मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत शरद पवार-आशीष शेलार यांच्या पॅनेलने बाजी मारल्याचे वाचले. पवार व शेलार राजकीय विरोधक असूनही ते इथे एकत्र कसे हा माझा मुद्दा नाही. सामायिक रुची असलेल्या बाबींत अन्य बाबींत विरोध असतानाही लोक एकत्र येऊ शकतात. ते निरोगी मानसिकतेचे लक्षण आहे. माझा मुद्दा आहे सक्रिय राजकारणात विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणारे, अत्यंत व्यग्र असलेले खेळाच्या क्षेत्रात नेतृत्व करण्यात आपला बहुमूल्य वेळ का दवडतात? क्रिकेटच्या विकासाची ती निकड आहे का? ते काम सांभाळायला त्या खेळाशी संबंधित लोक लायक नाहीत का? खेळणारे, खेळात रस असणारे, खेळाची माहिती असणारे आणि यासह संस्था चालवण्याचे कौशल्य असणारे लोकच खेळाच्या संस्थेत असायला हवेत. ज्या राजकारण्यांना खेळात रस आहे, त्यांनी या संस्थेस साहाय्यभूत व्हावे. त्याचे सुकाणू आपल्या हाती घेऊ नये. हे अन्य कोणत्याही क्षेत्राबद्दल म्हणता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देश वा राज्याचा कारभार चालवणे, तो चालवणाऱ्यांवर लक्ष ठेवणे, हे राजकारण्यांसाठी इतके मोठे काम आहे की त्यांनी या किरकोळ बाबींत वेळ का घालवावा? स्वत:ची आवड म्हणून मॅच पाहावी, कधी जिमखान्यात जाऊन खेळावेही. ज्यांना साहित्य, काव्यात आवड आहे, त्यांनी त्यांच्या फुरसतीच्या वेळात कवी-साहित्यिकांच्या मैफली जमवाव्यात. साहित्यविषयक काही मत असेल तर लेख लिहावा, साहित्य संमेलनात एखाद्या सत्रात त्याबद्दल वक्ता म्हणून मांडणी करावी. ते स्वत: सर्जनशील साहित्यिक असतील तर त्यांनी कविता, कथा वाचावी. पण त्या संमेलनाचे वा साहित्य संस्थेचे नियंत्रक असू नये. ते काम त्या क्षेत्रातच प्रामुख्याने काम करणाऱ्यांवर सोडून द्यावे. माणसे नोकरीतून निवृत्त झाली की आपल्या आवडीच्या क्षेत्रात अधिक काम करू लागतात. तसे राजकारण्यांनी राजकारणाच्या क्षेत्रातून मुक्त झाल्यावर वा होऊन जरूर आपल्या आवडीच्या बाबींत अधिक जबाबदाऱ्या घ्याव्यात.

एखादा खासदार किंवा आमदार लोक निवडून देतात तो खेळात व्यग्र राहण्यासाठी नाही. खेळाला प्रोत्साहन, त्यातील अडचणी सोडवायला त्याने मदत जरूर करावी, पण त्याचे संचालक होऊ नये. एखाद्याकडे एकाच वेळी खूप कामे करण्याची कुवत असते. तरी त्याने ती कुवत राजकीय कामासाठी वापरावी, समाजाच्या अन्य विविध अंगांना विकसित होण्यासाठी त्या अंगांच्या जाणकारांकडून आलेल्या सूचनांप्रमाणे चालना देण्यास वापरावी. पण तत्त्व म्हणून त्या क्षेत्रातल्या लोकांच्या हातीच त्या क्षेत्राचे सुकाणू राहील हे पथ्य पाळायला हवे. युरोपात खेळाच्या संस्थेचे चालक खेळाशी संबंधित लोकच असतात, असे मी ऐकले आहे. मग भारतात राजकारणी लोक या संस्थांत का गरजेचे आहेत?

– सुरेश सावंत, नवी मुंबई

खेळाच्या राजकारणात राजकारण्यांचा खेळ

मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीमध्ये राजकीय ताकदीसमोर माजी कसोटीपटूला पराभूत व्हावे लागले. एरवी समाजमाध्यमे किंवा जाहीर सभांमधून एकमेकांवर यथेच्छ चिखलफेक करणारे आणि एकमेकांची उणीदुणी काढून तोंडसुख घेणारे राजकारणी, सत्ता आणि पैसा मिळवण्यासाठी कसे एकत्र येतात आणि राजकीय संस्कृती, संस्थात्मक काम इत्यादी गोंडस नावांखाली आपले आर्थिक हितसंबंध कसे जोपासतात याचे हे एक उत्तम उदाहरण. यालाच म्हणतात वरून कीर्तन आतून तमाशा.

– बकुल बोरकर, विलेपार्ले, मुंबई

काँग्रेसला अध्यक्ष मिळाला, गती मिळेल का?

‘फुटलेल्या पेपराचा निकाल!’  हा (२१ ऑक्टोबर) संपादकीय लेख वाचला. ढेपाळलेल्या काँग्रेस पक्षात मल्लिकार्जुन खरगे संजीवनी मिळवून देतील अशी अपेक्षा बाळगायला सध्या तरी काही हरकत नाही. पुढील दोन वर्षे खरगे यांना काँग्रेस पक्षातील अंतर्गत राहू-केतूंचा सामना करावा लागणार आहे. नेहरू-गांधी घरातील बुजुर्ग म्हणून वावरणारे खरगे एकदम काही वेगवेगळय़ा भूमिका घेतील ही अपेक्षा करणे गैर आहे. काँग्रेस पक्षात निर्णय प्रक्रिय अशी एकटय़ाच्या हाती दिली जाणे शक्य नाही. उपाध्यक्ष, जनरल-सेक्रेटरी, कोषाध्यक्ष, प्रभारी आणि सेक्रेटरी नेमून ते हायकमांड गटात वर्चस्व कसे प्रस्थापित करतात, हे पाहावे लागेल. तसेच ऑल इंडिया काँग्रेस समिती, प्रादेशिक काँग्रेस समिती  या पक्षांतर्गत समित्यांची निवड कशी करतात, आपला अनुभव आणि कणखर मानसिकतेच्या आधारे कार्यक्षमता कशी सिद्ध करतात याविषयी सध्या कुतूहल आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वड्रा ही दुक्कलच काँग्रेस कार्यशैली आणि कार्यक्रम सादर करणार आहेत. तो स्वीकारताना खरगे यांची कसोटी लागणार आहे. यातून खरगे हे गांधी घराण्याचे रबर स्टॅम्प होऊन काँग्रेस चालवणार, असे दिसते.

– सुबोध पारगावकर, पुणे

काँग्रेसला मिळाले एकदाचे पूर्णवेळ अध्यक्ष

बहुचर्चित आणि बहुप्रलंबित काँग्रेस अध्यक्षपदाचा एकदाचा फैसला झाला. काँग्रेसची संस्कृती आणि विचारधारा नसानसांत भिनलेले वयोवृद्ध तरुण मल्लिकार्जुन खर्गे अध्यक्ष म्हणून लाभले. एक प्रश्न सुटला असला तरी दुसरे नवीन प्रश्न त्यातून निर्माण झाले आहेत. पहिला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निवडणूक जाहीर झाल्यापासून समस्त काँग्रेसजनांच्या आणि देशवासीयांच्या मनांत घुमतो आहे, तो म्हणजे अध्यक्ष म्हणून खर्गे यांना खरोखर कामाचे स्वातंत्र्य असेल का? दुसरा म्हणजे त्यांच्या वयाच्या मानाने त्यांना खरेच काम झेपेल का? ते पराभूत, खचलेल्या मन:स्थितीत असलेल्या काँग्रेसला उभारी देऊ शकतील का?

विविध भाषिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या भारतीय जनमानसाला काँग्रेसच्या झेंडय़ाखाली पुन्हा एकत्र आणणे आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या बरोबरीने जागा निवडून आणणे हे मोठे धनुष्य खर्गेना उचलायचे आहे. त्यासाठी त्यांना देशात खूप फिरावे लागेल. राज्याराज्यांतून काँग्रेसची विचारधारा मानणारा, नि:स्वार्थी मनाने काम करणारा जनसमुदाय निर्माण करावा लागेल. काँग्रेसची परंपरा, काँग्रेसचा त्याग नवीन पिढीला सांगावा लागेल. गेल्या काही वर्षांत केवळ राहुल गांधी यांना कंटाळून काँग्रेस सोडून गेलेल्या मंडळींना आपलेसे करायचा मनापासून प्रयत्न करावा लागेल. हे करत असतानाच भाजपविरोधकांना एकत्र करावे लागेल. असे अनेक प्रश्न त्यांना सोडवावे लागतील. आम्ही मोठे भाऊ, तुम्ही छोटे भाऊ, याचा फार बाऊ करून चालणार नाही.

– डॉ. हिरालाल खैरनार, खारघर, नवी मुंबई

काँग्रेसने एक सक्षम अध्यक्ष नाकारला

तब्बल २२ वर्षांनंतर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक झाली. पण काँग्रेस कार्यकर्ते जुनाट मानसिकतेतून अद्याप बाहेर आल्याचे दिसत नाही. त्यांना गांधी परिवाराशिवाय इतर कोणाचेही नेतृत्व नकोच आहे, असे दिसते. यापूर्वीही एकदा ही निवडणूक झाली होती आणि शरद पवार निवडून येतील असे वाटले होते. मात्र तसे झाले नाही. गांधी घराण्याच्या हातातील खेळणे असलेले सीताराम केसरी अध्यक्ष झाले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही याचीच पुनरावृत्ती झाली. शशी थरूर वारंवार सांगत होते, बदल हवा असेल तर मला मते द्या, पण काँग्रेस कार्यकर्त्यांनी गांधी परिवाराचीच मर्जी सांभाळल्याचे दिसते. काँग्रेसची स्थिती बघता बदलांची खूप आवश्यकता आहे आणि शशी थरूर यांच्यात ते घडवून आणण्याची क्षमता आहे. ते अध्यक्ष झाले असते, तर काँग्रेस पक्ष काही प्रमाणात तरी मजबूत झाला असता आणि किमान सक्षम विरोधी पक्ष म्हणून तरी उभा राहू शकला असता. शशी थरूर यांच्या पराभवाने काँग्रेसने एक प्रतिभावान अध्यक्ष नाकारला आहे. शशी थरूर यांनी पवार यांच्यासारखा काही मार्ग निवडला नाही म्हणजे मिळवले. त्यांची काँग्रेसला गरज आहे.

– कृष्णा दाभाडे, जालना</p>

तर काँग्रेसच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ होईल

‘फुटलेल्या पेपरचा निकाल!’ हा अग्रलेख वाचला. खरगेंचा विजय निश्चित असणे मान्य केले, तरी थरूर यांची हजार मते बदललेल्या दिशेकडे संकेत करतात. त्यांनी दीड वर्षांत पुरेसे युवा कार्यकर्ते आपल्याकडे वळविले आणि विरोधाची कार्यक्रम पत्रिका सादर केली तर खरगेंना त्यांचे ऐकावे लागेल. २०२४च्या निवडणुकीत काँग्रेसची टक्केवारी १५-२० वरून ३०-३५ टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे. त्याचबरोबर प्रादेशिक पक्षांतील असंतुष्टांना हेरून त्यांना उमेदवारी दिली, तर पक्षाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ होईल. मोदींनी केलेले खरगेंचे अभिनंदन प्रगल्भ लोकशाहीचे लक्षण आहे. सत्ताधारी पक्षाविरोधात दोन किंवा तीन मजबूत पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणे संसदीय लोकशाहीसाठी चांगले लक्षण ठरेल.

– श्रीकृष्ण फडणीस, दादर (मुंबई)

या कार्यपद्धतीत गैर ते काय?

‘फुटलेल्या पेपरचा निकाल!’ हे संपादकीय (२१ ऑक्टोबर) वाचले. यात ‘२०१४ पासून भारतीय राजकारणाचा पोत भाजपने पूर्णपणे बदलून टाकला. प्रत्येक निवडणुकीचे सखोल, अभूतपूर्व नियोजन करायचे आणि निष्ठुर पद्धतीने ते अमलात आणत निवडणूक जिंकायची अशी ही कार्यशैली,’ असा उल्लेख आहे. माझ्या मते या कार्यशैलीत वावगे काहीच नाही. निवडणुकीचे सखोल आणि अभूतपूर्व नियोजन भाजपचा पूर्वअवतार जनसंघ असताना देखील केले जात असे. पुढे शिवसेनेने देखील याचा अवलंब केला. निवडणूक हे एक युद्ध असल्याने ‘निवडणुकीची रणनीती’ असा शब्दप्रयोग केला जातो. काँग्रेसमध्ये याचा अभाव आहे. काँग्रेसने केवळ गांधी-नेहरूंच्या पुण्याईवर भिस्त ठेवणे सोडून दिले पाहिजे.

– अ‍ॅड. सुरेश पटवर्धन, कल्याण</p>

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokmanas loksatta readers reaction loksatta readers opinion ysh 95
First published on: 22-10-2022 at 00:02 IST