‘ये तो सिर्फ ‘बांकी’ है…?’ हा अग्रलेख (५ ऑगस्ट) वाचला. पोटनिवडणुका सत्ताधार्‍यांना साचलेल्या असंतोषाचा इशारा देण्याचे काम करतात. त्यामुळे अनेकदा पोटनिवडणुकांचे निकाल मुख्य निकालांपेक्षा वेगळे लागतात. खरे तर सवर्ण हिंदूंची संख्या अधिक असणे आणि तुलनेने मुस्लिम-यादव मते कमी असणे ही बांकीपूरमधली स्थिती भाजपच्या राजकारणातील सर्वात आदर्श स्थिती होती. तरीही या बालेकिल्ल्यात पराभव झाला. कारण निवडणूकशास्त्रात बहुकारणवाद महत्त्वाचा असतो. स्थानिक नेतृत्व, उमेदवारांची निवड, जातीय समीकरणे, गटबाजी, संघटनात्मक शिथिलता आणि स्थानिक प्रश्न यांचाही तितकाच प्रभाव निकालांवर पडतो. त्यातच तरुण वर्गातील असंतोष तसेच रोजगार आणि शिक्षणासंबंधी प्रश्नांचा परिणाम झाल्याचे दिसले. सुरक्षित समजल्या जाणार्‍या मतदारसंघांत मताधिक्य कमी झाल्यास किंवा पराभव झाल्यास ते निश्चितच सत्ताधार्‍यांसाठी आत्मपरीक्षणाचे कारण ठरते.

भारतीय नवमतदार आता कृतज्ञ राहिला नसून व्यवहारवादी होत आहे. त्यामुळे तो कोणत्याही पक्षाशी कायमस्वरूपी बांधील राहील असे वाटत नाही. रस्ते, नोकरी, परीक्षा, पाणी, स्थानिक प्रशासन, महागाई याला तो अधिक महत्त्व देतो. त्यामुळे कोणत्याही पक्षाचा पारंपरिक गड कायमचा सुरक्षित राहील, ही कल्पना कालबाह्य होत आहे. तरीही, पोटनिवडणुकांच्या निकालांवरून व्यापक राजकीय प्रवाह निश्चित झाल्याचे मानणे धाडसाचे ठरेल. मतदार अनेकदा सत्ताधार्‍यांना इशारा देताना विरोधकांनाही निर्विवाद पर्याय म्हणून स्वीकारतातच असे नाही. त्यामुळे या निकालांतून ‘सत्ताधार्‍यांचा र्‍हास सुरू झाला’ किंवा ‘विरोधकांचे पुनरागमन सुरू झाले’ असे टोकाचे निष्कर्ष काढण्यापेक्षा ‘मतदार अधिक सजग आणि कमी बांधील होत आहेत’ या दृष्टीने पाहणे अधिक योग्य ठरेल. -हेमंत पाटील, नालासोपारा

भाजप पराभवातून शहाणा होणारा पक्ष

‘ये तो सिर्फ ‘बांकी’ है…?’ हे संपादकीय (ऑगस्ट) वाचले. जंतर-मंतर आंदोलनाने मोदी सरकारची दाणादाण उडवली असतानाच तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल हे भाजपच्या मनमानीला धक्का देणारे आहेत. विशेषत: बांकीपूर मतदारसंघ हा गेली तीन दशके भाजपचा अभेद्य गड मानला जात होता. अशा मतदारसंघात भाजपचा पराभव करून आजवर पडद्यामागून निवडणुकांचे नियोजन करणारे रणनीतीकार आणि आता जनसुराज पक्षाचे प्रमुख असलेले प्रशांत किशोर यांनी भाजपचा अभेद्य गड सर केला. हा पराभव दुर्लक्ष करता येईल असा नाही.

भाजपने ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. विजय आपलाच आहे, या भ्रमात भाजप नेते होते. लोकशाहीत अहंकार नसावा, पण भाजपमध्ये सत्तेचा अहंकार वाढला आहे. त्यामुळे या निकालाची राजकीय चर्चा होणे स्वाभाविक आहे. किशोर यांनी मिळविलेला विजय भाजपला निश्चितच धक्कादायक आहे. जेडीयूच्या पारड्यातही मते पडलेली नाहीत. मध्यम वर्गात नाराजी आहे. जंतर-मंतरवरील आंदोलन, नितीशकुमार यांना ज्या पद्धतीने मुख्यमंत्रीपदावरून हटवून सम्राट चौधरी यांना तिथे बसविण्यात आले, ती नाराजीही भोवल्याचे दिसते. विरोधी पक्षांनाही थोडेफार आत्मबळ देणारा हा विजय आहे, पण यावरून भाजपविरोधात जनमत तयार झाले असा अंदाज काढणे चुकीचे ठरेल. कारण भाजप असा पक्ष आहे, जो पराभवातून शहाणा होतो, पण विरोधक शहाणे होत नाहीत.-सुनील कुवरे, शिवडी (मुंबई)

बदलाच्या वार्‍यांचे संकेत

‘ये तो सिर्फ ‘बांकी’ है…?’ हा अग्रलेख वाचला. देशाच्या राजकारणात भाजपविरोधी वारे वाहू लागल्याचे संकेत मिळत आहेत. बिहारच्या बांकीपूर पोटनिवडणुकीत जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी दणदणीत विजय मिळवून भाजपला जबरदस्त धक्का दिला. खरे पाहता प्रशांत किशोर यांनी जोखीम पत्करून स्वत:ला पणाला लावून हे यश मिळविले आहे. भाजपसाठी हा जबरदस्त धक्का आहे. मध्य प्रदेशातील दांतिया मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेस आमदाराची निवड अवैध ठरल्यामुळे येथे पोटनिवडणूक झाली. भाजपसारख्या ठक आणि ठगांच्या सत्ताकाळात जागा राखणे म्हणजे मोठे दिव्यच! म्हणूनच काँग्रेसचे हे यश निश्चितच मोठे आहे. एकूणच भाजपच्या विरोधात देशात बदलाचे वारे वाहू लागले आहेत याचेच हे संकेत आहेत.-श्रीकांत जाधव, सातारा</p>

जे नाराज नव्हते तेही आता विरोधात

‘ये तो सिर्फ ‘बांकी’ है…?’ हे संपादकीय (५ जुलै) वाचले. भाजपशासित राज्यांतील पोटनिवडणुकीत भाजपच्या मतांत जी लक्षणीय घट झाली, तिला जेन-झीच्या आंदोलनाची पार्श्वभूमी आहे. शिक्षण क्षेत्रात सरकारने जो घोळ घालून ठेवला आहे, त्यात जे विद्यार्थी भरडले गेले ते, त्यांचे पालक, नातेवाईक, शिक्षक यांच्यात तर नाराजी आहेच, पण यापूर्वी सरकारविरोधी नसलेल्यांच्याही मनात हे आंदोलन ज्या पद्धतीने हाताळले गेले, ते पाहता राग निर्माण झाला असणे साहजिकच आहे. मतदारांना गृहीत धरणे चुकीचेच. मतदार हा झालेला अन्याय लक्षात ठेवतो. नवमतदार हा अतिशय सावध, अभ्यासू आणि तडकाफडकी उत्तर देणारा, विचार करणारा, आश्वासनांपेक्षा आजच्या वास्तवाला अधिक महत्त्व देणारा आहे. त्याला गृहीत धरणे कोणत्याही पक्षाला परवडणारे नाही. -कबीर चंदनशिवे, डोंबिवली

मोदीच माफ करू शकतात

‘‘ही’ भाषा वापरण्याची वेळ का आली?’ हा लेख (४ ऑगस्ट) वाचला. मुले लहान आहेत, संतापाच्या अतिरेकात बोलून गेली असतील हे मान्य. पण तरीही या भाषेचे समर्थन करणे अतिशय अयोग्य आहे. तरुणाईवर अशी शिवराळ भाषा वापरण्याची वेळ आणली गेली, हे समर्थन तर अतिशय धोकादायक आहे, कारण या न्यायाने दगडफेक, तोडफोड, जाळपोळही क्षम्य किंवा समर्थनीय ठरवता येईल.

याच अंकात ‘विद्यार्थ्यांना माफ करणारे पंतप्रधान कोण? -राहुल गांधी’ या शीर्षकाखाली एक बातमी आहे. कदाचित राहुल गांधींना कल्पना नसावी की आंदोलकांनी मोदींचे नाव घेऊन शिवराळ भाषा वापरली आहे. यामुळे मोदींची वैयक्तिक मानहानी झाली, हे नक्की आणि त्याकरिता मानहानी करणार्‍यांना तेच माफ करू शकतात. मात्र कायदा आणि सुव्यवस्था हा संघीय व्यवस्थेत राज्यांच्या अंतर्गत येणारा मुद्दा आहे. तेव्हा संबंधित राज्य शासनांस या भाषेमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास त्यांना त्याविरुद्ध कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे हे निश्चित. -श्रीकांत धोंड, नागपूर</p>

व्यवस्थेविरुद्धच्या उद्रेकाची भाषा

‘ही भाषा वापरण्याची वेळ का आली?’ हा डॉ. मनोज महाजन यांचा लेख वाचला. आम्ही बँकेसारख्या ‘व्हाइट कॉलर्ड’ नोकरीत असताना बँकांच्या आंदोलनांवेळी, ‘एक दो एक दो, मॅनेजर को फेक दो’, ‘दादागिरी नही चलेगी’, ‘हमारी माँगे पुरी करो वर्ना कूर्सी खाली करो’ असे नारे दिले जात. त्या वेळी येणारे-जाणारे म्हणतच असतील, एवढी चांगली नोकरी, चांगला पगार, इतक्या सुट्ट्या तरीही आंदोलन करतात. घोषणांनी मुद्दे सुटले नाहीत तर वाद, दगडफेक, मारामार्‍या इत्यादी होत.

अन्यायाला वाचा फोडण्यासाठीची अशी अनेक आंदोलने पाहिली. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या वेळची कॉम्रेड एस. एम. जोशी, आचार्य अत्रे यांची विद्रोही परंतु साहित्यिक मूल्ये असलेली भाषणे, लोकशाहीर अमर शेख यांचे ‘पवाडे’ यांतील भाषा असंसदीय नव्हती, ती द्रोहाची अभिव्यक्ती होती. पुढे आंदोलनांची प्रवृत्ती, प्रकृती बदलली. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांची भाषणे ऐकली आहेत. परंतु पुढे दगडफेक, जाळपोळ हा अशा आंदोलनांचा स्थायिभाव झाला. डॉ. दत्ता सामंत यांनी ‘एम्पायर डाइंग’मध्ये व्यवस्थापनाशी करार घडवून आणला. पुढे १९८२ चा ऐतिहासिक कापड गिरण्यांचा संप झाला. त्याने आधीच्या चौकटीच मोडून टाकल्या. याची परिणती म्हणजे विध्वंस. त्याची कडू फळे त्या कामगारांची आजची पिढी भोगत आहे. जेन-झी आंदोलनाने या आठवणी जाग्या झाल्या. आंदोलकांची स्वतंत्र भाषा असते, भले ती संसदीय नसेल, चौकटीबाहेरची असेल, परंतु व्यवस्थेविरुद्ध मनात साचलेला उद्रेक त्यातून व्यक्त होत असतो.-दिलीप सुतार, महालक्ष्मी (मुंबई)