‘‘तरुण पिढीने ‘गीतारहस्य’ वाचून टिळकांचे विचार समजून घ्यावेत म्हणजे चूक होणार नाही’’ असा सल्ला गृहमंत्री अमित शहा यांनी तरुण पिढीला दिल्याचे वाचनात (२ ऑगस्ट) आले. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचा याला संदर्भ असणार, हे उघड आहे. पण गीतारहस्यामधील या सल्ल्याशी सुसंगत असे आणखी किमान एक-दोन विचार त्यांनी सांगितले असते तर ते अधिक उचित ठरले असते. वाचन, (मनन, चिंतन ही फार दूरची गोष्ट) लेखनाची सवय आजच्या बहुतेक राजकारण्यांना नाही. त्यामुळे ज्या महापुरुषाच्या नावाने समारंभ असतो, त्या ‘महापुरुषाचे विचार समजून घेणे आवश्यक आहे’ असे मोघमपणे बोलण्याची ‘चाणक्यनीती’ अवलंबिली जाते.

वि. वा. शिरवाडकर यांचे बंधू के. रं. शिरवाडकर यांनी ‘सार गीतारहस्या’चे या पुस्तकात टिळकांच्या मूळ पुस्तकाचे सुरेख विवेचन व विश्लेषण केले आहे. त्यात त्यांनी एकेठिकाणी टिळकांचे मत नोंदविले आहे ते असे, ‘कोणतीही कृती करायची ती कर्तव्य म्हणून, सूड म्हणून नव्हे’ (पृष्ठ:९९). आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांच्या विरोधात पोलिसांनी एका प्रकारे सूड बुद्धीने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर अमित शहांना हा विचार मान्य आहे का? तसेच ‘सर्व धर्मांबद्दल सहिष्णुता दाखवणारा गीताधर्म सफल वैदिक धर्माचे सार आहे.’ ‘जे कोणाचा द्वेष करीत नाहीत व कशाचाही लोभ ठेवीत नाहीत, ते कर्मयोगी समजावेत.’ (पृष्ठ: १२५, १४२) तसेच अन्य काही विचार आहेत, ते अमित शहांना मान्य आहेत का? -अनिल मुसळे, ठाणे</p>

तुम्ही जेन-झींबाबत संयम दाखवलात का?

‘जेन-झींना संयमाचा सल्ला’ ही बातमी (२ ऑगस्ट) वाचली. तरुण पिढीने ‘गीतारहस्य’ वाचून टिळकांचे विचार समजून घ्यावेत, म्हणजे चूक होणार नाही, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यात एका कार्यक्रमात केले. गीतारहस्य मानवी जीवनातील नैतिक आचरणाची तत्त्वे आणि कर्तव्ये स्पष्ट करते. ती तत्त्वे तर फक्त तरुण पिढीच नव्हे तर प्रत्येकाने, विशेषत: राजकीय व्यक्तींनीही समजून घेणे सद्य राजकीय परिस्थितीत अत्यंत आवश्यक आहे. महाभारतात पांडवांनी फोडाफोडी करून कौरवांना आपल्यात समाविष्ट करून घेण्याची नीती अवलंबिली नाही याची आठवणही या निमित्ताने विद्यमान सत्ताधार्‍यांना करून देणे आवश्यक आहे. दिल्लीतील ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनात सत्ताधारी पक्ष गीतेत सांगितलेल्या नैतिकतेने तरुणाईशी वागला का याचे आत्मपरीक्षण केंद्रीय गृहमंत्री कधी करणार?  -प्रवीण आंबेसकर, ठाणे

नैतिकतेचे धडे देण्याचा अधिकार आहे?

पंतप्रधानांविषयी जेन-झींनी वापरलेल्या भाषेचा आज निषेध केला जात आहे. पण हा निषेध तत्त्वाचा आहे, की सोयीचा? राजकीय भाषेचा दर्जा घसरला, असे आज म्हणणारे लोक तेव्हा कुठे होते, जेव्हा विरोधकांविषयी वैयक्तिक, उपरोधिक आणि अवमानकारक भाषा वापरली जात होती?

सोनिया गांधींबाबत ‘जर्सी गाय’ अशा उल्लेखांपासून, ‘काँग्रेसची विधवा’सारख्या शब्दप्रयोगांपर्यंत, शशी थरूर यांच्या पत्नीविषयी ‘५० करोड की गर्लफ्रेंड’ अशा टीकेपासून ते ‘दीदी, ओ दीदी’ सारख्या सार्वजनिक उपरोधापर्यंत या सर्वांवरही तेवढ्याच तीव्रतेने आक्षेप घेतले गेले होते का? की तेव्हा ते निवडणुकीतील ‘राजकीय शैली’ म्हणून चालून गेले?

 त्या वेळी हे सर्व स्वीकारार्ह वाटत असेल, तर आज नैतिकतेचे धडे देण्याचा अधिकार कुणाला आहे? आणि आज जर हे चुकीचे असेल, तर तेव्हाही हेच तत्त्व सर्वांना लागू नव्हते का? पंतप्रधानांचा मान राखलाच पाहिजे, पण लोकशाहीत सत्ताधार्‍यांनीही विरोधकांचाही तितकाच मान राखला पाहिजे. -राम रेठे, परतवाडा

हळवे, संवेदनशील पंतप्रधान…

‘दुसर्‍यांनाही आई असते’ असा उल्लेख असलेली बातमी  (२ ऑगस्ट) वाचली. आपल्या संवेदनशील पंतप्रधानांनी जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांनी शिवीगाळ केली किंवा शिवराळ भाषा वापरली याबद्दल त्यांना माफ केले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी दुसर्‍यांनाही आई असते असे म्हटले आहे. पण भेदभाव संस्कृतीमध्ये आपल्यालाच आई असते, दुसर्‍यांना कधीही आई नसते, याची माहिती राज ठाकरे यांना नसल्याचे दिसते. आपलीच मने दुखावतात, दुसर्‍याची मने कधीच दुखावत नाहीत. जंतर-मंतरवर न जाताही आपल्याबद्दल, आपल्या आईबद्दल शिवराळ भाषा वापरली. याचे ज्ञान यांना कसे होते, हे समजत नाही. संवेदनशील पंतप्रधानांना माफी मागण्याची सवय नाही. माफ करण्याची सवय आहे. आपले पंतप्रधान फार हळवे आहेत. त्यांचे संवेदनशील मन त्यांचे चाहते सतत जपत असतात. ते जपताना आपल्या पदाचेही भान काही जणांना राहात नाही. भारताच्या इतिहासात अशा संवेदनशील पंतप्रधानांबद्दल मोठ्या कथा रचल्या, ऐकल्या, वाचल्या जातील. -युगानंद गुलाबराव साळवे, पुणे</p>

जेन झी हा भ्रम, ते एक थोतांड…

सध्या सगळीकडे जेन झी चे कौतुक सुरू असले तरी जेन झी हे एक थोतांड आहे, निर्माण केला गेलेला भ्रम आहे. सत्ता मिळवण्यासाठी आंदोलन, हिंसा, दंगा घडवून आणायचे कारस्थान आहे. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका देशात दंगे, हिंसक आंदोलन होऊन सत्तापालट झाला. आता त्या देशातून गरिबी, बेरोजगारी, भ्रष्टाचार नाहीसा झाला?

जयप्रकाश नारायण यांना संपूर्ण क्रांती करायची होती, इंदिरा गांधी यांना गरिबी हटवायची होती. आता देशातील परिस्थिती आणखीन वाईट झाली आहे. कारण सतत वाढणारी लोकसंख्या. देशात मृगजळाचा महापूर आहे. -सुधीर केशव भावे, जोगेश्वरी, मुंबई</p>

सत्ताधारी आमदारांचाही हाच मार्ग?

‘स… स… सुधारणांचा’ हा सत्ताधारी आमदार आशीष देशमुख यांचा लेख      (२ ऑगस्ट) वाचला. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या गच्छंतीस राजीनामा वा पदत्याग असे संबोधणे हे ‘नीट’ अव्यवस्थेमुळे जगाचा निरोप घेतलेल्या विद्यार्थ्यांवर अन्यायकारक नाही का? तद्नंतर लगेचच, ज्या प्रकारे माजी शिक्षणमंत्री महोदयांचे संसदेत स्वागत करण्यात आले, त्यांचा जो काही विशेष सत्कार घडवून आणला गेला  ते आमदार महोदयांच्या नजरेतून सुटले का? यातून काय संदेश द्यायचा होता सत्ताधार्‍यांना? शिक्षणात सुधारणा घडवून आणायची म्हणजे शिक्षणमंत्र्यांपासून त्याची सुरुवात नको? बदली शिक्षणमंत्र्यांची पार्श्वभूमी लक्षात घेता, तसे काही घडताना दिसते का खुद्द आपल्याला तरी? लेखात असे म्हटले आहे की ‘जेन-झी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या नव्या पिढीची मागणी पूर्ण झाली. येथेच चुकताय आपण, एक सत्ताधारी राजकारणी व माणूस म्हणूनसुद्धा, ही केवळ ‘जेन-झीं’ची मागणी नव्हे तर संपूर्ण देशाची मागणी होती हे अजूनही लक्षात येत नाही का सरकारदरबारी? का कळून न कळल्यासारखे भासवण्यातच पुरुषार्थ!  शिक्षण क्षेत्रातील सुधारणा स्वागतार्ह असल्या तरी, राज्य म्हणून यातील किती एक गोष्टी आपण अमलात आणल्या आहेत? किंवा तसे प्रयत्न विद्यमान केले गेले? सरकारी शाळांची दुरवस्था, शिक्षकांची कमतरता, शाळा बंद पडणे हे तर नित्याचेच झाले आहे. अंगणवाडी सेविकांच्या रास्त मागण्यांची तरी कधी दखल घेतली आपल्या सरकारद्वारे? मग हल्ली सत्ताधारीदेखील मोर्चे काढायला लागले त्याप्रमाणे, सत्ताधारी आमदार सार्वजनिक माध्यमांवर लेख लिहून आपल्या कर्तव्यांचे वहन केव्हापासून करायला लागलेत? का सत्ताधारी आमदारांनाही आपला आवाज विधिमंडळात व सत्ताधारी मंत्र्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हा मार्ग आचरावा लागतो आहे का? -अचला नेने, पुणे

मान्सूनचा अभ्यास अधिक व्यापक व्हावा

‘हवा बदलते आहे!’ हे संपादकीय (१ ऑगस्ट) वाचले. अलीकडील वर्षांतील अनुभव स्पष्टपणे सांगतात की, भारतातील पावसाचे वर्तन समजून घेण्यासाठी केवळ एल निनो हा एकच घटक पुरेसा नाही. हिंद महासागरातील तापमानातील बदल, इंडियन ओशन डायपोल (कडऊ), मॅडन-ज्युलियन ऑसिलेशन (टखड), अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील हवामानातील बदल तसेच जागतिक हवामान बदल यांसारख्या अनेक घटकांचा मान्सूनवर परिणाम होत आहे. त्यामुळे हवामान अंदाज अधिक अचूक करण्यासाठी बहुआयामी संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. -गणेश दळवी, आष्टी, जि. बीड