scorecardresearch

Premium

लोकमानस: किसिंजर यांच्या चुकांचीही दखल घेणे गरजेचे!

‘शतायुषी शहाणा!’ हा अग्रलेख (१ डिसेंबर) वाचला. किसिंजर यांचे यश दखलपात्र असले, तरीही त्यांच्या गंभीर चुकांची दखल घेणेही तेवढेच गरजेचे आहे.

lokmanas
( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

‘शतायुषी शहाणा!’ हा अग्रलेख (१ डिसेंबर) वाचला. किसिंजर यांचे यश दखलपात्र असले, तरीही त्यांच्या गंभीर चुकांची दखल घेणेही तेवढेच गरजेचे आहे. उदाहरणार्थ, कम्बोडियात झालेल्या विमानहल्ल्याचा अग्रलेखात उल्लेख आहे. १४ महिने चाललेल्या मोहिमेत सुमारे दीड लाख नागरिक मृत्युमुखी तर पडलेच, शिवाय या नरसंहाराची परिणती पॉल पॉट हा क्रूरकर्मा राष्ट्रप्रमुख होण्यात झाली, असे अनेक इतिहासतज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

तसेच मध्यपूर्वेतील १९७३च्या योम किप्पूर युद्धावेळी शस्त्रसंधी घडवून आणण्यात आणि त्यानंतर अमेरिकेचे इस्रायलधाजिर्णे धोरण ठरवण्यात किसिंजर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. लॅटिन अमेरिकेत किसिंजर यांनी वेळोवेळी थेट हस्तक्षेप केला. चिलीत साल्वाडोर आयेंदे या लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेल्या लोकप्रिय राष्ट्राध्यक्षाचा खून करून ऑगस्तो पिनोचे या खलप्रवृतीच्या लष्करी हुकूमशहाला प्रस्थापित करण्याच्या कटाला किसिंजर यांचे समर्थन लाभले. ‘चिलीला भेडसावणारे प्रश्न इतके महत्त्वाचे आहेत की फक्त चिलियन मतदारांनीच त्यावर निर्णय घेणे चुकीचे ठरेल,’ असे ते म्हणाले होते. व्यक्तीचे निधन झाल्यावर तिच्याबद्दल वाईट लिहू नये हा संकेत योग्य वाटत असला तरी किसिंजर यांच्यासारख्या युगप्रवर्तक मुत्सद्दी व्यक्तीबाबत तो लागू होत नाही. -भूषण निगळे, जर्मनी

Alexei Navalny dies in prison
अग्रलेख: मौनाचे मोल!
सोलापूर : गणपतराव देशमुखांच्या नातवांचे पार्सल पेनूरला परत पाठवू, आमदार शहाजीबापू पाटील यांची गर्जना
What Uddhav Thackeray Said?
“अशोक चव्हाण लीडर नव्हे डीलर म्हणणाऱ्या फडणवीसांनी आता त्यांच्याशी डील..”, उद्धव ठाकरेंची टीका
rain in Kailash Khers program the audience flees by covering chairs as umbrellas
वर्धा : कैलाश खेर यांच्या कार्यक्रमात पावसाचे आगमन, खुर्च्यांची छत्री करीत श्रोत्यांचे पलायन; पाच हजार खुर्च्या गायब

विद्वत्तेचा जगाला फायदा झाला की तोटा?

‘शतायुषी शहाणा!’ हा अग्रलेख (१ डिसेंबर) वाचला. किसिंजर यांची विद्वत्ता वादातीत असली तरीही जगाला आणि मानवी मूल्यांना त्याचा तोटा झाला की फायदा या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही. चीनच्या बाबतीत त्यांच्या चुकलेल्या अंदाजाच्या परिणामांतून खुद्द अमेरिकाही भविष्यात सुटणार नाही. व्हिएतनाम, अफगाणिस्तान, मध्यपूर्व, अगदी अलीकडील युगांडा संघर्षांत असलेली अमेरिकेची भूमिका आणि त्याचबरोबर जागतिक शस्त्र बाजाराने खतपाणी घालून जोपासलेला दहशतवाद ही आणखी काही उदाहरणे. यांची पाळेमुळे किसिंजर यांची आक्रमक सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणे तसेच अमेरिकन वर्चस्ववादात आहेत, असे म्हटले, तरी वावगे ठरणार नाही. जगभरातील नेते त्यांचे भक्त असताना बराक ओबामा यांच्यासारखे समतोल व विचारी अमेरिकन अध्यक्ष जेव्हा त्यांच्या कामाला ‘गोंधळ’ म्हणतात, तेव्हा त्यांच्या टीकाकारांच्या मतांचाही अभ्यास करावा असे वाटते. –  राजेश नाईक, बोळींज (विरार)

किसिंजर यांच्यात दूरदृष्टीचा अभाव

‘शतायुषी शहाणा!’ हा अग्रलेख (१ डिसेंबर) वाचला. अमेरिकेतील अध्यक्षीय राजवटीमुळे राष्ट्राध्यक्ष तज्ज्ञ व्यक्तींची मंत्रीपदी (अमेरिकन काँग्रेसच्या सहमतीने) थेट नेमणूक करू शकतात (आज भारतातही जयशंकर, वैष्णव, इत्यादींच्या नेमणुका अशाच वाटत नाहीत का?). किसिंजर अशांपैकीच एक होते.

सामान्यपणे देशातील नेत्यांना वा परराष्ट्र मर्त्यांंना आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकण्याची संधी मिळणे कठीण असते, मात्र अमेरिकेसारख्या महाशक्तीच्या परराष्ट्रमंत्र्यांना ते अधिक प्रमाणात शक्य होते. किसिंजर बुद्धिमान होते; पण अतिशय कुटिल व निर्दयही होते. त्यांनी शीतयुद्धात चीनला रशियाविरोधात अमेरिकेच्या बाजूने आणण्यात यश मिळविले होते. परंतु, त्यानंतर (सुमारे १९६९ नंतर) चिनी विद्यार्थी व संशोधक मोठय़ा प्रमाणात पाश्चिमात्त्य देशांत शिकण्यास व संशोधन करण्यास येऊ लागले. याची चीनला आधुनिक तंत्रज्ञान वेगाने आत्मसात करण्यात मोठी मदत झाली. परिणामी मोहिनी-भस्मासुराप्रमाणे चिनी आव्हान आज अमेरिकेपुढे ठाकले आहे. ही समस्या निर्माण करण्यात मोठा वाटा असलेले किसिंजर यांना पुरेशी दूरदृष्टी नव्हती असे म्हणावे लागेल (आज भारताला अमेरिका चीनविरुद्ध वापरत आहे; तेव्हा भारताने बोध घ्यावा). भारताविषयी किसिंजर यांचे मत चांगले नव्हते. १९७१च्या भारत-पाक युद्धादरम्यान अमेरिकेने भारतावर दडपण आणण्यासाठी आपला सातवा आरामारी काफिला बंगालच्या उपसागरात तैनात केला होता.

किसिंजर हे प्रसिद्धिलोलुप होते असे म्हणता येईल. आपण किती बुद्धिमान आहोत हे दाखविण्याची संधी ते सोडत नसत. अमेरिकी राज्यव्यवस्था व समाज बऱ्यापैकी खुले आहेत. परंतु, किसिंजर हे आपल्या कामाविषयी अनेकदा अनावश्यक गूढता व गुप्तता निर्माण करत. २०२२ मध्ये त्यांनी ‘लीडरशीप: सिक्स स्टडीज इन वल्र्ड स्ट्रॅटेजीज’ हे (शेवटचे) पुस्तक लिहिले. हे सहा नेते म्हणजे- जर्मन कोनरड अडनोयर, फ्रेंच चार्ल्स द गोल, अमेरिकन रिचर्ड निक्सन, इजिप्तचे अनवर सादात, सिंगापूरचे ली क्वान यू व ब्रिटनच्या मार्गारेट थॅचर. वस्तुत:, किसिंजर हे आयुष्यभर चिनी नेते माओ, झाऊ एनलाय व डेंग शियाओ पिंग यांची स्तुती करत राहिले, पण त्यांतील एकाचाही वरील यादीत समावेश मात्र केला नाही, याचे आश्चर्य वाटते. –  हर्षवर्धन वाबगावकर, मुंबई</p>

बुद्धी-कर्तृत्वाचे मिश्रण घातकही ठरू शकते

‘शतायुषी शहाणा!’ या अग्रलेखातून (१ डिसेंबर) किसिंजर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक भले-बुरे पैलू कळले. असामान्य बुद्धी आणि कर्तृत्व असे दोन्ही अंगी असलेल्या व्यक्ती जगाचे भले करू शकतात आणि धोकादायकसुद्धा ठरू शकतात, हेदेखील जाणवते. ‘शहाणा’ या शब्दाला मराठीत अनेक अर्थछटा आहेत (अतिशहाणा, दीडशहाणा अशादेखील); आणि त्या साऱ्या त्यांच्या बाबतीत किती समर्पक आहेत हेही लेख वाचून जाणवते. ‘अमेरिकेशी शत्रुत्व धोकादायक असू शकते, पण अमेरिकेशी मैत्री म्हणजे कपाळमोक्षच’ अशा आशयाचे त्यांचे विधान प्रसिद्ध आहे. सोव्हिएत संघाच्या बंदिस्त व्यवस्थेने गोर्बाचेव्ह यांच्या नेतृत्वात ‘ग्लासनोस्त’चे वारे शिडात भरून घेतले आणि त्यांचे अमेरिकेशी असलेले संबंध बरेच सुधारले. परंतु तो मोकळय़ा वाऱ्याचा झंझावात सहन न होऊन त्या देशाचे विघटन झाले आणि अमेरिकेशी मैत्री म्हणजे कपाळमोक्ष कसा होतो हे पुन्हा अधोरेखित झाले!

कोणी कितीही ‘शहाणा’ असला तरी शेराला सव्वाशेर निर्माण होतोच. जागतिकीकरणात चीनला ओढले तर चीनचेही सोव्हिएत संघासारखेच काहीसे होऊन लेखात म्हटल्याप्रमाणे, ‘चीनचे लोकशाहीकरण होईल, असे त्यांचे आडाखे असावेत,’ परंतु अमेरिकेची गुंतवणूक वापरून चीन महासत्ता बनून अमेरिकेशी टक्कर घेऊ लागला. ज्या भारताचा आणि इंदिराजींचा द्वेष केला तो भारत देश पाकिस्तानचे तुकडे करून समर्थपणे उभा राहिलेला त्यांना पहावा लागला. अफगाणिस्तानात झालेला विचका (आणि अमेरिकेचा पचका!), ट्रम्प यांचा उदय, अखेरच्या काळात डोईजड झालेला इस्रायल आणि ‘‘मेक अमेरिका ग्रेट ‘अगेन’’ असे म्हणत चाचपडणारी अमेरिका त्यांना बघावी लागली. –  प्रसाद दीक्षित, ठाणे</p>

अशानेच अधिकाऱ्यांची मनमानी वाढते

‘मुदतवाढीचे रस्ते कुठे नेतात?’ हा ‘अन्वयार्थ’ (१ नोव्हेंबर) वाचला. सचिव, सनदी अधिकारी यांना निवृत्त झाल्यावर कमीत कमी पाच वर्षे राजकारणात भाग घेता येणार नाही, असा कायदा केला पाहिजे. शासकीय सेवेत असेपर्यंत अधिकाऱ्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर काही मर्यादा व बंधने असणे अनिवार्य आहे. त्याचे पालन होताना दिसत नाही. गेल्या काही वर्षांत वरिष्ठ सनदी सेवांच्या दर्जाला लक्षात येण्याएवढी उतरती कळा लागलेली दिसते. याला सर्वस्वी राजकारणी जबाबदार आहेत. मंत्र्यांना व्यवस्थेसंबंधी माहिती नसते. किती काळ मंत्रीपद टिकेल, याची निश्चिती नसते. याचा फायदा अधिकारी घेतात. मंत्र्यांच्या मर्जीतील व त्यांच्या पक्षाच्या जवळच्या समजल्या जाणाऱ्या व्यक्तींची वरिष्ठ पदावर नेमणूक व मुदतवाढीमुळे, व्यवस्थेत सचिव, अधिकारी यांची मनमानी वाढते. –  श्रीनिवास स. डोंगरे, दादर (मुंबई)

चीड निर्माण करण्यात रेवंथ रेड्डी यशस्वी

योगेंद्र यादव यांचा ‘देशकाल’ सदरातील लेख (१ डिसेंबर) वाचला. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांतील निवडणुकांकडे लोकसभेची उपांत्य फेरी म्हणून पाहिले गेले. राष्ट्रीय माध्यमांचे सध्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ या हिंदी पट्टय़ावर लक्ष केंद्रित झाले आहे. मात्र दक्षिणेत प्रवेशाचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपसाठी कर्नाटकने दार बंद केले. त्यांनी तेलंगणातून दार उघडण्याचा प्रयत्न केला मात्र तोही असफल ठरला. तेलंगणत एक स्पष्ट दिसून येते की ही निवडणूक थेट बीआरएस विरूद्ध काँग्रेस अशी होती. भाजपनेदेखील ताकद पणाला लावली होती, मात्र जेवढे लक्ष हिंदी पट्टय़ावर केंद्रित करण्यात आले होते, होता तेवढा जोर तेलंगणात दिसला नाही. रेवंथ रेड्डी भाजपकडे बीआरएसचा राखीव खेळाडू म्हणून पाहत होते. काँग्रेस कर्नाटकची पुनरावृत्ती करण्याच्या दृष्टीने लढत होती आणि रेवंथ रेड्डी केंद्रस्थानी होते.

केसीआर यांच्या विरोधात चीड निर्माण करण्यात रेवंथ रेड्डी यशस्वी झाले. भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी तेलंगणमध्ये १५ दिवस मुक्काम केला. त्यातून कार्यकर्त्यांना नवचेतना मिळाली. रेवंथ रेड्डी यांच्या आत्मविश्वासाला राहुल प्रियांका यांनी बळ दिले. तेलंगणाच्या गल्लीत ते दोघे दिसले. त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर रेवंथ रेड्डी यांनी शपथविधी सोहळय़ाची ९ डिसेंबर ही तारीखदेखील जाहीर केली. लोकसभेच्या ज्या १७ जागा तेलंगणात आहेत त्यात सध्या नऊ बीआरएस, चार भाजप, तीन काँग्रेस, एक एमआयएम असे वाटेकरी आहेत. रेवंथ रेड्डी यांचे वादळ राहुल गांधी लोकसभेला घेऊन आले, तर तेलंगणात काँग्रेस आघाडीवर जाईल, याविषयी विश्वास वाटतो.  -अभिजीत चव्हाण (नांदेड)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lokmanas loksatta readers reaction loksatta readers opinion amy 95

First published on: 02-12-2023 at 00:07 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×