scorecardresearch

लोकमानस : काँग्रेस एक पाऊल पुढे तर चार पावले मागे

 ‘आजा मेला नि..’ हे संपादकीय (२८ सप्टेंबर) वाचले. काँग्रेस दिवसेंदिवस अधिकाधिक कमकुवतच होताना दिसते. अधूनमधून काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाच्या आशा काहीशा पल्लवित होतात, मात्र लगेच ये रे माझ्या मागल्या.

लोकमानस : काँग्रेस एक पाऊल पुढे तर चार पावले मागे
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

 ‘आजा मेला नि..’ हे संपादकीय (२८ सप्टेंबर) वाचले. काँग्रेस दिवसेंदिवस अधिकाधिक कमकुवतच होताना दिसते. अधूनमधून काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाच्या आशा काहीशा पल्लवित होतात, मात्र लगेच ये रे माझ्या मागल्या. कधीकाळी देशाच्या राजकारणात काँग्रेसने अधिराज्य गाजवले. अनेक वर्षे देशाच्या वाटचालीत योगदान दिले, मात्र गेल्या काही वर्षांपासून विशेषत: २०१४ नंतर काँग्रेस उभारी घेताना दिसत नाही. याला सध्याचे गांधी घराणे, शीर्षस्थ नेतृत्व, नेते, कार्यकर्ते, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळेच जबाबदार आहे. सामान्य जनतेशी काँग्रेसचा संपर्क राहिलेला नाही. पक्षाला ना निश्चित दिशा ना कार्यक्रम.

अंतर्गत कलह, गटबाजी, सत्तेविना राहू न शकणारे नेते, कार्यकर्ते, घराणेशाही यामुळे काँग्रेसच्या भवितव्यावरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सद्य:स्थितीत काँग्रेस केवळ राजस्थान आणि छत्तीसगड या दोनच राज्यांत सत्तेवर आहे. २०१७ साली राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये लक्षणीय यश मिळविले त्यानंतर मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, कर्नाटक या राज्यांत सत्ता मिळवली तेव्हा काँग्रेसचे ‘अच्छे दिन’ सुरू झाले असे वाटले होते, मात्र कालांतराने काँग्रेसने कर्नाटक, मध्य प्रदेशातील सत्ता गमावली. गेल्या वर्षी पंजाब गमावले. ‘भारत जोडो’ यात्रेचा काय परिणाम होतो, हे भविष्यात दिसेल, मात्र त्याच वेळी राजस्थानात सत्तासंघर्ष सुरू झाला आणि काँग्रेसच्या वाटचालीवर प्रश्न निर्माण झाला आहे. आज  मोदी सरकारची कार्यपद्धती पहाता देशात सक्षम विरोधी पक्ष असणे ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी आजही काँग्रेसकडेच अपेक्षेने पाहिले जाते, मात्र काँग्रेसचे एक पाऊल पुढे तर चार पावले मागे असे चालले आहे.

– अनंत बोरसे, शहापूर (ठाणे)

गांधी सहजासहजी सत्ता सोडणार नाहीत

‘आजा मेला नि..’ हे संपादकीय (२८ सप्टेंबर) वाचले. मुकुल वासनिकांचे नाव शर्यतीत डोकवू लागले आहे. एकदा सत्तेचे पद सोडले की आपली किंमत शून्य आणि पक्षश्रेष्ठी आपला खुळखुळा करतील, हे गेहलोत जाणून आहेत. म्हणूनच त्यांना मुख्यमंत्रीपदही ठेवायची इच्छा आहे. ‘एक व्यक्ती, एक पद’ हा राहुल यांचा हट्ट आहे. इंदिरा गांधींचा इतिहास काय सांगतो, हे ते विसरतात. गांधी घराणे सत्ता इतक्या सहजासहजी सोडणार नाही, कारण त्यांच्याविरुद्ध जे खटले सुरू आहेत त्यात दबाव आणण्यासाठी त्यांना पक्षसंघटनेची नितांत आवश्यकता आहे. त्यातच कर्तृत्ववान अध्यक्ष आला तर राहुल गांधींचे स्थान डळमळीत होईल, अशी भीती आहे. या निवडणुकीमुळे पक्षात बदल होईल हा भ्रमच आहे. (जी काही उरलीसुरली आहे, त्याही) सत्तेची अभिलाषा नसणे हे आता पंचतंत्रातच वाचायचे. प्रत्यक्षात ते अवघडच नाही, तर अशक्य आहे. म्हणूनच गांधी आपल्या अंगठय़ाखाली स्वेच्छेने राहू इच्छिणारा उमेदवार निवडतील.

– सुहास शिवलकर, पुणे

हे स्वत:च स्वत:ला अडचणीत आणण्यासारखे

‘आजा मेला नि..’ अग्रलेख (२८ सप्टेंबर) वाचला. राहुल गांधींच्या पदयात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादाची छायाचित्रे समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरत होती आणि त्यामुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता पसरली होती, तेव्हा काँग्रेसमध्ये पक्षातूनच फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. गेहलोत यांनी अद्याप काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्जही भरलेला नाही आणि त्यांच्या जागी नवीन मुख्यमंत्री नेमण्यासाठी निरीक्षक पाठवण्यात आले. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल येण्यास काही आठवडे लागू शकतात आणि खुद्द पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनीच राजस्थान विधिमंडळ पक्षात असा गोंधळ निर्माण केला आहे.

राजस्थानमध्ये काँग्रेस एवढा मोठा धोका पत्करू शकेल एवढे, संख्यात्मक अंतर काँग्रेस आणि भाजपच्या आमदारांमध्ये नाही, हे राजकीय निरीक्षकांनाही समजू शकले नाही का? एखादा पक्ष स्वत:च स्वत:साठी अडचणी कशा निर्माण करू शकतो, याचे काँग्रेसपेक्षा उत्तम उदाहरण नाही. पक्षाध्यक्ष होण्यापूर्वी गेहलोत यांचा हा तोरा असेल, तर पक्षाध्यक्ष झाले तर ते अनियंत्रित, बंडखोर किंवा मनमानी करणारे अध्यक्ष ठरणार नाहीत? जेव्हा पक्ष संपूर्ण देशाचे संघटन त्यांच्या हातात देत आहे, तेव्हा त्यांच्याच राज्यात त्यांच्याच आमदारांमध्ये सार्वजनिक बंडखोरीची अशी परिस्थिती निर्माण होऊ न देणे ही त्यांची जबाबदारी नाही का?

– तुषार अशोक रहाटगावकर, मस्कत (ओमान)

राज्यांत नेतृत्व पुढे येऊ न दिल्याचा फटका

‘आजा मेला नि..’ हे संपादकीय (२८ सप्टेंबर) वाचले. देशातील लोकशाहीला काँग्रेस हवी आहे आणि काँग्रेसला लोकशाही मार्गाने जायला वेळ नाही, अशी विचित्र स्थिती आहे. राजीव गांधी यांच्या निधनानंतर काँग्रेसचे अंतर्गत प्रश्न चव्हाटय़ावर येऊ लागले. शेवटी अशी वेळ आली की यूपीएचा प्रमुख पक्ष म्हणून काँग्रेस नावापुरतीच उरली. पक्षाला यूपीएची गरज का वाटू लागली, याचे गणित सोडविणे काँग्रेसला महत्त्वाचे न वाटणे अनाकलनीय आहे. राजीव गांधींनंतर राज्यांत नवीन नेतृत्व पुढे येऊ दिले गेले नाही आणि हेच काँग्रेससाठी मारक ठरले. अनेक नेते पक्ष सोडून गेले. आज पक्षाची स्थिती बिकट आहे. ती सुधारण्यासाठी काढण्यात आलेल्या पदयात्रेचे भारूड जनतेला भावणारे नाही. काँग्रेसला पक्षाचा ढासळलेला इमला परत एकदा मेहनतीने उभारावा लागेल.

– सुबोध पारगावकर, पुणे

पंकजा मुंडे यांचा पंतप्रधानांना घरचा आहेर

पंकजा मुंडे यांनी औरंगाबादमध्ये केलेल्या वक्तव्याविषयी वाचले. गेल्या दोन-तीन वर्षांत मोदी घराणेशाहीवर हल्ला चढवत असताना पंकजा मुंडे यांचे हे विधान म्हणजे खुद्द मोदींनाच घरचा आहेर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ‘जनतेच्या मनात’ असा उल्लेख जेव्हा पंकजा मुंडे करतात तेव्हा त्यांना लोकांमधून थेट लोकसभा व विधानसभेवर निवडून गेलेले लोकप्रतिनिधी अभिप्रेत असावेत. त्यामुळे त्या काही गैर म्हणाल्या, असे वाटत नाही. तसेही वर्षांनुवर्षे राज्यसभा, विधान परिषदेवर जाणारे हे राजकारणातील ‘आधुनिक संस्थानिकच’ म्हणायला हवेत. याच भाषणात पंकजा मुंडे असेही म्हणाल्या, ‘राजकारण आता करमणुकीचे साधन होऊ लागले आहे,’ त्यांचा रोख किरीट सोमय्या, आशीष शेलार, राम कदम, राज ठाकरे यांच्या दिशेने असावा, असे दिसते. एकंदरीत पंकजा मुंडे यांनी जो स्पष्टवक्तेपणा दाखवला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. 

– जयश्री कारखानीस, तळेगाव दाभाडे

वर्ग हे सांस्कृतिक बदलांचे स्थान ठरावे

‘वर्ग शाळेत हवे की समाजात?’ हा लेख (२८ सप्टेंबर) वाचला. वर्ग फक्त शाळेत शिकण्यासाठी असायला हवेत. समाजात गटातटाचे राजकारण करण्यासाठी नसावेत. भारताला जातिव्यवस्थेने पोखरले आहे. जातीय दंगली होतात. दलितांवर अन्याय, अत्याचार होतात. बलात्काराच्या घटनांबद्दलची वृत्ते वाचून मन सुन्न होते. माणुसकीचा ऱ्हास होताना दिसतो. गेल्या महिन्यात राजस्थानात दलित बालकाचा शिक्षकाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. वेठबिगारी, कमी दर्जाची मानली जाणारी कामे आजही दलितांकडून करून घेतली जातात. यातून विषमतेची बीजे रोवली जात आहेत. त्यामुळे वर्ग हे समाजात नको तर शाळेतच असायला हवेत.

शिक्षणाचे व्यावसायिकीकरण होत आहे. खासगीकरणाच्या नावाखाली नवभांडवलदार निर्माण केले जात आहेत, म्हणून भ्रष्टाचार अधिक फोफावला असून शिक्षकांची भूमिका मलिन होताना दिसते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आवडते शिक्षक जॉन डय़ुवी यांनी म्हटल्याप्रमाणे ‘वर्ग हे सांस्कृतिक बदलाचे स्थान आहे आणि शिक्षकांनी त्याकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांमध्ये बदल घडविला पाहिजे’ अन्यथा जळीस्थळी जात, वर्गाची फळी निर्माण करून लोकप्रतिनिधी स्वत:च्या पोळय़ा भाजून घेतील.

– दुशांत निमकर, गोंडिपपरी (चंद्रपूर)

नेत्यांचे शक्तिप्रदर्शन, सर्वसामान्यांचे हाल?

मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे दोन्ही गट जोरदार शक्तिप्रदर्शन करणार हे आता निश्चित झाले आहे. त्याचाच भाग म्हणून शिंदे गटाने जवळपास साडेचार हजार एसटी बस आरक्षित करण्याची तयारी सुरू केली आहे. तसे झाल्यास दसऱ्याला सर्वसामान्य प्रवाशांना पुरेशा एसटी बस उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागांतील प्रवाशांसाठी वाहतुकीची समस्या निर्माण होऊ शकते आणि त्यांचे हाल होऊ शकतात. एसटी गाडय़ांसोबतच खासगी वाहने, खासगी बसही मोठय़ा प्रमाणावर मुंबईत येणार आहेत. त्यामुळे मुंबईत वाहतूककोंडी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. शक्तिप्रदर्शनासाठी आग्रही असणाऱ्या नेत्यांनी विशेषत: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या बाबी विचारात घेतल्या असत्या, तर बरे झाले असते.

– दीपक काशिराम गुंडये, वरळी (मुंबई)

काय खिलाडू आणि काय अखिलाडूपणाचे!

नुकत्याच भारत विरुद्ध इंग्लंड महिला क्रिकेट सामन्यात भारताच्या दीप्ती शर्माने इंग्लंडच्या खेळाडूस चेंडू टाकण्यापूर्वी क्रीज सोडल्याने आऊट, थोडक्यात मांकिडग केले. सामन्यानंतर याविषयी इंग्लंडच्या आजी-माजी खेळाडूंनी खिलाडूवृत्तीचा मुद्दा उपस्थित केला. अशा पद्धतीने बाद करणे अखिलाडूपणाचे असेल तर चेंडू टाकण्यापूर्वी क्रीज सोडणे हे तरी खिलाडूपणाचे आहे काय?

– सुबोध गद्रे, कोल्हापूर

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या