‘रामलल्ला ते रामलीला!’ हा अग्रलेख (३ नोव्हेंबर) वाचला. भ्रष्टाचार संपवण्यासाठी आपण सत्तेवर येत आहोत, असा आभास निर्माण करणार्‍या भाजपने सत्तेत आल्यावर मात्र ज्यांच्यावर आरोप केले होते अशा भ्रष्टाचार्‍यांनाच आपल्या पक्षात घेऊन शुद्ध केले. अण्णा आंदोलनाच्या काळात भाजप रस्त्यावर उतरला होता, तेव्हा त्याला लोकशाहीचे रक्षण म्हटले जात होते. मग आज काँग्रेस रस्त्यावर उतरते, तेव्हा भाजपला त्यात अराजक का दिसते?
निवडणूक आयोग ही घटनात्मक स्वायत्त संस्था आहे. आयोगाच्या कामकाजाबाबत काँग्रेसने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यासंबंधीची उदाहरणे समोर ठेवल्यानंतर काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत मोर्चे काढले, तर भाजपच्या पोटात दुखण्याचे कारण काय? परीकथेतील राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो, त्याप्रमाणे भाजपचा राजकीय जीव ज्ञानेश कुमार यांच्यात अडकला आहे की काय? भाजप सातत्याने सांगतो की, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे, पण शहा वारंवार घुसखोरीचा मुद्दा उपस्थित करतात, तेव्हा प्रश्न पडतो की, देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी कोणाची? त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस काँग्रेसला चीनकडून मदत मिळत असल्याचा आरोप करतात, तर त्यामागे ठोस पुरावे कोणते? असा हस्तक्षेप खरोखरच होत असेल, तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी असलेल्या यंत्रणांचे अपयश उघड होत नाही काय? हे सत्ताधार्‍यांच्या हलगर्जीचे जाहीर प्रदर्शन नाही काय?

थोडक्यात, २०१४ पूर्वी आंदोलन हा लोकशाहीचा आवाज होता; आज तो अराजकवाद ठरतो. मात्र जनतेला आता दुटप्पी भाजपच्या राजकीय खेळातील विसंगती दिसू लागली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील मोर्चाला झालेली गर्दी हा त्याच असंतोषाचा संकेत आहे. भाजपनेच एकेकाळी चलनात आणलेले घोषवाक्य ‘सचमुच देश बदल रहा है!’ हे आज त्यांच्यावरच उलटताना दिसते. हा बदल भाजपला अपेक्षित असलेल्या दिशेने नाही. आता लोक प्रश्न विचारू लागले आहेत. लोकशाहीच्या मूल्यांसाठी रस्त्यावर उतरू लागले आहेत.

– जगदीश काबरे, सांगली

सत्तेवर मोदी आहेत की राहुल गांधी?

‘रामलल्ला ते रामलीला!’ हा अग्रलेख (३ नोव्हेंबर) वाचला. देशात मतचोरीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. निवडणूक आयोगावरील विरोधकांच्या आरोपांनी सत्ताधार्‍यांचाच तिळपापड होत आहे तो का, हे न उमगण्याएवढी देशातील जनता दूधखुळी नाही!

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा यासाठी देशातील जेन-झी रस्त्यावर आले. सर्व विरोधी पक्ष दिल्लीत रामलीलावर एकवटले. तेव्हा जगातील सर्वांत मोठ्या पक्षाने प्रतिआंदोलन सुरू केले. देशातील लोकशाही धोक्यात असल्याचा, देशात अराजक निर्माण करण्यात येत असल्याचा आणि चीनसारख्या देशाकडून विरोधकांस आर्थिक रसद मिळत असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला. या बाबी जर खर्‍या असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १२ वर्षांची सत्ता सपशेल नापास झाल्याचा हा कबुलीजबाबच म्हणावा लागेल. भारतीय जनता पक्षाच्या आंदोलनामुळे सत्तेवर नरेंद्र मोदी आहेत की राहुल गांधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

– प्राचार्य ॲड. राजकुमार कदम, बीड

सत्ताधार्‍यांचा मोर्चा ही जनतेची चेष्टाच!

सत्ता हातात असताना सत्ताधार्‍यांनीच रस्त्यावर उतरून अराजकतेचा बभ्रा करणे हा केवळ ढोंगीपणा आहे. शासन, प्रशासन आणि गुप्तचर यंत्रणा हाताशी असताना विरोधी पक्षाच्या आंदोलनांवर किंवा बाह्य शक्तींच्या हस्तक्षेपावर खापर फोडणार्‍यांना जर पाळेमुळे खणून काढता येत नसतील, तर मग पूर्वी ज्या सरकारवर धोरणलकव्याचा आरोप केला त्यात आणि सध्याच्या सरकारमध्ये फरक काय राहिला? स्वत:च्या कर्तबगारीचा बोजवारा उडालेला असताना ‘लोकशाही धोक्यात आहे’ अशी आवई उठवणार्‍या या कमकुवत राज्यकर्त्यांचा हा थिल्लर खेळ म्हणजे जनतेची चेष्टाच आहे!
सत्ताधारी जर स्वत: रस्त्यावर येऊन आंदोलन करत असतील आणि जनतेला मूर्ख बनवून आपण जनमताचा कौल आपल्या बाजूने वळवू शकतो असा त्यांचा समज असेल, तर त्यांनी तो सोडून दिला पाहिजे. आजचा सामान्य नागरिक अत्यंत सुजाण आणि समंजस झाला असून तो देशातील परिस्थिती चांगल्या प्रकारे ओळखतो. सत्ताधार्‍यांचा कांगावा जनतेपासून लपून राहिलेला नाही. इतके साधे राजकारण न समजण्याइतका मतदार भोळा नाही.

– सी. ए. देवेंद्र जैन, अंबरनाथ

हे काय महाराष्ट्राचे भविष्य घडवणार?

‘राष्ट्रवादीतील नेतृत्वनाराजी अमित शहा यांच्या दरबारात’ ही बातमी वाचली. शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महाराष्ट्राच्या अस्मितेला दिल्लीकरांच्या दरबारात नतमस्तक केल्याचे पाहून वाईट वाटले. राष्ट्रवादीच्या नेतृत्वात जो पक्षांतर्गत संघर्ष उफाळला आहे, त्याचे परिमार्जन महाराष्ट्रातच आणि तेही राष्ट्रवादी पक्षातच होणे गरजेचे होते, पण सत्तातुर पुढारी आणि संस्थापक अजित पवारांचे वारसदार यांच्यातील बेबनावामुळे हा वाद अमित शहांच्या दरबारात गेला. या नेत्यांना कोणतीही अस्मिता नाही, स्वाभिमान नाही, विचार नाही. माझ्या घरात सत्ता हवी यासाठी कोणत्याही तडजोडीस तयार असलेले हे सर्व राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्राचे भवितव्य काय घडवणार आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी काय लढणार?

– प्रा. बी. पी. सावखेडकर, जळगाव</strong>

‘टोरंट’विरोधात अदृश्य शक्तींकडून पैसा?

गेल्या कित्येक वर्षांपासून कर्जत, खालापूर तालुक्यात हजारो रिसॉर्ट्स आणि शेकड्यांनी गृहप्रकल्प सुरू आहेत. हे प्रकल्प डोंगराच्या कुशीत असल्याचे आवर्जून जाहिरातीत सांगितले जाते. पण यात स्थानिकांना मलिदा मिळत असल्याने इथे होणार्‍या वृक्षतोडीबद्दल निषेधाचा सूर कधीही उमटला नाही. टोरंट प्रकल्पासाठीच्या वृक्षतोडीला आता कडाडून विरोध करणारी सर्व मंडळी तेव्हा कुठे होती? की आता सरकारने प्रकल्प आणल्यामुळे त्याला विरोध करण्यासाठी या सर्वांना अदृश्य शक्तींकडून पैसा मिळतो आहे. या विद्युत प्रकल्पाचा फायदा राज्यातील जनतेबरोबरच रिसॉर्ट आणि गृहप्रकल्पांनाही होणार आहेच.

– रमण गांगल

प्रत्येक गोष्टीत धर्म कशासाठी?

‘दियामुळे वादाचे फटाके’ ही बातमी (लोकसत्ता- ३ नोव्हेंबर) वाचली. दिवाळीच्या सणाला हिंदू-मुस्लीम वादाचा रंग देण्याचा प्रयत्न, तोही आमदार आणि मंत्र्यांकडून होणे स्वीकारार्ह नाही. मंत्रीपदाची शपथ त्यांनी घटनेनुसार घेतली आहे याचे भान त्यांनी राखणे आवश्यक आहे. हे नवहिंदुत्ववादी मंत्रिमहोदय नेहमीच मुस्लीमद्वेषाची भाषा करतात. प्रदूषणमुक्त दिवाळी ही काळाची गरज आहे. त्यामुळेच जनजागृतीसाठी सेलिब्रिटींची मदत घेण्यात आली होती. मुंबई महापालिकेच्या विनंतीनुसारच दिया मिर्झाने हा व्हिडीओ तयार केला होता आणि पालिकेनेच तो समाजमाध्यमांवरून प्रसारित केला होता. ऐन दिवाळीत अशा कारणावरून वादंग निर्माण केले जाणे पूर्णपणे निषेधार्ह आहे. राजकीय नेते प्रत्येक गोष्टीत जात-धर्म-पंथ शोधून वाद निर्माण करणे बंद करून पक्षीय राजकारणापलीकडे कधी पाहणार?

– अनंत बोरसे, शहापूर (ठाणे)

ही तत्परता एरवी कुठे जाते?

‘दियामुळे वादाचे फटाके’ ही बातमी (लोकसत्ता- ३ नोव्हेंबर) वाचली. ‘दिवाळी कशी साजरी करावी हे दियाने आम्हाला शिकवू नये,’ असे वक्तव्य करणारे हाच युक्तिवाद न्यायालयात करू शकले असते का? तसे करण्यास ते धजावले नसते. निदान उघडपणे तसे म्हणण्याइतपत परिस्थिती आज तरी नाही. दियाला काळ्या यादीत टाकू पाहणार्‍या पालिकेची कार्यतत्परता उघड्या मॅनहोलमध्ये पडून, अंगावर झाडे कोसळून निष्पाप नागरिकांचे बळी गेले तेव्हा कुठे होती? अशा दुर्घटनांवेळी कंत्राटदार एवढ्याच तत्परतेने काळ्या यादीत टाकले जातात का? त्यात किती तत्परता दाखवली जाते, हे जनता जाणून आहे. आपली मुख्य कामे सोडून दिवाळीबद्दल कोणी बोलावे व कोणी नाही असा धर्मआधारित भेदाभेद पालिकेने करणे घृणास्पद आहे. ही भूमिका देशाला धार्मिक द्वेषाच्या दरीत लोटणारी आहे. न्यायालयाने वेळीच पायबंद घातला, एवढाच दिलासा.

– अचला नेने, पुणे