‘देशाबाबत वाईट गोष्टींना जास्त प्रसिद्धी’ या मोहन भागवत यांच्या विधानाबद्दलची बातमी (लोकसत्ता- ३१ जुलै) वाचली. आपल्या राज्यात एवढय़ा प्रमाणात वाईट घटना घडत आहेत आणि त्यामुळेच त्याच्या बातम्या होत आहेत. खरे म्हणजे हे चांगल्या समाजाचे लक्षण नव्हे! अशा बातम्यांमुळे या घटनांत सहभागी व्यक्तींची कुप्रसिद्धीच होत असते. त्यामुळे गुन्हेगारी वृत्तीला अप्रत्यक्षपणे आळा बसू शकतो! वास्तविक वाढत्या वाईट घटना राज्यकत्र्यांसाठी लाजिरवाण्या आहेत किंबहुना त्यांच्या कारभाराचे हे अपयशच होय! म्हणून त्यांचा कारभार सुधारावा यासाठी आपण आग्रही असायला हवे. समाजात बभ्रा, बोभाटा, बदनामी, लोकोपवाद याचे भय असल्यामुळे अशी वाइटाची प्रसिद्धी गुन्हेगारी प्रवृत्तीवर निश्चितपणे अप्रत्यक्ष नियंत्रण आणू शकते! चांगल्या गोष्टींनाही प्रसिद्धी हवीच आणि मिळतेच! वाइटाचा बोभाटा केला नाही तर गुन्हेगार सोकावतील, गुन्हेगारी वाढेल.
- श्रीकांत मा. जाधव, अतीत (सातारा)
संभाजी भिडेंवर काय कारवाई करणार?
‘भारद्वाज स्पीक्स’ या ट्विटर हॅण्डलवर काही दिवसांपूर्वी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल जे विकृत आणि आक्षेपार्ह लिखाण करण्यात आले, जे ‘इंडिया टेल’ आणि ‘हिंदू पोस्ट’ने प्रसारित केले, त्यांच्यावर आजपर्यंत योग्य ती कायदेशीर कारवाई सरकारकडून केली गेलेली नाही. विधानसभेत विरोधी पक्षांकडून या संदर्भात जेव्हा आवाज उठविण्यात आला व कारवाईची मागणी करण्यात आली तेव्हा सरकारकडून या घटनेचा निषेध करण्यात आला.




वास्तविक सरकारने यासंदर्भात स्वत:हून कारवाई करणे अपेक्षित होते. एरवी फक्त काही ठरावीक महापुरुषांच्या बाबतीत तलवार उगारून उभ्या असलेल्या सरकारमधील कोणत्याही नेत्याला त्यावर आक्षेप घ्यावासा वाटला नाही. विरोधी पक्षांनी ओरड केल्यावर राज्याच्या गृहमंत्र्यांनी जे विधान केले, तो विरोधकांवर कुरघोडी केल्याचे भासविण्याचा प्रकार वाटला. खुद्द गृहमंत्र्यांनी भररस्त्यात फाशी देण्याची भाषा करावी, ही स्टंटबाजी वाटली. याच धर्तीवर संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या विधानावर सरकार काय कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. भिडे यांनी आजवर अशी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्यावर सरकारने कोणती कठोर कारवाई केली याची कल्पना नाही. परंतु महापुरुषांची अवहेलना होऊ नये, असे सरकारला वाटत असेल तर त्वरित कठोर कारवाई करावी!
- विकास देशमुख, ठाणे</li>
यामुळे प्रामाणिकपणावर शंका येते
संभाजी भिडेंवर कारवाई केली जाणार आहे, असे सांगताना गृहमंत्र्यांनी आपल्या प्रतिक्रेयेत राहुल गांधी व काँग्रेसवरही दुगाण्या झाडल्या हे योग्य नाही. देशात हा नवीनच पायंडा पडला आहे. देशाचे गेल्या काही वर्षांंत विचारधारेच्या आधारे जे विभाजन झाले आहे, त्यामुळे सर्वसामान्य माणसांमधील, विशेषत: राजकारण्यांमधील सौजन्य लोप पावल्याचे दिसते. एखाद्या विशिष्ट घटनेवर व्यक्त न होता त्याला जोडून अन्य घटनेची निंदा करणे हा आता प्रघात पडला आहे. त्यामुळे टीकेतील प्रामाणिकपणावर शंका येते. अन्य विषयांवर स्वतंत्रपणे टीका होऊ शकत नाही का? अशा वागण्यामुळे समाज मन अधिकच दुभंगणार नाही काय?
- शरद फडणवीस, कोथरूड (पुणे)
सावरकरांच्या वाडवडिलांवर टीका झालेली नाही
संभाजी भिडे हे नेहमीच प्रक्षोभक विधाने करतात व त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची ग्वाही देखील देण्यात येते. परंतु अद्याप या गृहस्थाविरोधात कारवाई झाल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे यावेळीदेखील त्यांच्या विरोधात कारवाई होईल, असे वाटत नाही. भिडे यांच्या विरोधात कारवाई होते की नाही, हे फारसे महत्त्वाचे नाही. परंतु फडणवीस यांनी त्यांची तुलना सावरकर यांच्यावर होणाऱ्या टीकेशी केली हे खटकणारे आहे.
राहुल गांधी अथवा कोणीही अद्याप सावरकर यांच्यावर वैयक्तिक टीका केलेली नाही. सावरकर यांनी तुरुंगातून सुटून आल्यानंतर स्वातंर्त्य लढय़ाबाबत जी भूमिका घेतली तसेच वेळोवेळी काँग्रेसला विरोध करण्यासाठी मुस्लीम लीगबरोबर जी हातमिळवणी केली त्याबद्दल त्यांच्या विरोधात टीका केली जाते. सावरकर यांचा धर्म, जात अथवा त्यांच्या जन्मासंबंधी संशय निर्माण करणारी वक्तव्ये अद्याप कोणीही केलेली नाहीत. सावरकरांनी स्वातंर्त्य संग्रामात घेतलेल्या ब्रिटिशधार्जिणी भूमिका या विषयावर चर्चा होऊ शकते. सावरकरांवर होणारी टीका दिशाभूल करणारी आहे, असे सावरकर भक्त म्हणू शकतात किंवा त्या विशिष्ट प्रसंगी सावरकरांना स्वातंर्त्य लढय़ाविरोधात भूमिका घ्यावी लागली, असे म्हणून सावरकरांच्या भूमिकेचे समर्थनही करण्यास हरकत नाही. परंतु असे न करता नेहरू, गांधी यांच्या विरोधात वैयक्तिक स्वरूपाची गरळ ओकली जाते त्यावर पायबंद घालणे आवश्यक आहे. असे न करता फडणवीस यांनी सावरकरांशी तुलना करून भिडे यांच्या वक्तव्याचे अप्रत्यक्षपणे समर्थन केले आहे. त्यामुळे भिडे यांच्या विरोधात कारवाई होईल, असे वाटत नाही.
- गिरीश नार्वेकर, जोगेश्वरी (मुंबई)
दावे भक्तांच्या टाळ्या मिळविण्यापुरतेच
‘लसलसते अंकुर हे..’ हा अग्रलेख (३१ जुलै) वाचला. भारतातील नागरिकांच्या सरासरी उत्पन्नाची इतर देशांतील नागरिकांच्या सरासरी उत्पन्नाशी तुलना केली तर जगाच्या बाजारात आपण नेमके कुठे आहोत, कितव्या स्थानावर आहोत हे दिसून येते. देशाच्या एकूण उत्पन्नाची इतर देशांच्या एकूण उत्पन्नाशी तुलना करून, ‘आम्ही पहिल्या पाचांत, पहिल्या तिनांत आहोत’ अशी फुशारकी मारण्याला काडीची किंमत नाही. तसे पाहाता लोकसंखेच्या बाबतीत आपण आता पहिले स्थान मिळविले आहे.
सरासरी, ही संकल्पनाही तशी फसवीच असते. मुकेश अंबानी, गौतम अदानी, मुंबईतील झोपडपट्टीतील कुणी एक नाका कामगार आणि ढेबेवाडी बुद्रुकमधील कुणी एक शेत मजूर या चौघांच्या उत्पन्नाची बेरीज करून त्या संख्येला चाराने भागले की त्या चौघांच्या सरासरी उत्पन्नाची संख्या मिळेल. परंतु, पहिले दोघे व शेवटचे दोघे यांच्या उत्पन्नातील प्रचंड मोठा फरक ती सरासरी संख्या सांगत नाही. श्रीमंत वर्गातील १० टक्के लोकांचे सरासरी उत्पन्न आणि तळातील दहा टक्के लोकांचे सरासरी उत्पन्न यांची तुलना केली तर मोठे अंतर दिसून येते व यातून भारतात विषमतेची दरी किती रुंद व खोल आहे हे दिसून येते. आकडेवारीमागील वास्तव परिस्थिती पूर्णपणे समजून घेण्यासाठी संख्याशास्त्रातील इतर संकल्पनांचा वापर करावा लागतो. भक्तगणांच्या टाळ्या मिळविणे आणि अर्थसाक्षर नसलेल्या मतदारांची मते मिळविणे यासाठी ‘आम्ही पहिल्या पाचांत, पहिल्या तिनांत आहोत’ ही पोकळ फुशारकी आहे, हे सुज्ञ माणसे जाणतातच.
- मुकुंद गोंधळेकर, पनवेल
उद्या पाठांतराऐवजी प्रार्थना करण्यास सांगाल
शिर्डीतील साईबाबांची प्रार्थना केल्यामुळे राधानगरी धरणातून सोडलेले पाणी कोल्हापूर शहरात शिरले नाही, असे धक्कादायक विधान दीपक केसरकर यांनी केले. केसरकर हे शालेय शिक्षणमंत्री आहेत. परीक्षेतील यशासाठी विद्यार्थ्यांंनी पाठांतराऐवजी प्रार्थना करावी, असे त्यांनी सांगितले तरी आश्चर्य वाटायला नको. डार्विनची उचलबांगडी झालीच आहे, आता विज्ञानालाही परतीचा मार्ग दाखवला तरी विशेष काही वाटणार नाही.
- शरद बापट, पुणे
एवढे जण बोलले, कुठे झाली कारवाई?
‘एकमुखी पाठिंब्यातून एक तरी उणे’ या पत्रातील (३१ जुलै), भाजपमध्ये मोदींच्या निर्णय-भूमिकेशी असहमती दर्शविण्याची हिंमत जरबेमुळे कोणी करत नाही, हे विधान कितपत खरे आहे? नाना पटोले, शत्रुघ्न सिन्हा, कीर्ती आझाद, यशवंत सिन्हा यांनी अशी असहमती दर्शवली आहे. त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई झाली नाही. याउलट राजस्थानमध्ये एका नेत्याने गहलोत यांच्याविरुद्ध वक्तव्य करताच त्यांची काँग्रेसकडून तत्काळ हकालपट्टी झाली.
- श्रीराम बापट, दादर (मुंबई)
ही शिंदेंची मोदी नीती
‘मविआ विरोधात उठाव केला नसता तर राज्य १५ वर्षे मागे गेले असते’ हे मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य (लोकसत्ता २९ जुलै) वाचले. या विनोदाचे हसू आले कारण शिंदेनी कशासाठी उठाव केला हे महाराष्ट्राला माहिती आहे ( ज्याला ते सोज्वळ ‘उठाव’ शब्द वापरतात त्यालाच महाराष्ट्रातील जनता ‘गद्दारी’ म्हणते.) देशातील समस्त जनता जाणून आहे की कोणताही राजकारणी सत्तेवर आला तरी विकास न राज्याचा होतो वा देशाचा. विकास होतो, तो केवळ राजकारण्यांचा! राजकारण्यांनी राजकारणात येण्याआधी स्वत:ची सामाजिक पत व सांपत्तिक स्थिती काय होती, नंतर महागडय़ा गाडय़ा, बंगले घेण्याएवढा विकास कसा झाला हे तपासावे. उगीच अवास्तव दावे करू नयेत. सत्तेवर बसलेच आहात, तर जनकल्याणाची कामे बिनबोभाट करावीत. शिंदेंचे हे वक्तव्य हेदेखील दर्शवते की, मोदींनी त्यांच्या डोक्यावर वरदहस्त ठेवला आहे. मोदी जसे ऊठसूट आपले अपयश लपविण्यासाठी काँग्रेसवर चिखलफेक करतात तीच नीती मुख्यमंत्र्यांनी अवलंबलेली दिसते.
- चंद्रशेखर सु. खारकर, ठाणे