‘अधर्मयुद्धाचा बीमोड!’ या अग्रलेखातील (२७ सप्टेंबर) मागासांचा प्रतिवाद अधिक मागासलेपणात व  धर्मातिरेकाचे उत्तर अन्य धर्मीयांच्या अतिरेकी धर्मभावनेत नसते हा विचार महत्त्वाचा आहे. काही वर्षांपूर्वी, ते कुटुंब सीमित ठेवत नाहीत म्हणून आपणही ठेवू नये अन्यथा त्यांची लोकसंख्या वाढेल असा विचार पसरवला जात होता. ते रस्त्यावर नमाज पठण करतात म्हणून आपणही  सामुदायिक आरत्या म्हणायच्या. ते भोंगे लावतात म्हणून आपणही ध्वनिवर्धक लावायचे. पुरुषांनी धोतर नेसावे, फेटे गुंडाळावेत याचाही पुरस्कार काही धर्मप्रेमी करत. अशा स्थितीत समाजाला हाताशी धरून छोटे कुटुंब, ध्वनिप्रदूषण आणि इतरांना उपद्रव न देता धर्माचरण वगैरे मुद्दे पटवणे महत्त्वाचे होते. ते धर्मशिक्षण देतात म्हणून आपणही द्यायचे ही मागणी सध्या जोर धरत आहे. धार्मिक शिक्षण देणे चांगले, पण नीतिमत्तेचे धडे देणे त्याहूनही महत्त्वाचे. मग त्यात काही धर्माधिष्ठित नीतिमूल्ये उद्धृत केली गेली तरी ते वावगे समजले जाऊ नये. जसे पितृआज्ञेचे पालन करणारा राम असो, वचन पाळणारा हरिश्चंद्र असो अथवा अद्वितीय प्रतिज्ञा करणारा भीष्म असो. आपल्याला ‘हक्र्युलीअन एफर्ट’ चालतो, तर भगीरथ प्रयत्न का चालू नये? गॉर्डीयन नॉट चालते, तर ब्रह्मगाठ का चालणार नाही? एकूणच धर्माचरण, नैतिकता व राष्ट्रहित याबाबत अधिक संतुलित व परिपक्व विचार करण्याची गरज आहे.

– डॉ. विराग गोखले, भांडुप

तुमचा दाऊद तर आमचा अरुण हेही ऐकले होते

‘अधर्मयुद्धाचा बीमोड!’ हा अग्रलेख (२७ सप्टेंबर) वाचला. पीएफआयसारख्या दहशतवादी संघटना परदेशी मदतीवर अवलंबून असतातच, पण त्यांना देशातून काही समाजकंटक छुपी मदत करतात. काही पाश्चिमात्य देशांनी ऐंशीच्या दशकापासून भारतात शीख दहशतवाद वाढवला. त्यांना अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडामधून मदत मिळत होती. मुस्लीम दहशतवाद वाढताना आपलेच नेते ‘तुमचा दाऊद तर आमचा अरुण गवळी’ अशा घोषणा देत. पीएफआय असो अथवा इतर कोणत्याही दहशतवादी संघटना त्यांच्यामुळे आपण दोन पंतप्रधान आणि एक लष्करी अधिकारी- अरुण वैद्य यांना गमावले आहे. भावनिक आणि धार्मिक घोषणांनी दहशतवाद संपत नाही. त्याचा बीमोड राष्ट्रीय संकट म्हणून सर्वानी करायचा असतो.

– सुनील समडोळीकर, कोल्हापूर</p>

नेमस्तांनी कधी पाकविरोधी भूमिका घेतली का?

‘अधर्मयुद्धाचा बीमोड!’ हा अग्रलेख (२७ सप्टेंबर) वाचला. ‘नेमस्तांचे हात बळकट करावे लागतील,’ ही मांडणी वरवर चांगली वाटते. मुस्लीम समाजातील तथाकथित नेमस्त ही केवळ आभासी संकल्पना आहे. वर्षांनुवर्षांतून कोणी एखाद-दुसरा हमीद दलवाई किंवा बोहरा समाजातील कोणी असगर अली, त्यांचे हातांच्या बोटांवर मोजता येतील एवढे अनुयायी आणि त्यांना, त्यांच्या चळवळीला आलेले दारूण अपयश- हेच वास्तव आहे. १५ ऑगस्ट १९४७ पासून आजतागायत पाकिस्तानशी चार प्रत्यक्ष युद्धे झाली. असंख्य छुपे दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट वगैरे झाले. त्यांत हजारो निरपराध नागरिक मारले गेले. या सर्वाविरोधात नेमस्तांनी काय भूमिका घेतली? या सर्व घटनांचा कधी साधा निषेध तरी केला का?

– श्रीकांत पटवर्धन, कांदिवली (मुंबई)

प्रगतिशील समाजासाठी अधर्माशी लढायला हवे

‘अधर्मयुद्धाचा बीमोड!’ हा अग्रलेख (२७ सप्टेंबर) वाचला. धर्मातिरेकामुळे होणारा हिंसाचार ही सभ्य समाजाला लागलेली कीड आहे. राजकीय व धार्मिक उद्दिष्टांसाठी जनतेच्या धार्मिक भावना भडकवून समाजात निर्माण केल्या जाणाऱ्या अस्वस्थतेतून धर्मातिरेकी निर्माण होतात व ते अंतिमत: समाजालाच कमकुवत करतात. हे टाळण्यासाठी धर्मातिरेकी निर्माण करणाऱ्या व्यक्ती, संघटनांना कायदेशीर मार्गाने योग्य ती शिक्षा द्यायला हवी. एखाद्या धर्मातील धर्मातिरेक्यांना उत्तर म्हणून दुसऱ्या धर्मातील धर्मातिरेक्यांचे केले जाणारे समर्थन हे समाजाच्या घसरलेल्या पातळीचे निदर्शक आहे. प्रा. जोसेफ यांचे हात तोडण्याचे कृत्य जितके रानटी तितकेच गोमांस बाळगल्याच्या संशयातून गेलेले झुंडबळी, बलात्कार पीडितेचा धर्म पाहून बलात्कार करणाऱ्यांच्या समर्थनार्थ निघणारे मोर्चे व बलात्काऱ्यांचे जाहीर सत्कारदेखील घृणास्पद आहेत. अधर्माचा तसा कुठल्याही धर्माशी संबंध नसतो. जे जे मानवी मूल्यांच्या विरोधात असते त्याचा संबंध अधर्माशी असतो. त्यामुळे प्रत्येकाने आपली राजकीय भूमिका व धार्मिक श्रद्धा बाजूला सारून मानवी मूल्यांच्या आड येणाऱ्या व्यक्ती, प्रवृत्ती व संघटनांच्या विरोधात ठोस भूमिका घ्यायला हवी. प्रगतिशील समाजाच्या निर्मितीसाठी हे आवश्यक आहे. अन्यथा आपलीही वाटचाल रानटी समाजाकडे होईल, हे निश्चित.  

– हेमंत सदानंद पाटील, नाळे (नालासोपारा)

रस्त्यांवरची जागा पार्किंगमुळेच अडते

खासदार फिरोज वरुण गांधी यांची शहरांविषयी नव्या विचारांची ‘पहिली बाजू’ (२७ सप्टेंबर) वाचनात आली. या लेखात मुंबईतील काही मुद्दय़ांची दखल घेतली आहे. मुंबईत रस्त्यांवर सर्व प्रकारची वाहने दुतर्फा पार्क करून २०-२५ फूट जागा गिळंकृत केली जाते. वाहने खरेदी करताना ती ठेवण्यासाठी जागा आहे अथवा नाही हा निकष लावला जात नाही. खासगी वाहने व भरमसाट रिक्षा यांनी अडवलेला रस्ता यावर गलितगात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे व रस्तोरस्तीचे पार्किंग बंद करणे हा एक चांगला उपाय ठरू शकेल.

– शंकर नंदनवाडकर, डोंबिवली

नियमांना बगल देण्याची मानसिकता घातक

प्राचीन भारतीय नगररचनेची वैशिष्टय़े अभ्यासताना त्या काळात नगरे पाणवठय़ाजवळ वसविल्याचे आढळते. पाश्चिमात्य नगररचनेचे अलीकडच्या काळातील उदाहरण म्हणून नवी दिल्ली, चंदिगडचा उल्लेख केला जातो. वसाहतवाद आणि औद्योगिक क्रांतीच्या प्रभावाखाली भारतीय नगररचनाशास्त्र अडगळीत पडले. उपभोगवृत्ती वाढीस लागली. विकसित राष्ट्रांत दरडोई उत्पन्नाप्रमाणेच दरडोई ऊर्जावापरही मोजला जातो. पर्यावरणाचा गांभीर्याने विचार सुरू झाला तो एकविसाव्या शतकापासून. प्रचंड लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशात शेती हा पूर्वपार प्रमुख व्यवसाय होता. त्यामुळे गरजा मर्यादित होत्या. विसाव्या शतकातील अनिर्बंध नगरीकरणामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. शहरालगत हिरवा पट्टा, मोकळी मैदाने, चराऊ कुरणे, वने हे टाकाऊ वाटू लागले. नियमांना बगल देण्याची राजकीय व प्रशासकीय मानसिकता बदलणार नाही तोपर्यंत नगररचनेचा विध्वंस होतच राहणार.

– लक्ष्मण संगेवार, नांदेड</p>

कामाच्या ठिकाणाजवळ परवडणारी घरे द्याल?

‘शहरांचा नव्याने विचार हवा..’ या शीर्षकाचा फिरोझ वरुण गांधी यांचा लेख (२७ सप्टेंबर) वाचला. भारतात शहर नियोजक कमी आहेत. शिवाय राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे शहरांची अमर्याद वाढ झाली. ४० टक्के शहरीकरण रोजगारनिर्मितीसाठी साहाय्यक असले तरी जोपर्यंत श्रमिकांना परवडणारी घरे कामाच्या ठिकाणाजवळ बांधली जात नाहीत तोपर्यंत कामगारांचे स्थलांतर सुरूच राहणार. अनेक आस्थापनांमध्ये स्थानिक कुशल कामगार उपलब्ध होत नाहीत. भरमसाट किमती असलेली गगनचुंबी घरे ओस पडतात आणि स्थानिक प्रशासन मूलभूत सेवा देण्यात कमी पडते. ही परिस्थिती बदलायची असेल, तर विद्यमान शासनाला कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे. कौशल्य विकास, घर, कामाचे ठिकाण, सोयीची वाहतूक व्यवस्था आणि आरोग्य यांची योग्य सांगड घालून देणारे नियोजक कमी नाहीत.

– श्री. ना. फडणीस, दादर (मुंबई)

पुस्तकाचे ‘विमोचन’ इंग्रजीतून आले..

यास्मिन शेख यांनी ‘विमोचन’ शब्दाबाबत लिहिले (भाषासूत्र- २६ सप्टेंबर) ते योग्यच आहे. हिंदीत हा शब्द उपयोगात असतो. मराठीत प्रकाशन हाच शब्द वापरतात. ‘विमोचन’ हा शब्द आला कुठून? तर, तो इंग्रजीतल्या रिलीझ (रिलीज़्‍ा –  १ी’ीं२ी) या शब्दाचा अनुवाद आहे. कार्यक्रमात पुस्तक छानशा वेष्टनात बांधलेले असते आणि मग पाहुणे ते वेष्टन उलगडून पुस्तक प्रकाशात आणतात, म्हणून रिलीझ शब्द व्यवहारात आला असणार. मुक्तता, सुटका हे याचे अर्थ आहेतच. पण ते लक्षणेने घेतले जावे. मराठीत असे बरेच शब्द रूढ होत गेले आहेत. ‘प्रकाशन’ हा शब्दही पुस्तक उजेडात आणले जाते, लोकांसमोर येते या अर्थाने आला. इंग्रजीतील ‘पब्लिश’ शब्दात पुस्तक लोकांमध्ये येणे, सार्वजनिक होणे हे आहेच. 

– नंदिनी आत्मसिद्ध, मुंबई

शिक्षकांसाठी घोषणाही नाही!

‘पोलीस दलात २० हजार पदांची भरती करणार’ अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली; परंतु राज्यात शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार ६७,७५५ शिक्षकांची रिक्त पदे भरायची आहेत. पण राज्य शासनावर मोठय़ा प्रमाणावर आर्थिक भार पडणार आहे म्हणून ती पदे भरत नाहीत. आज कित्येक शाळांत पुरेसे शिक्षक नाहीत. शालेय व्यवस्थापनास अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. ० ते २० विद्यार्थी असलेल्या शाळा बंद केल्या जात असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांनी राज्यातील गोरगरीब व तळागाळातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, शिक्षक भरतीची घोषणा विनाविलंब होईल असे पाहावे.

– प्रा. जयवंत पाटील, भांडुप पूर्व (मुंबई)