‘राजकारणाबाबत उदासीन राहू नका…’ हा अतुल कुलकर्णी आणि गिरीश कुबेर यांच्या गप्पांचा संपादित सारांश (रविवार विशेष- १२ सप्टें.) समकालीन राजकारण आणि समाजमनाला आरसा दाखवणारा आहे. अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतरच्या कालखंडाचा विचार केल्यास, या मधल्या काळात जनतेने ‘सत्ताधारी जे करत आहेत ते योग्यच’ असा बचावात्मक पवित्रा घेतला. व्यवस्थेशी जुळवून घेतले. प्रश्न विचारण्याऐवजी प्रवाहासोबत वाहून जाणे लोकांनी पसंत केले. पण आजची तरुण पिढी पूर्णपणे निरुत्साही नाही. ‘नीट’ परीक्षेतील गैरप्रकार असोत वा रोजगाराचे प्रश्न, तरुण वर्ग वेगवेगळ्या मुद्द्यांवरून रस्त्यावर उतरत असल्याचे दिसत आहे. राजकारण ही केवळ निवडणुकीची औपचारिकता नसून तो जगण्याचा प्रश्न आहे, हे नव्या पिढीला समजत आहे. या गप्पांमधला आणखी एक उल्लेखनीय मुद्दा कला आणि राजकीय बांधिलकीचा. कलाकारांनी सामाजिक वास्तवावर भाष्य करणे गरजेचे असताना, व्यावसायिक सुरक्षिततेपोटी भूमिका घेण्याचे टाळण्याची वृत्ती चिंताजनक आहे. कलाकारांची ही मूक संमती समाजाला दिशाहीन करू शकते. राजकारणाबाबत उदासीन राहणे हे अप्रत्यक्षपणे व्यवस्थेच्या गुन्ह्यत सामील होण्यासारखे आहे. – परेश संगीता प्रमोद बंग, मूर्तिजापूर (जि. अकोला)
वाढदिवस कुणाचा… आरती कशाची?
‘पंतप्रधानांच्या वाढदिवशी मुंबईत महाआरती’ ही बातमी (लोकसत्ता- १३ सप्टेंबर) वाचली. हे आवाहन गणेशोत्सव समन्वय समितीने केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त भाजपने देशभर महिनाभराचे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेतच; परंतु कोणत्याही एका पक्षाची नसलेल्या ‘मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती’ने पंतप्रधानांच्या वाढदिवशी महाआरती करण्याचे जे काही आवाहन केले आहे त्यामागील बोलविते धनी कोण, असा प्रश्न उपस्थित होतो. असेही मागील काही वर्षे गणेशोत्सव मंडळांनी समाजप्रबोधनाची रुळलेली वाट सोडून इव्हेन्टीकरणाची वाट चोखाळली आहेच; त्यात आता मोदींच्या वाढदिवशी महाआरती सारख्या उपक्रमांनी राजकीय तसेच प्रतिमासंवर्धनाचे रंग भरले जात आहेत.
त्याआधीच समर्थक मंडळींकडून मोदींना विष्णु अवतार म्हटले जाऊ लागले होते. एकूणच काय तर ‘देव देव्हार्यात आणि ‘भक्त’ उन्मादात!’ असे हे चित्र आहे. केवळ वाढदिवस नव्हे, इतरही अनेक नैमित्तिक कारणांनी े मोदींच्या प्रतिमा संवर्धनातून प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकारास प्रॉडक्ट जेवढे खराब तेवढी जाहिरात अधिक, असे म्हणावे का? – बाळकृष्ण शिंदे, पुणे
इतके दिवस बिनबोभाट?
‘अडतीस लाखांचे खवा-पनीर जप्त’ ही एफडीएच्या कारवाईची बातमी (लोकसत्ता- १२ सप्टें.) वाचून पुणेकरांच्या आरोग्याची काळजी असलेल्या एफडीएचे कौतुक करावे की आजपर्यंत असे भेसळयुक्त पनीर-खवा खाऊनसुद्धा पुणेकर स्वस्थ कसे काय याचे आश्चर्य करावे हे कळेना. हे ट्रक कर्नाटकातून आत्ता पहिल्यांदाच आले का? की आत्तापर्यंत येत असतानाही त्यांकडे काणाडोळा केला जात होता, हे ‘एफडीए’च्या धुरिणांनीच सांगणे आवश्यक आहे. बिनबोभाट हे पदार्थ येऊ देणार्या व विक्री करणार्या सर्वांचीच जबाबदारी निश्चित करण्यात प्रशासनाला रस नाही की एवढी काळजी घेण्यास वेळ नाही? वास्तविक बेफिकीर उत्पादक आणि व्यापार्यांना कायमचे काळ्या यादीत टाकायला हवे. – श्रीपाद पु्. कुलकर्णी, पुणे
व्याख्यानांची आज गरज अधिक
श्री गणेशाचे आगमन आता झाले आहे. या सोहळ्यात पर्यावरण संवर्धन, जल साक्षरता आणि जल नियोजन, वाढत्या लोकसंख्येने निर्माण केलेल्या समस्या, जातीयवाद, अंधश्रद्धांचा विळखा अशा ज्वलंत विषयांवर तज्ज्ञ/अभ्यासू व्यक्तींची व्याख्याने आयोजित करावीत आणि ‘डीजेयुक्त’ मनोरंजनास प्रबोधनाची जोड द्यावी, ज्यामुळे जनमानसात महत्वाच्या समस्यांवर व्यापक प्रमाणावर जनजागृती होईल. याची आज कधी नव्हे एवढी गरज आहे. ज्या मंडळांना शक्य आहे त्यांनी या विषयांवर परिसंवादही आयोजित करण्यास हरकत नाही. – अशोक आफळे, कोल्हापूर
loksatta@expressindia.com
