्ञानाला आव्हान देत असेल, तर तो संशोधनासाठी सुवर्णसंधी ठरला पाहिजे. अशा दाव्यांनी नियंत्रित, वस्तुनिष्ठ आणि स्वतंत्र वैज्ञानिक पडताळणीला सामोरे जाणे हीच त्यांची खरी परीक्षा आहे. -रोहिणी गुट्टे, धुळे</p>
विज्ञाननिष्ठा हाच उपाय
अनेकांना काहीही प्रयास न करता आपले भले व्हावे असे वाटत असते. त्यासाठी ते कोणाची ना कोणाची कृपा, मंत्रपठण, अंकशास्त्र, फलज्योतिष अशा अ-वैज्ञानिक मार्गावर धावत असतात. अपयशासाठी आपला आळस, अपात्रता किंवा स्वभाव यांचा विचार न करता ग्रहदशा, प्रारब्ध, पूर्वजन्मीचे पाप इत्यादींना जबाबदार धरतात. त्यामुळे तात्पुरता मानसिक दिलासा मिळतो, पण समस्येचे योग्य उत्तर मिळत नाही. नवरा-बायकोची भांडणे होत असतील तर समुपदेशकाऐवजी तथाकथित ‘वास्तुशास्त्रज्ञा’चा सल्ला घेतात. मुलांचे भविष्य उत्तम घडावे यासाठी दिसेल त्या कोर्सच्या चरकातून त्यांना पिळून काढतात. बुवा-बाबा आणि ज्योतिषांची त्यामुळे चलती असते. मुलांना लहानपणापासूनच विज्ञाननिष्ठ विचारांची शिकवण देणे हाच यावर उपाय आहे. -डॉ. शरद अभ्यंकर, वाई
महिलेचा प्रश्न, नेहरूंचे उत्तर…
‘सत्ताधार्यांना विरोधक अजिबातच नकोत?’ हा ‘अन्वयार्थ’ (१० जुलै) वाचला. विरोधकांची शक्य त्या सर्वप्रकारे मुस्कटदाबी करायची, मात्र मुखातून लोकशाहीचे गोडवे गायचे (संधी मिळेल तेव्हा ७५ च्या आणीबाणीच्या नावाने गळे काढायचे.) हे या सत्ताधार्यांचे धूर्त धोरण आहे. या पार्श्वभूमीवर ‘अन्वयार्थ’मधील पंडित नेहरूंचा किस्सा त्यांच्याविषयी आदर वाढवणारा आहे. त्यांचे लोकशाहीवरील प्रगाढ प्रेम व आस्था आणि त्याचाच भाग म्हणून टीकाकार, विरोधकांचा सन्मान याचे अनेक किस्से वाचनात आले. त्यातील हा एक..
संसदेच्या आवारात एका सामान्य महिलेने नेहरूंना विचारले, ‘तुम्ही पंतप्रधान झालात, पण आमच्यासारख्या सामान्यांना या लोकशाहीने काय दिले?’ नेहरू किंचितही न रागावता काहीसे स्मितहास्य करीत म्हणाले, ‘या देशाच्या पंतप्रधानाला जाब विचारण्याचे स्वातंत्र्य दिले’. विदेशातील महत्त्वाचे पाहुणे भारताच्या दौर्यावर येत, तेव्हा नेहरू त्यांची सर्वांत प्रथम विरोधी पक्षनेत्याशी ओळख करून देत. आजच्या काळात हे सर्व स्वप्नवत वाटते. -अनिल मुसळे, ठाणे</p>
