‘चौथा ‘फ’!’ हा अग्रलेख (२७ मे) वाचला. अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने म्हणून इंधन, खते आणि परकीय चलनाची चर्चा वारंवार होते, परंतु हे केवळ वरवरचे तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळे आहेत, ज्यांवर आज ना उद्या योग्य धोरणांच्या माध्यमातून मार्ग काढता येऊ शकतो. मात्र या सर्वांवर कडी करणारा जो चौथा ‘फ’- ‘फसवणुकी’चा आहे, तोच आजच्या व्यवस्थेचा खरा आजार आहे. तोच आत्मवंचनेचा मूळ गाभा वाटतो.
इंधनावरील करातून होणारी नफेखोरी, अनुदानाच्या मृगजळात अडकवलेला बळीराजा आणि परकीय गुंतवणुकीतील धोरणात्मक धरसोड या गोष्टी केवळ आर्थिक अपयश दर्शवत नाहीत, तर हे व्यवस्थेची संवेदनशीलता हरवल्याचे लक्षण आहेत. याहूनही सर्वात भयंकर बाब म्हणजे आभास निर्मितीची वाढती प्रवृत्ती. आपणच जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहोत, असा आभास निर्माण करणे आणि सत्तेत बसलेल्यांनी स्वत:च त्या भ्रमात जगणे, हा आत्मवंचनेचा कळस आहे.
जेव्हा वास्तवाचे भान हरपून केवळ स्वप्नांचा व्यापार सुरू होतो, तेव्हा लोकशाहीचा मूळ पायाच ढासळू लागतो. चौथा ‘फ’ फसवणूक ही केवळ सत्तेची देणगी नाही. तिचे मूळ समाजाच्या स्वत:च्याच प्रवृत्तीत आहे. लोकशाहीत ‘सत्ता आणि सामान्य माणूस’ यांच्यात एक अलिखित, पवित्र नैतिक करार असतो. सामान्य माणसाचे रोजचे जगणे हे कोणत्याही जागतिक स्तरावरील कागदी आकडेवारीवर नाही, तर बेरोजगारी आणि महागाईच्या दाहक वास्तवावर आधारलेले असते. त्यामुळे समाजातील आर्थिक प्रश्न हे केवळ आकड्यांचे खेळ कधीच असू शकत नाहीत, तर ते सत्तेच्या नैतिकतेचे आणि उत्तरदायित्वाचे निदर्शक असतात. विकासाच्या चकचकीत आवरणाखाली हाच नैतिक करार आज आतून पोखरला गेला आहे, हेच वास्तव आणि अंतिम सत्य म्हणून स्वीकारावे लागेल. -संदीप देवरे, मुंबई</p>
रोडावलेली बचत, बोकाळलेला चंगळवाद
‘चौथा ‘फ’!’ हा अग्रलेख (२७ मे) वाचला. २००६ मध्ये भारतावर आर्थिक अरिष्ट आले होते तेव्हा सर्वसामान्यांकडे असलेल्या बचतीने त्यांना तारले होते. पूर्वी प्राप्तिकर वाचतो म्हणून गुंतवणूक केली जात असे. पण आता केलेल्या गुंतवणुकीवर प्राप्तिकरात सूट मिळत नसल्याने देशातली बचतही रोडावत चालली आहे. सरकारच सांगत आहे कर भरा, बचत करू नका. त्यामुळे देशातील तरुणवर्ग चंगळवादी झाला आहे. उद्या मिळणारे पैसे आजच खर्चून मोकळा होतो आहे. सहज मिळणार्या क्रेडिट कार्डमुळे चैनीच्या वस्तू खरेदी करणे सोपे झाले आहे. विश्वगुरू ज्या वेळी झोला उचलून निघून जातील, तोवर जनता देशोधडीला लागलेली असेल, असेच भारताची आजची अवस्था पाहता वाटते. देशाची अवस्था कधी नव्हे इतकी वाईट झाली आहे, देश अनागोंदीच्या काठावर उभा आहे, तरी चौथा ‘फ‘ भक्तांकडून पूर्ण शक्कीनिशी रेटला जात आहे, याचे आश्चर्य वाटते.-धनराज खरटमल, मुलुंड (मुंबई)
फुगवलेल्या दाव्यांचे वास्तव
‘चौथा ‘फ’!’ (दि.२७) हा अग्रलेख वाचला. गेल्या काही वर्षांत घोषणाबाजी, जाहिरातबाजी आणि प्रतिमानिर्मितीला महत्त्व दिले जात असून त्यामुळे वास्तवातील आर्थिक प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. आर्थिक प्रगतीचे दावे करताना बेरोजगारी, महागाई, शेतकर्यांची ओढाताण, वाढती आर्थिक विषमता यांसारख्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे सरकारने देणेही तितकेच आवश्यक आहे. लोकशाही व्यवस्थेत सरकारवर प्रश्न उपस्थित करणे ही माध्यमांची आणि सजग नागरिकांची जबाबदारी आहे. केवळ आश्वासने आणि घोषणांवर अर्थव्यवस्था मजबूत होत नाही; त्यासाठी दीर्घकालीन नियोजन, पारदर्शकता आणि वास्तवाचे भान आवश्यक असते. ‘मेक इन इंडिया’च्या गजरामुळे चीनमधून उद्योग भारतात येतील अशी स्वप्ने रंगवली गेली; परंतु प्रत्यक्षात अनेक उद्योगांनी व्हिएतनाम आणि मलेशियाची वाट धरली. मग घोषणांचे फुगे आकाशात तरंगत राहिले आणि वास्तव जमिनीवरच पडून राहिले. – डॉ. राजेंद्र तांबिले, सातारा
सरकारच्या धोरणांबद्दल भ्रमनिरास
‘चौथा ‘फ’!’ हा अग्रलेख (२७ मे) वाचला. मोदी सरकारच्या धोरणांविषयी आजवर वाटणारा आशावाद आता फोल ठरू लागला आहे. या तीन ‘फ’ च्या बाबतीत सरकारची खरोखरच ‘फ’सगत झाली आहे. हळूहळू विद्यमान केंद्र सरकारबद्दल आणि सरकारच्या धोरणांबद्दल भ्रमनिरास होऊ लागला आहे. विरोधी पक्षातही आनंदी आनंदच आहे. एकूणच ‘आपुलाची वाद आपणाशी’ अशी अवस्था आहे. -सुबोध गद्रे, कोल्हापूर</p>
कंपन्यांना नफा मिळतो कसा?
‘चौथा ‘फ’!’ हा अग्रलेख (२७ मे) वाचला. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनांचे दर वाढले की ग्राहकास वाढीव दर आकारले जातात, मग इंधन स्वस्त झाल्यावर ग्राहकास इंधन स्वस्त दरात मिळणे आवश्यक नाही का? एकीकडे तेल कंपन्या आपल्या वार्षिक ताळेबंदात प्रचंड प्रमाणात नफा दाखवतात, मग तोट्यात तेल विक्री कशी होते, हे कळाले पाहिजे. – शशिकांत कुलकर्णी, नांदेड</p>
‘नीट’पेक्षा विद्वेष महत्त्वाचा?
‘शिक्षणातील विषमतेचा ‘नीट’ आरसा’ हा लेख वाचला. नीट परीक्षेतील घोळ हा अनितीला सत्ताधार्यांकडून मिळणार्या अनिष्ट प्रोत्साहनाचाच परिपाक आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणार्या भ्रष्ट व्यवस्थेचे हे प्रतिबिंब आहे. भ्रष्ट मार्गाने आपल्याला हवे ते आणि हवे तेव्हा मिळविता येते, असाच संदेश या प्रकरणातून गेल्याचे दिसते. प्रामाणिकपणे अभ्यास करून, परीक्षा देऊन प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन देण्याऐवजी तरुणांची डोकी जाती व धर्मावरून भडकावली जात आहेत. विद्वेषाचे भयंकर विष पद्धतशीरपणे पसरविण्याचे काम दुष्ट शक्ती अविरतपणे आणि अगदी बेमालूमपणे पार पाडत आहेत! विकार आणि विखाराचे धडे जनतेला जाणूनबुजून दिले जात आहेत!
नीटमधील पेपरफुटीला सर्वस्वी ‘एनटीए’च जबाबदार आहे. सुमार बुद्धीचा डॉक्टरपुत्र डॉक्टर कसा होतो, याचे उत्तर या प्रकरणाने दिले आहे. प्रामाणिक, होतकरू विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा हा शिक्षण क्षेत्रातील महाप्रचंड भ्रष्टाचार हे केवळ हिमनगाचे टोक आहे की काय असा दाट संशय येतो. सर्वसामान्य, प्रामाणिक, होतकरू विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याच्या या अत्यंत निंदनीय आणि संतापजनक प्रकाराची पाळेमुळे किती खोलवर रुजली असतील याची केवळ कल्पनाच केलेली बरी. संकुचित, कोत्या मनाचे भ्रष्ट सरकार, त्याचे भ्रष्ट, संकुचित विचार यांमुळे भ्रष्ट आचारविचाराचे जणू पेवच फुटले आहे. अशा या अंधारात आशावाद जोपासणे हाच तगून राहण्याचा मार्ग आहे. उद्याच्या परिवर्तनाची आस धरून चालावे लागणार आहे.-श्रीकांत जाधव, अतीत (सातारा)
इंधन आहे, तर रांगा कशामुळे?
‘इंधन साठेबाजीवर कारवाईसाठी संयुक्त पथक, अन्न व नागरीपुरवठा, गृह विभागाकडून कारवाई’, हे वृत्त (लोकसत्ता- २७ मे) वाचले. आखाती देशांतील युद्धाचा परिणाम म्हणून, वस्तूंची आयात निर्यात थांबली आहे. बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचा परिणाम म्हणून, पेट्रोल, डिझेलचे दर तीन वेळा वाढवण्यात आले. याचा त्रास वाहनचालकांना होत आहे. सरकार आपल्याकडे पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा आहे, असे कंठशोष करून सांगत आहे, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. साठा पुरेसा आहे तर, पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा का आहेत. काही ठिकाणी तर, पेट्रोल, डिझेल संपले आहे, असे फलक लागले आहेत, ते कशामुळे? काही ठिकाणी पेट्रोल, डिझेल नाही असे सांगितल्यामुळे, वाहनचालकांकडून पेट्रोल, डिझेल भरणार्या व्यक्तीला मारहाण होण्याचे प्रकार घडत आहेत. तीच गत स्वयंपाकाच्या गॅसची. सिलेंडरचा पुरेसा साठा आहे तर, जनतेला रांगा लावून का उभे राहावे लागत आहे? तसेच सिलेंडर मिळण्यासाठी १५ ते ४५ दिवसांचा कालावधी का लागत आहे? या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यायला हवीत. इंधन साठेबाजीमुळे जर हे प्रकार घडत असतील तर, ते रोखण्यासाठी संयुक्त पथक नेमावे आणि ते कामगिरी चोखपणे बजावेल, याची खबरदारी घ्यावी.- गुरुनाथ मराठे, बोरिवली (मुंबई)
