‘बुद्धिवंतांचे ब्रेनवॉश!’ हा अग्रलेख (१३ नोव्हेंबर) वाचला. ‘आपले’ किंवा ‘त्यांचे’ लोक अभियंता किंवा डॉक्टर होतात ते त्यांनी या विषयांत घेतलेल्या उच्च शिक्षणामुळे. या शिक्षणाचा उद्देश गुणवान ‘मानव’ निर्माण करणे हा सहसा नसतो. असे लोक दहशतवादाचा आश्रय घेतात ते मुख्यत: त्यांच्यावरील कौटुंबिक, धार्मिक, सामाजिक संस्कारांमुळे आणि बदलत्या राजकीय, धार्मिक वातावरणामुळे, तणावामुळे. आपल्या देशात दहशतवादाचा शिरकाव झाला तो खलिस्तान, काश्मीर समस्यांनंतर, हे विसरून चालणार नाही.
‘आपण’ आणि ‘ते’ या वृत्तीस धर्माबरोबरच आणखी एक पुरातन आयाम लाभला आहे तो आहे जातींचा. त्यानुसार ‘आपल्या’तच अजून एक ‘ते’ वर्गदेखील असतो. यात सर्व वंचित बहुजन या कथित ‘खालच्या’ जातीत मोडतात. या आयामाचे वैशिष्ट्य असे की यातील ‘आपण’ हे धर्मदत्त जन्माधिकारानुसार १०० टक्के सुशिक्षित, बुद्धिवंत असतात तर वंचित हे शतकानुशतके अनिवार्यपणे अशिक्षित, बुद्धिहीन. आजच्या काळातील दहशतवाद्यांना लाजवतील असे अत्याचार या ‘आपल्या’तील बुद्धिवंतांद्वारे ‘आपल्या’तल्याच ‘त्या’ लोकांवर, विशेषत: अस्पृश्यांवर वर्षानुवर्षे केले जात आहेत. यातून दहशतवादाच्या बाबतीत ‘आपण’ किती ज्येष्ठ, उजवे आणि दुटप्पीदेखील आहेत हे लक्षात येते. थोर समाजसुधारकांमुळे आपल्यातील ‘ते’ जागे झाले, शिकले असले तरी ‘आपले’च जेव्हा डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड पानसरे, डॉ. कलबुर्गी, गौरी लंकेश यांची गोळ्या घालून हत्या करतात, मालेगाव, भावे नाट्यगृह येथे बॉम्बस्फोट घडवतात, विविध ठिकाणी झुंडबळी घेतात, ते का, हा प्रश्न ‘आपल्या’ला विचारला पाहिजे आणि त्याचे प्रामाणिक उत्तर शोधले पाहिजे. तेव्हाच, भारतीय मुस्लिमांनी कोणाच्या कच्छपी लागावे किंवा कसे याबाबत प्रश्न उपस्थित करणे नैतिकतेचे ठरेल.-उत्तम जोगदंड, कल्याण</p>
विशिष्ट समाजाला दोष देणे एकतेस मारक
‘बुद्धिवंतांचे ब्रेनवॉश!’ हा अग्रलेख (१३ नोव्हेंबर) वाचला. समाजात मुस्लिमांबद्दल काही ठरावीक प्रतिमा तयार झाल्या आहेत- ज्या वास्तवाशी पूर्णपणे जुळत नाहीत. काही व्यक्तींच्या चुकीमुळे संपूर्ण समाजावर आरोप होणे अन्यायकारक आहे. इस्लाम धर्माचा खरा संदेश आहे शांती, न्याय आणि माणुसकी. भारतातील बहुसंख्य मुस्लीम शिक्षण, प्रगती आणि देशभक्ती यावर विश्वास ठेवतात. डॉक्टर, शिक्षक, शेतकरी, सैनिक म्हणून हजारो मुस्लीम प्रामाणिकपणे देशाची सेवा करत आहेत. पण काही मोजक्या घटनांवरून संपूर्ण समाजाला दोष देणे, हे समाजातील एकतेला धक्का देणारे ठरते.
आज गरज आहे ती परस्पर विश्वास आणि संवादाची. धर्म, जाती, भाषा यापलीकडे जाऊन आपण सर्वांनी मानवतेचा धर्म जपला पाहिजे. शिक्षण आणि विवेक हाच खरा धर्म आहे. प्रत्येक धर्मामध्ये हाच संदेश देण्यात आलेला आहे. मुस्लीम समाजालाही सुधारणेची आणि आत्मपरीक्षणाची गरज आहे; पण त्यासाठी आधी समानतेचा आणि विश्वासाचा हात पुढे येणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक घटक एकत्र आला तरच द्वेषावर प्रेमाचा विजय होईल आणि ‘ब्रेनवॉश’ची शक्यता दूर होऊन लोक खुलेपणाने विवेकाधारित विचार करण्यास सक्षम होतील. अंधाराला दोष देत बसण्यापेक्षा दिवा लावणे अधिक शहाणपणाचे नाही का?- पठाण अल्फिया, लातूर
विवेकहीन शिक्षित धोकादायक ठरतील
‘बुद्धिवंतांचे ब्रेनवॉश!’ हा अग्रलेख (१३ नोव्हेंबर) वाचला. आजचे शिक्षण बाह्य चमक वाढवत असले तरी अंतर्गत मूल्ये, नैतिकता आणि विचारशक्ती हरवत चालली आहे. डॉक्टरांसारखे बुद्धिमान लोक दहशतवादात गुंततात आणि अभियंते अंधश्रद्ध बाबांच्या मागे फिरतात, हे आपल्या शिक्षणाच्या अपयशाचे लक्षण आहे. शिक्षणाने केवळ माहिती दिली, पण माणूसपण शिकवले नाही, हीच खरी शोकांतिका आहे.
ज्ञान वाढले पण विवेक कमी झाला, पदव्या वाढल्या पण प्रामाणिकपणा हरवला. शिक्षित लोक धर्म, जाती आणि अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकले आहेत. समाजसुधारकांनी दिलेल्या लढ्यांचा विसर पडत चालला आहे. धर्मांध लोक निर्भयपणे आवाज उठवतात, पण विवेकवादी गप्प राहतात. आपल्याकडे इंजिनीयर लाखो तयार होतात, पण जगाला दिशा देणारे संशोधक नाहीत. कारण शिक्षण स्पर्धेचे झाले आहे, विचारांचे नाही. ज्याला चांगला पगार तो यशस्वी, असा सामाजिक भ्रम निर्माण झाला आहे. शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नसून समाजनिर्मितीसाठी असावे, हे आपण विसरत चाललो आहोत. म्हणून आज गरज आहे ती विचारांना धार देणाऱ्या, अंधश्रद्धा मातीत घालणाऱ्या आणि माणूस घडवणाऱ्या शिक्षणाची. अन्यथा पदवी असलेले विवेकहीन लोकच समाजाला धोका ठरतील आणि त्याची झळ देशाला लागल्याशिवाय राहणार नाही.- सतीश घुले, पाथर्डी
हे शिक्षण पद्धतीचे अपयश
‘बुद्धिवंतांचे ब्रेनवॉश!’ हा अग्रलेख (१३ नोव्हेंबर) वाचला. आपली शिक्षण व्यवस्था काय शिकायचे हे सांगते, पण कशासाठी शिकायचे याची काहीच कल्पना येत नाही. स्पर्धा परीक्षेत नैतिकतेवर विचार मांडणारे विद्यार्थी वास्तवात लाखोंचा हुंडा घेताना दिसतात हा मोठा विरोधाभास आहे. शिक्षित म्हणवली जाणारी व्यक्ती जर दैववाद, प्रांतवाद, धर्मवाद, भाषावाद, दहशतवादात अडकून पडत असेल तर शिक्षण पद्धतीत आपण अपयशी ठरत आहोत हे मात्र नक्की.- कुमार बिरदवडे, छत्रपती संभाजीनगर
प्रचाराचा भर शिक्षणाने ओसरत नाही म्हणून!
‘बुद्धिवंतांचे ब्रेनवॉश!’ हे संपादकीय (१३ नोव्हेंबर) वाचले. अंधविश्वास हा समाजात इतका खोलवर पसरला आहे की त्याला शिक्षणही परावृत्त करू शकत नाही. त्यामुळे भोंदूबाबांच्या मागे कोट्यवधी उधळणारा उच्चशिक्षितही स्वत:चे नुकसान करून घेतो. धर्माच्या प्रभावाखाली असणारे डॉक्टर देशाला वेठीस धरतात तेव्हा ते धोकादायक ठरतात. धार्मिक शिक्षण व प्रचाराचा भर जर शिक्षणाने ओसरत नसेल तर ती चूक कुणाची? देशाला लागलेली दहशतवादाची कीड मुळापासून नष्ट केली पाहिजे आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या शेजारी राष्ट्रांनाही योग्य उत्तर दिलेच पाहिजे.- माया भाटकर, पुणे
वार्षिक परीक्षा पद्धती हाच उपाय
‘परीक्षा न आवडे विद्यापीठांना?’ हा प्रा. संजय खडक्कार यांचा लेख वाचला यामध्ये काही मुद्द्यांची भर घालणे आवश्यक आहे. सध्याची सेमिस्टर पद्धत आणि प्रदीर्घ काळ चालणारी प्रवेश प्रक्रिया यांमुळे दर एक-दोन महिन्यांनी परीक्षा आ वासून उभ्या राहतात. मनुष्यबळाचा व तंत्रज्ञानाचा अभाव या गोष्टी केवळ विद्यापीठांपुरत्या नसून महाविद्यालयांपुढेही हीच आव्हाने आहेत. नवीन शैक्षणिक धोरण, पुन:परीक्षा याही गोष्टी कारणीभूत आहेत. या समस्येच्या मुळाशी गेल्यास वार्षिक परीक्षा पद्धत अंगीकारणे हाच उपाय होणार आहे. गुणांक पद्धतीमध्येदेखील बदल आवश्यक आहेत. सदोष परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय होईल, यात तिळमात्र शंका नाही.- डॉ. अमर कुलकर्णी, बारामती
हा खुल्या गटातील जागेवर ‘कब्जा’ नव्हे
‘आरक्षण म्हणजे गुणवत्तेशी संघर्ष नव्हे!’ हा लेख (१२ नोव्हेंबर) वाचला. आरक्षण गुणवत्तेला नष्ट करत नाही, तर गुणवत्तेला संधी देतो. कारण जर समान संधी मिळाल्या नाहीत, तर गुणवत्ता विकसितच होऊ शकत नाही. आरक्षण हे गुणवत्तेचा संघर्ष नसून सामाजिक समानतेकडे नेणारा मार्ग आहे. एक गरीब ग्रामीण विद्यार्थी आणि एक शहरी संपन्न विद्यार्थी यांना एकाच परीक्षेला बसवले, पण दोघांना मिळालेल्या सुविधा वेगळ्या असतील, तर ती स्पर्धा समान नाही. आरक्षण हा फरक कमी करण्याचा प्रयत्न आहे.
जेव्हा एखादा मागासवर्गीय उमेदवार आपल्या मेहनतीने आणि गुणवत्तेच्या आधारे खुल्या गटातील जागा मिळवतो, तेव्हा तो आरक्षणाचा ‘फायदा’ घेत नसतो, त्याची निवड पूर्णपणे गुणवत्तेवर होते. तो खुल्या गटातील जागेवर ‘कब्जा’ करत नसतो, तर आपल्या परिश्रमाने आणि गुणवत्तेच्या जोरावर ती जागा मिळवत असतो. शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षणाबाबत ‘‘जोपर्यंत अन्याय आणि विषमता आहे, तोपर्यंत आरक्षण हवे’’ असे ठाम मत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केले होते.-स्वप्निल थोरवे, पुणे
