‘टीईटी गैरप्रकारातील उमेदवारांना शिक्षक भरती प्रक्रियेत संधी’ हे वृत्त (लोकसत्ता- २४ सप्टेंबर) वाचले. या निर्णयामुळे उन्मत्त झालेल्या बोगस प्रमाणपत्रधारक उमेदवारांनी हे लक्षात घ्यायला हवे की, त्यांना फक्त स्व-प्रमाणपत्रासाठी नोंदणीची परवानगी आहे नियुक्तीची नाही! न्यायालय प्रामाणिक भावी शिक्षकांच्या बाजूनेच निर्णय देईल, अशी आशा आहे. या बोगस शिक्षकांनी राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षेत गैरप्रकार केला, परंतु केंद्रातील शिक्षक पात्रता परीक्षेत ते उत्तीर्ण (?) झाल्याने त्यांना नोंदणीची परवानगी देण्यात आली आहे. गुन्हेगाराने गुन्हा केल्यानंतर दुसऱ्याच क्षणी दानधर्म केला तरी त्याच्या गुन्ह्याचे गांभीर्य कमी होत नाही. प्रामाणिक उमेदवारांना याचा मानसिक त्रास होणे स्वाभाविक आहे. असो, स्व-प्रमाणपत्राची नोंदणीची परवानगी देताना त्यांना तूर्त नियुक्तीचा अधिकार नाही हे न्यायालयाने स्पष्ट केल्याने; तेवढाच काय तो दिलासा प्रामाणिक भावी शिक्षक उमेदवारांना.

  • गिरीश रामकृष्ण औटी, मानवत (जि. परभणी)

असे शिक्षक काय आदर्श ठेवणार?

टीईटी गैरप्रकारातील उमेदवारांना शिक्षक भरती प्रक्रियेत संधी मिळाल्याने अनिष्ट पायंडा पडण्याची भीती वाटते. उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार टीईटी परीक्षेत गैरप्रकार प्रकारणातील उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र सादर करण्याची संधी देत पदभरती प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाणार आहे. यामुळे प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय होणार आहे, हे दुर्दैवी म्हणावे लागेल. हे भ्रष्ट शिक्षक भावी पिढीसाठी काय आदर्श ठेवणार?  गुणवत्तापूर्ण शिक्षण या शिक्षणव्यवस्थेच्या उद्दिष्टापासून आपण फारकत घेत असल्याचे दिसते. उच्च न्यायालयाने अंतरिम निर्णयाचा पुनर्विचार करावा ही विनंती.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?
  • अरविंद बेलवलकर, अंधेरी (मुंबई)

नव्या महाविद्यालयांना, तुकडय़ांना परवानगी नको

रिकाम्या जागा काहीही करून भरण्यासाठी, असे सवंग लोकप्रियतेचे निर्णय घेतले जातात आणि गुणवत्तेला तिलांजली दिली जाते. वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तुकला, हॉटेल व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन, संगणक उपयोजन या व्यावसायिक (विशेषत: पदव्युत्तर) अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत ही परिस्थिती ओढवली आहे. मागणी आणि पुरवठा यांचा ताळमेळ लागेपर्यंत नवीन महाविद्यालये तसेच सध्याच्या महाविद्यालयांतील नवीन किंवा ज्यादा  तुकडय़ा काढण्यास संबंधित केंद्रीय परिषदांनी पूर्णविराम देणे गरजेचे आहे. सध्या हे होत नाही. त्यातून तात्पुरता मार्ग काढण्यासाठी असे अवसानघातकी निर्णय घेतले जातात आणि गुणवत्ता मार खाते. त्यामुळे ‘नीट’सारख्या महत्त्वाच्या परीक्षांना अर्थ उरत नाही. अशा विचित्र परिस्थितीत भारतीय विद्यापीठे जागतिक पातळीवर पहिल्या ५०० विद्यापीठांच्या क्रमवारीत कशी येणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

  • डॉ. विकास इनामदार, (जि. पुणे)

अशाने अनेक ‘मुन्नाभाई’ निर्माण होतील!

‘गुणवत्तेच्या बैलाला..’ हे संपादकीय (२५ सप्टेंबर) वाचले. अशी नामुष्की केंद्रीय आरोग्य मंत्रालयावर का यावी? हा निर्णय नेमका कोणाच्या फायद्यासाठी घेतला आहे? पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे पात्रता गुण कमी केले नसते तर कोणत्या पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयांतील जागा रिक्त राहिल्या असत्या? शासकीय की खासगी? नीट पीजी देऊन चांगले गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नक्कीच प्रवेश मिळेल. प्रश्न राहतो, तो जेमतेम गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा! यंदाच्या अनुभवातून धडा घेऊन अशी नामुष्की पुन्हा ओढावणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्यथा ‘बडे बाप के बेटे’ या परीक्षेचा अभ्यासच करणार नाहीत आणि अनेक ‘मुन्नाभाई’ निर्माण होतील! यंदाची नामुष्की ही पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आणखी दोन वर्षांनंतर येऊ घातलेल्या तुलनेने अधिक कठीण ‘नेक्स्ट’ प्रवेश परीक्षेसाठी धोक्याची घंटाच आहे.

  • डॉ. संयुजा खाडे, मुंबई

मग पैशांचा चुराडा का केला?

प्रतिमा संवर्धनासाठी जे चार दिवसांचे अधिवेशन बोलवण्यात आले होते, तिथे मूळ मुद्देआणि नरेंद्र मोदींपेक्षा अधिक चर्चा रमेश बिधुरी यांचीच झाली. विरोधकांना बिधुरी यांनी आयते कोलीत दिले. मुख्यालयात जे स्वत:चे सत्कार घडवून आणले त्याला ‘फुटेज’ मिळाले नाही. अंमलबजावणी एवढय़ात होणारच नसेल, तर करदात्यांच्या पैशांचा चुराडा करणे कितपत योग्य आहे?

  • परेश प्रमोद बंग, मूर्तिजापूर (जि. अकोला)

‘बहुमताचा आदर’ नव्हे ‘मतांसाठी लांगूलचालन’

‘विवेकवादासमोरील आव्हान’ हा अ‍ॅड.संदीप ताम्हनकर यांचा लेख (२४ सप्टेंबर) वाचला. ताम्हनकरांनी माफक शब्दांत समर्पक आशय उतरवला आहे. लेख अतिशय तर्कशुद्ध आहे व सर्व सुशिक्षित लोकांनी तो गांभीर्याने वाचला पाहिजे. खेदाची बाब ही आहे की कोणताही राजकीय पक्ष या विचाराच्या जवळ जाण्यास धजावत नाही. याचे कारणही ‘बहुमताचा आदर’पेक्षा ‘मतांसाठी लांगूलचालन’ हेच असावे. सर्व पक्ष वैज्ञानिक दृष्टिकोन न ठेवता कोणत्या ना कोणत्या समूहाचे लांगूलचालन करताना दिसतात.

  • चंद्रशेखर कारखानीस, मालाड (मुंबई)

खड्डे गेले वाहून आणि फ्लेक्स झाले लावून..

‘गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासातही वाहतूक कोंडीचे विघ्न’  ही बातमी (लोकसत्ता, २५ सप्टेंबर) वाचली. गणेशोत्सव संपण्यापूर्वीच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरचे तथाकथित ‘नवीन तंत्रज्ञाना’ने भरलेले खड्डे पावसाने वाहून गेलेले आहेत. आता वर्षभर नवीन रस्त्याचे काम होणार नाही. रस्ते दुरुस्तीचे काम होणार नाही. पुन्हा पावसाळा येणार. पुन्हा गणेशभक्त व कोकणवासीय खड्डेमुक्त रस्त्याने प्रवास करण्याची मागणी करणार.  पुन्हा नवीन तंत्रज्ञानाने भर पावसात खड्डे भरण्याचे टेंडर निघणार आणि पुन्हा अभिनंदनाचे व धन्यवादाचे फ्लेक्स लागणार! सोबतच्या छायाचित्रासारखेच ‘चित्र’ मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांना व कोकणवासीयांना वर्षांनुवर्षे दिसत राहणार!

  • टिळक उमाजी खाडे, नागोठणे (जि. रायगड)

Story img Loader