‘तोतरी तटस्थता!’ हा संपादकीय लेख (१७ जून) वाचला. भारताच्या विदेश नीतीच्या सद्या:स्थितीचे वर्णन तटस्थतेपेक्षा ‘असहायता’ असे करणे अधिक योग्य ठरेल. इराण आणि रशिया हे भारताचे दीर्घकाळाचे मित्र आहेत. संयुक्त राष्ट्रांत काश्मीर प्रश्नावर पाठिंबा देणे असो अथवा १९७१ च्या युद्धात पाठिंबा देणे असो. बांगलादेश निर्मितीत भारताचा सिंहाचा वाटा होता, तरीही तो देश विरोधी भूमिका घेत आहे.
भारताने शीतयुद्ध काळात तटस्थ देशांचे नेतृत्व केले. १९९० नंतरच्या मुक्त आर्थिक धोरणांनंतर २०१४ पर्यंत भारताला वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून जगात मानाचे स्थान होते. २०१४ नंतर विविध देशांच्या नेत्यांनी भारताला भेटी दिल्या, त्यांना झोपाळ्यावर झुलवले, गंगा आरती करवली तसेच आपल्या पंतप्रधानांनी विविध देशांना भेटी दिल्या, तेथील नेत्यांना मिठ्या मारल्या. परंतु रशिया-युक्रेन, इस्रायल-पॅलेस्टाईन आणि आता इस्रायल-इराण या युद्धांत जगातील सर्वांत मोठी लोकशाही भूमिकाविहीन ठरली. ज्या ट्रम्प महाशयांनी निवडणूक जिंकावी म्हणून साक्षात मोदींनी ‘अब की बार’चा नारा दिला होता, त्यांनी शपथविधीसाठीही निमंत्रण दिले नाही, उलट बेकायदा स्थलांतरितांना भारतात पाठवले, थेट मोदींसमोरच व्यापाराच्या अटी सुनावल्या. एकूणच भारताला शेजारी देश अथवा मित्रदेशांशी संबंध सुधारता तर आले नाहीत; परंतु होते ते टिकवताही आले नाहीत.- अॅड. वसंत नलावडे, सातारा
हे अमेरिकेच्या इराक आक्रमणासारखेच
‘तोतरी तटस्थता!’ हा अग्रलेख (१७ जून) वाचला. इराणची अत्याधुनिक आणि अभेद्या अणुसंयंत्रे उद्ध्वस्त करण्याची क्षमता इस्रायलकडे नाही. अमेरिकेच्या मदतीशिवाय हे शक्य नाही आणि ट्रम्प व्यापारी वृत्तीचे असल्याने ते आपला फायदा पाहूनच भूमिका घेतील. इराकवर ‘विनाशकारी शस्त्रास्त्र’ बाळगल्याचा आरोप करून अमेरिकेने जे हल्ले केले, त्याच पठडीतला प्रयत्न आता इराणविरोधात इस्रायलकडून होत आहे. त्या शस्त्रांचा इराकमध्ये काहीही मागमूस लागला नव्हता, कारण ती अस्तित्वातच नव्हती! इस्रायलच्या आक्रमक भूमिकेमागेही काही ठोस पुरावा नाही. या पार्श्वभूमीवर भारताची ‘तटस्थ’ भूमिका ही अधिकच धोकादायक ठरते. इराणने भारताला अनेकदा मदतीचा हात दिला- चाबहार बंदर, अफगाण मार्ग, तेलपुरवठा ही त्याची ठळक उदाहरणे. याउलट इस्रायल आणि अमेरिका, हे केवळ स्वार्थाधिष्ठित देश आहेत. युद्धामुळे आंतरराष्ट्रीय खनिज तेल बाजार अस्थिर होतो. त्याचा थेट फटका भारतासारख्या देशांना बसतो. या पार्श्वभूमीवर ‘तटस्थ’ राहणे म्हणजे डोळेझाक होय, दूरदृष्टी नव्हे. भारताने आता शांततेसाठी ठाम भूमिका घ्यावी.-तुषार रहाटगावकर, डोंबिवली
सरकारने निर्भीड भूमिका घ्यावी
‘तोतरी तटस्थता!’ हा अग्रलेख वाचला. इराण आणि इस्रायलच्या संघर्षात जास्त कोणाची अडचण होत असेल तर भारताची. इराण हा भारताचा मित्र असला तरी इस्रायलही शत्रू नाही. इराण हा इस्रायलपुढे शरण येणार नाही कारण इस्रायलचा एकमेव हुकमी एक्का फक्त अमेरिका आहे, पण अमेरिकेनेही या युद्धातून अंग काढून घेतले आहे. इस्रायलपुढे युद्ध थांबविण्याशिवाय पर्याय नाही. पण युद्धखोरीची खुमखुमी रोमारोमांत भिनलेली असल्यामुळे इस्रायल सहजासहजी माघार घेणार नाही आणि आपलाच विध्वंस करून घेईल. भारताची अवस्था अडकित्त्यात सापडल्यासारखी झाली आहे. केंद्रीय नेतृत्वाची अमेरिकेबाबत बोटचेपी भूमिका आहे. इराण काही भारतावर अवलंबून नाही उलट आपणच त्यांच्यावर अवलंबून आहोत. अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध लादले तेव्हा स्वस्तात इंधन पुरवठा तोही रुपयात इराणानेच केला होता, याची जाणीव ठेवून भारत सरकारने निर्भीडपणे इस्रायलविरुद्ध ठाम भूमिका घेणे अपेक्षित आहे, अन्यथा ‘तेलही गेले आणि तूपही गेले’ अशी अवस्था होईल.- अनिरुद्ध बर्वे, कल्याण
आपणही तेवढेच जबाबदार!
‘बेजबाबदार आणि बजबजपुरी’ हा ‘अन्वयार्थ’ (१७ जून) वाचला. एखादी घटना घडली आणि त्यात जीवितहानी झाली की सरकारी यंत्रणेवर खापर फोडले जाते. सरकारी यंत्रणा जेवढी त्या घटनेस जबाबदार असते तेवढेच आपणही जबाबदार असतो. मुंब्रा रेल्वे अपघातात डब्याच्या दरवाजात जे उभे होते ते एकमेकांवर घासल्यामुळे तोल जाऊन खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. आज-काल तरुण-तरुणी रिल्स बनवण्याच्या नादात आपले जीव गमावून बसतात. पावसाळी पर्यटनातून आनंद मिळतो पण त्या स्थळी भेट दिल्यानंतर तेथील परिस्थितीची पूर्ण माहिती न घेता मजेत मग्न होणे, लावलेल्या सूचना फलकाकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. त्यातून अनेक दुर्दैवी घटना घडतात. याच आठवड्यात दोडामार्ग तालुक्यातील मांगेली गावात उच्च दाबाच्या मोकळ्या विद्याुतवाहिनीचा शॉक लागून दोन सख्ख्या भावांपैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जबर जखमी झाला. अशा घटना घडू नये म्हणून संबंधित सरकारी यंत्रणेने खबरदारी वेळीच घ्यायला हवी. कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल बांधण्यासाठी निविदा निघाली होती, मग वर्क ऑर्डर काढण्यास विलंब झाला? यासंदर्भात चौकशी करून जबाबदार व्यक्तीवर कारवाई करणे गरजेचे आहे.-दत्ताराम गवस, कल्याण
दोष नेमका कोणाचा?
‘बेजबाबदारपणा आणि बजबजपुरी’ हा अन्वयार्थ (१७ जून) वाचला. नुकताच अहमदाबाद लंडन विमानाला अपघात होऊन, अनेक माणसे मरण पावली. ती घटना ताजी असतानाच, पुणे मावळ येथील नदीवरील पूल कोसळून, काही जणांचा मृत्यू झाला. पाठोपाठ केदारनाथ येथे हेलिकॉप्टर कोसळून, काही जण प्राणास मुकले. या दुर्दैवी घटना पाहता, सरकार नावाची चीज शिल्लक आहे की नाही, याची शंका येते. एखादी दुर्घटना घडली की, सरकारकडून शोक व्यक्त केला जातो. मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत घोषित केली जाते. तसेच या घटना पुन्हा घडू नयेत याची खबरदारी घेतली जाईल, असे सरकारतर्फे सांगण्यात येते, परंतु तरीही कालांतराने या घटना घडतातच. कारण समस्या समूळ नष्ट केली जात नाही. एखादी इमारत किंवा पूल कोसळला तर त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले नव्हते, ते आता केले जाईल असे सांगण्यात येते, पण धोकादायक पूल पूर्णपणे बंद का केला जात नाही? जिथे गर्दी व्यवस्थापनाचा मुद्दा येतो, त्या ठिकाणी पोलीस आपली कामगिरी चोखपणे पार पाडत असतात. उदा: देवस्थान रांगेत उभे राहून दर्शन घ्यावे, हा साधा नियम आहे. परंतु तरीही उतावीळ भाविक ढकलाढकली करतात. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन अनेकांचा जीव जातो. दुसरी गोष्ट म्हणजे धबधब्याच्या ठिकाणी तसेच महाकाय समुद्र किनारे. खोल पाण्यात जाऊ नये, अशी पोलिसांकडून वारंवार सूचना दिली जाते, मात्र उन्मत्त आणि बेफाम तरुण आदेश धुडकावून खोल पाण्यात उतरतात. जे व्हायचे तेच होते. यात दोष कोणाचा? सरकार पोलीस की सामान्य जनतेचा?- गुरुनाथ मराठे, बोरिवली (मुंबई)
भव्य पुतळ्याचा पाया भक्कम नको?
‘मालवणमध्ये शिवरायांच्या पुतळ्याजवळ जमीन खचली’ ही ‘लोकसत्ता’मधील बातमी (१६ जून) वाचली. मागच्या वेळी पुतळा आपटे नावाच्या शिल्पकाराकडून बनवून घेतला होता. त्यावेळी त्यांच्यावर खटला भरला गेला, अटक आणि जामिनावर सुटका झाली, म्हणून आता प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्याकडून नवीन पुतळा तयार करून मालवणमध्ये गाजावाजा करून बसवण्यात आला. परंतु आता या पुतळ्याजवळ जमीन खचल्याचे समोर आले आहे. मागील वेळी शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या गोष्टीला महिनाही उलटला नसताना पहिल्याच पावसात चबुतऱ्यालगतची जमीन खचल्याचे निदर्शनास आले आहे. आता पुन्हा चौकशी, अहवाल या गोष्टी क्रमानेच आल्या आहेत. कदाचित त्यात जोत्याचे काम एका कंत्राटदाराला, चबुतऱ्याचे काम एका कंत्राटदाराला आणि पुतळ्याचे काम एकाला असेही झाले असेल. एवढा मोठा पुतळा उभारायचा म्हणजे त्याचा पाया, जोत्याचे काम मजबूत नको का? ज्या ठिकाणी पुतळा उभा केला त्या ठिकाणच्या जमिनीचे परीक्षण नीट केले नव्हते का?- शुभदा गोवर्धन, ठाणे