आक्रमक, विस्तारवादी परराष्ट्र धोरण असलेल्या राष्ट्रांनी त्यांच्या आसुरी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी एकमेकांसोबत केलेली युती आणि त्याचे भारतावर होऊ शकणारे प्रतिकूल परिणाम याविषयी ‘त्रासादायी त्रिकोण’ या संपादकीयात (१३ डिसेंबर) व्यक्त केलेली काळजी अगदी योग्यच आहे.

पण समकालीन परिस्थिती अशी आहे की, देशातील बुद्धिजीवी वर्ग काळजी व्यक्त करण्यापलीकडे काहीही करू शकत नाही. त्यास कारण, कोणत्याही राष्ट्रांस आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर स्वत:चा प्रभाव निर्माण करण्यासाठी त्याची क्रयशक्ती महत्त्वाची ठरते आणि ती येते एक तर नैसर्गिक संसाधनांतून किंवा तंत्रज्ञानविषयक पुढारलेपणातून आणि या दोन्हींची वानवा असेल, तर मुत्सद्देगिरी म्हणजे केवळ बोलघेवडेपणा ठरतो. आणि नेमकी अशीच आपली परिस्थिती आहे.

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
raj thackray mns latest news
अग्रलेख: मनसबदारच..
documentry article lokrang marathi news, lokrang article marathi
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : वन्यजीवांवरील रोमांचक प्रकल्प
country has to be saved from leftist thinkers says All India Member of RSS Suresh Soni
“डाव्या विचारवंतांपासून देशाला वाचवावे लागेल, अन्यथा हे लोक…” संघाचे अखिल भारतीय सदस्य सुरेश सोनी यांचा इशारा

विकसनशील राष्ट्रांच्या प्रमुखांची अडचण अशी असते की, त्यांना त्यांच्या देशवासीयांना स्वत:चे कर्तृत्व फुगवून सांगून निवडणुकींच्या राजकारणावर प्रभाव टाकायचा असतो. परिणामी शिरजोर, बेमुर्वतखोर शेजारील राष्ट्राने केलेला खोडसाळपणा, आगळीक ते मान्यही करत नाहीत. कारण त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचण्याची शक्यता असते. त्यात भर म्हणजे असे नेतृत्व आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीसारखा विषय, ज्याची जाहीर वाच्यता करायची नसते नेमका त्याचाच डंका जाहीरपणे वाजवतात. परिणामी देशांतर्गत बुद्धिजीवींना ते आणखी एक अनुत्पादक कार्यक्रम देतात तो म्हणजे काळजी करण्याचा.

– राजकुमार देवराव राऊत, नांदेड</p>

काही लोक आयुर्वेदाचेच नुकसान करतात

डॉ. शंतनू अभ्यंकर यांचा आयुर्वेदाचा आभास आणि अ‍ॅलोपॅथीचे सत्य हा लेख (१३ डिसेंबर) वाचला. भारतात आयुर्वेद, योग आणि अध्यात्म अशा विषयांशी संबंधित अनेक प्रसिद्ध लोक प्रथम धर्माकडे जातात, नंतर कट्टरतेकडे जात यांच्याशी संबंधित राजकारणाचा भाग बनतात. यांच्यामुळे आयुर्वेदाची विश्वासार्हता नष्ट होते.

आयुर्वेदाला सर्व धर्माच्या लोकांपर्यंत पोहोचवायचे असेल तर त्याला काही धार्मिक प्रतीकांच्या पलीकडे जाऊन निरोगी जीवनशैलीचे शास्त्र म्हणून प्रस्थापित करावे लागेल. जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट लादली जाते तेव्हा प्रतिकार होतो. जगातील अनेक देश भारताच्या इतिहासातील अनेक गोष्टींवर विश्वास ठेवतात, त्यांचे महत्त्व मानतात, तेव्हा हा आदर राखण्याची जबाबदारी भारतातील जनतेचीसुद्धा बनते. जगाच्या विज्ञानात, जगाच्या संस्कृतीत आयुर्वेदापासून योगापर्यंत आणि शास्त्रीय संगीतापासून लोककलांमध्ये भारताचे योगदान जपले पाहिजे. त्याबद्दल बिनबुडाचे बोलून, खोटे दावे करून आम्हीच भारताला जगाच्या नजरेत खाली आणण्याचे काम करतो. असे करणाऱ्यांना जरी हे वाटत असले की ते भारताचा गौरवशाली इतिहास घडवत आहेत, पण वस्तुस्थिती अशी आहे की ते आपल्या मूर्खपणाने भारताच्या इतिहासातील खऱ्या वैभवशाली गोष्टींचा नाश करत आहेत आणि अविश्वसनीय बनवण्याचे काम करत आहेत.

– तुषार अशोक रहाटगावकर, मस्कत (ओमान)

रुग्णांचे समज हा मोठाच अडथळा

‘आयुर्वेदाचा आभास आणि अ‍ॅलोपॅथीचे सत्य’ हा लेख वाचला. मधुमेह अथवा उच्च रक्तदाबासाठी औषधे सुरू करावी लागतील असे सांगताच काही रुग्ण एकदम थोडय़ा आक्रमकपणे ‘नाही, नाही. ती एकदा चालू केली की बंद करता येत नाहीत,’ असा आक्षेप घेतात. जणू काही डॉक्टर त्यांना व्यसनाधीन करणारी ड्रग्ज देत आहेत.

काही अपवादात्मक परिस्थितीत, ताणामुळे झालेले अथवा काही औषधांच्या परिणामस्वरूप झालेले बदल पुन्हा पूर्ण नॉर्मल होऊ शकतात. पण मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी आजार, वाढते वय, आपली जनुके व काही प्रमाणात आपल्या जीवनशैलीशी संबंधित असतात. वय कमी करता येत नाही व जनुके बदलता येत नाहीत. रक्तातील वाढलेली साखर अथवा वाढलेला रक्तदाब हा कालांतराने हृदय व मेंदूच्या रक्तवाहिन्या, मूत्रिपडे, डोळे या सर्वावर दुष्परिणाम करतात व म्हणून आम्ही औषधे देऊन रक्तदाब व साखर प्रमाणात ठेवतो व त्यामुळे पुढील गुंतागुंतीचे प्रमाण कमी होते अथवा पुढे ढकलले जाते. कुठलेही औषध, एखादा विकार, वाहतूक पोलिसाने हात दाखवून वाहतूक थांबवल्यासारखा, १०० टक्के रुग्णांमध्ये परिणामकारक ठरेल असे नसते. एखाद्या रुग्णाला अ‍ॅलोपॅथीची औषधे घेऊनही हृदयविकार झाला अथवा मूत्रिपडांचा विकार जडला तर रुग्ण लगेच औषधांमुळे किडनीवर दुष्परिणाम झाला असा निष्कर्ष काढतात व त्यांच्या या समजुतीचा घातक प्रचारही करतात. एखाद्या वाईट घटनेचा भरपूर बोलबाला होतो, पण हजारो लोकांच्या सुरळीत चाललेल्या उपचाराची बातमी व्हायची शक्यताच नसते व त्यामुळेच अशास्त्रीय उपचार पद्धतीमुळे अपवादात्मक बरा झालेला एखादा रुग्ण शास्त्रीयरीत्या सिद्ध झालेल्या उपचार पद्धतींना बदनाम करतो.

– डॉ. विराग गोखले, भांडुप (मुंबई)

अ‍ॅलोपॅथी मोठय़ा फार्मा कंपन्यांच्या ताब्यात

‘आयुर्वेदाचा आभास आणि अ‍ॅलोपॅथीचे सत्य’ हा लेख वाचला. कोणतीही पॅथी परिपूर्ण नाही. परंतु अ‍ॅलोपॅथी स्वत:ला श्रेष्ठ समजते. अहंकारापासून दूर राहून समाज सुदृढ, सशक्त, निरोगी कसा होईल, राहील याचा विचार केला पाहिजे. आपापसांत भांडण्यात वेळ व ऊर्जा का वाया घालवली जाते? तिचा उपयोग दोन-तीन पॅथींचा एकत्रित उपयोग करण्यासाठी होऊ शकतो. अ‍ॅलोपॅथी ही मोठय़ा फार्मा कंपन्यांच्या हातात आहे. जगातील सर्वात मोठा व्यापार फार्मा कंपन्यांचा आहे. त्यांची उलाढाल कित्येक देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा अधिक आहे. एकीकडे फार्मा कंपन्या एवढय़ा मोठय़ा होत आहेत पण समाज निरोगी होताना दिसत नाही, असे का याचे कोणी उत्तर देऊ शकेल? अ‍ॅटोफॅजीसारख्या संशोधनाला २०१६ मध्ये नोबेल पुरस्कार मिळतो, पण त्याचा वापर अ‍ॅलोपॅथी का करताना दिसत नाही?

– राहुल आपटे, मुलुंड (मुंबई)

एकांगी व श्रेयवादाचा उत्तम नमुना

‘सर्वागीण विकासाचा महामार्ग’ हा लेख (१३ डिसेंबर) वाचला. प्रस्तुत लेखक सेनेतून फुटून निघालेल्या गटापैकी असून सांप्रतकाळी शिंदे सरकारमध्ये उद्योगमंत्रीपदावर असल्याने समृद्धी महामार्गाचे सारे श्रेय शिंदेना देण्याचा त्यांचा मनोदय समजण्यासारखा आहे. सदर प्रकल्पासाठी भूसंपादनचे काम विद्यमान मुख्यमंत्री शिंदे यांनी अठरा महिन्यांत केले हे सांगताना यापैकी वर्षभर शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या मविआ मंत्रिमंडळात होते व त्यांना याकामी तत्कालीन मुख्यमंत्री तसेच अर्थमंत्र्यांनी साथ दिल्याशिवाय हे काम करता आले नसते हे न कळण्याइतकी जनता मूर्ख नाही हे लेखकाने लक्षात घेतलेले नाही किंवा जाणीवपूर्वक टाळले आहे. एकीकडे पंतप्रधान म्हणतात या प्रकल्पास विरोधकांनी विरोध केला. अशी भाषा मोदी कुठल्याही प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी वापरतात ही आता नित्याचीच बाब झाली आहे. दुसरी खटकणारी बाब म्हणजे हा प्रकल्प विक्रमी वेळेत तडीस नेण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका असणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा अनुल्लेख. नितीन गडकरी यांचा पक्षातीत बाणा व स्पष्टवक्तेपणा कदाचित याआड आला असावा. उगाच दिल्लीश्वराची खप्पामर्जी का ओढवून घ्या असा सुज्ञ विचार यामागे असू शकतो. त्यामुळे हा लेख एकांगी व श्रेयवादाचा उत्तम नमुना म्हणावा लागेल.

– डॉ. किरण गायतोंडे, चेंबूर, (मुंबई)

मुंबई-गोव्यासाठी ‘इन्फ्रामॅन’ तत्पर का नाही?

महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचा ‘सर्वागीण विकासाचा महामार्ग’ हा समृद्धी महामार्गाविषयीचा लेख वाचला. लेखाचा शेवट करताना उद्योगमंत्री म्हणतात केवळ समृद्धी महामार्गच नव्हे, मेट्रो, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मिसिंग लिंक, रिंग रोड, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोस्टल रोड या आणि अशा विविध प्रकल्पांच्या माध्यमातून आधुनिक महाराष्ट्राचा हा ‘इन्फ्रामॅन’ राज्याचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी झटतो आहे. उद्योगमंत्र्यांनी दिलेली प्रकल्पांची जंत्री पाहिल्यास ते ज्या कोकण विभागाचे प्रतिनिधित्व करतात तेथील बहुप्रतिक्षित मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रकल्प या यादीत समाविष्ट नसल्याचे प्रकर्षांने जाणवले आणि नेमकी तीच बाब खटकली. कोकणवासीयांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा प्रकल्प कूर्मगतीने पुढे सरकत आहे. समृद्धी महामार्ग जितक्या जलदगतीने पूर्णत्वास नेण्यात आला, तेवढीच तत्परता मुंबई-गोवा महामार्गाबाबत निदान आतातरी दाखवावी. म्हणजे उद्योगमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेले ‘इन्फ्रामॅन’ हे विशेषण सर्वागाने सार्थ ठरेल.

– दीपक काशिराम गुंडये, वरळी (मुंबई)

वसुधैव कुटुंबकम् आधी..

‘सुरक्षेतही बेदखल’ हा अन्वयार्थ (१३ डिसेंबर) वाचला. सुरक्षा देणे ठीक पण त्यासाठी निर्भया पथकातील वाहने का? वाय प्लस सूरक्षेसाठी लागणाऱ्या वाहनांची मुंबई पोलिसांकडे कमतरता आहे काय? ही घटना दाखवते आपली पुरुषप्रधान संस्कृती, आपली वैचारिक पातळी. आपल्या ‘स्त्री सन्मान आणि आदराच्या’ पोकळ चर्चा. स्त्री ही फक्त ‘आपल्याला हवी तशी वागवण्यासाठी बनलेली गोष्ट’ ही मानसिकता. स्त्रियांना गृहीत धरण्याची आपली वृत्ती कधी बदलणार, असा प्रश्न पडतो. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे जी-२०चे घोषवाक्य निश्चित केलेल्या आपल्या देशात स्त्रियांविषयी एवढा निष्काळजीपणा केला जाणार असेल तर ‘वसुधैव’ आधी देशातच महिलांना ‘कुटुंबकम्’मधला महत्त्वाचा घटक मानणे आवश्यक आहे असे वाटते.

– जयेश भगवान घोडिवदे, शहापूर (ठाणे)