‘बेभरवशी बाणा!’ हा अग्रलेख वाचला. ‘प्राण जाए पर वचन न जाए’ अशी धारणा असलेल्या भारताच्या या पावन भूमीत एके काळी दशरथ महाराजांनी त्यांच्या वचनपूर्तीसाठी स्वत:च्या पुत्रास म्हणजे प्रभू रामचंद्रास वनवासी धाडले. त्याच प्रभू रामचंद्रांचा वारसा सांगणारे सरकार आज सार्वभौम हमी/ न्यायालयाचा निवाडा नाकारते आहे. अशाने ‘तुमच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही,’ असे खडे बोल सर्वोच्च न्यायालय सरकारला सुनावते आहे. या कानपिचक्यांना नाही म्हटले तरी आता उशीरच झाला आहे.
आज विदेशी गुंतवणूकदार खोर्याने त्यांची भारतातील गुंतवणूक काढून बाहेर नेताना दिसतात, ते या अविश्वासामुळेच. त्यामुळेच रुपयाची शंभरी जवळ येऊन ठेपली आहे. विदेशी तर विदेशी, देशी खासगी गुंतवणूकदारदेखील त्यांच्या तिजोर्यांना कुलूप लावून शांत बसलेले आढळतात व प्रसंगी परदेशाचा रस्ता धरतात ते का? या सरकारच्या दहशतीच्या वातावरणात प्रश्न विचारणेही आता थांबले आहे असे प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांनी एकदा म्हटल्याचे आठवले. त्याची काही दखल या सरकारने घेतल्याचे दिसत नाही. साखरेचे इथेनॉल करून साखरेचा तुटवडा झाला तरी बेहत्तर पण तेलविहिरी खोदणार्या विदेशी तंत्रज्ञान कंपन्यांना मात्र वैध व करारावर आधारित नफा सरकार सहजासहजी मिळू देणार नाही हे लक्षात येते. करारांची पायमल्ली केल्यास कोणता गुंतवणूकदार येथे येण्यास धजावेल? अशाने देशांतर्गत तेलाचे साठे मिळणे दुर्लभ. त्यामुळे कच्च्या तेलाचे आयात बिल वाढतच राहील. अशा कठीण प्रसंगी सत्ताबदल झाला तरी देशाचे नुकसान भरून काढण्यासाठी कदाचित प्रदीर्घ काळ खर्ची पडेल. सरकार यातून बोध घेईल याची शक्यता कमी असली तरी न्यायालयाने कान टोचले ते उत्तमच.
– कालिदास भाटे, कोल्हापूर</strong>
देशाची प्रतिमा जपण्याची गरज
‘बेभरवशी बाणा’ हा अग्रलेख वाचला. प्रत्येक गुंतवणूकदार हा आपल्या गुंतवणुकीवरील लाभाबाबत दक्ष असतो. यापूर्वी एन्रॉनच्या निर्णयामुळे भारताची पत ढासळली होती. आता अनेक नवनवे देश गुंतवणुकीसाठी सज्ज झाले असताना, भारताची प्रतिमा जपण्याची गरज आहे.
– राजलक्ष्मी प्रसाद, मुलुंड (मुंबई)
स्वत:चीच पाठ थोपटणे बंद करा!
‘देशातील गरिबीवर मात’ ही बातमी (४ नोव्हेंबर) वाचली. पंतप्रधानांच्या म्हणण्यानुसार २०१४ पासून ५० कोटींपेक्षा अधिक लोकांनी दारिद्र्यावर मात केली. पंतप्रधानांनी हा निष्कर्ष काढताना कोणत्या आकडेवारीचा आधार घेतला हे स्पष्ट केले असते तर बरे झाले असते. कारण सरकारच्या आकडेवारीनुसार ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत’ सरकारने सुमारे ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य वाटप केले आहे. याचा अर्थ आपल्या एकूण लोकसंख्येच्या अंदाजे ५५ टक्के जनता त्यांच्याकडील केशरी अथवा पिवळे रेशनकार्ड घेऊन सरकारकडून मिळणार्या अन्नधान्यासाठी रांगेत उभी राहते. जर ८० कोटी नागरिक अजूनही अन्नधान्यासाठी सरकारवर अवलंबून असतील तर मागील १० वर्षांत कोणत्या ५० कोटी लोकांनी गरिबीवर मात केली? देशात महागाई रोज नवी उंची गाठत आहे व त्यातच बेरोजगारी वाढत आहे. परिस्थिती एवढी बिकट आहे की लिपिक पदासाठी पीएचडी धारक नोंदणी करत आहेत! एकूण रिक्त पदांच्या अनेक पटीने अर्ज जवळपास सर्वच जागी भरले जाताना दिसतात. मग कोणत्या ५० कोटी लोकांनी गरिबीवर मात केली आहे? ‘भारताने विकासाचा वेग कायम राखला’ असे पंतप्रधान म्हणतात. उत्पन्न आणि संपत्तीच्या वाटपात तफावत असल्यामुळे देशातील आर्थिक विषमता सतत वाढत आहे. त्यामुळेच देशाचा विकास दर सर्वसामान्यांच्या विकासाबद्दलचे खरे चित्र दाखवेलच असे ग्राह्य धरले जाऊ शकत नाही. सामान्य जनतेचे हाल होत असताना सरकारने भलताच संभ्रम पसरवून स्वत:चीच पाठ थोपटणे बंद करावे!
– जयेश घोडविंदे, शहापूर (ठाणे)
दावणीला बांधून घ्यायचे का?
‘भाजपच्या शैलीत मित्रपक्षांचा सन्मान’ हा ‘अन्वयार्थ’ (४ नोव्हेंबर) वाचला. राष्ट्रवादी काँग्रेस आपली धुणी भाजपच्या घाटावर धूत आहे. पक्षातील अंतर्गत कलहात भाजपने नाक खुपसण्याचे कारण काय? हाच प्रकार शिंदे सेनेतही दिसतो. अमित शहांचा हस्तक्षेप वाढू लागला आहे. प्रादेशिक पक्षांनी आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवायचे की भाजपच्या दावणीला बांधून घ्यायचे, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. पक्षांचे नेतृत्व कोणाकडेही असो, निर्णयाची सूत्रे मात्र भाजपच्या हाती एकवटली आहेत.
– दिलीप कदम, कांदिवली (मुंबई)
संदेश काय दिला हे महत्त्वाचे
धर्मनिरपेक्षता हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. तसेच भारतात सर्वधर्म समभावाची परंपरा आहे. हे मुद्दे विचारात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने दिया मिर्झाच्या व्हिडीओ संदेशाला धार्मिक रंग देण्याच्या संकुचित वृत्तीची, भाजपचे आमदार अमित साटम आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची चांगलीच कानउघाडणी केली. महानगरपालिकेद्वारे प्रसारित होऊन डिलीट केल्या गेलेल्या दिया मिर्झाच्या व्हिडीओचे पुन्हा प्रसारण करण्याचे आदेश दिले. यात कोणत्या धर्माच्या व्यक्तीने हे व्हिडीओ प्रसारित केले त्यापेक्षा या व्हिडीओद्वारे लोकांपर्यंत काय संदेश पोहोचवला गेला, याला महत्त्व दिले जाणे अपेक्षित होते. भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि मुंबईच्या महापौरांच्या हे लक्षात न येणे निषेधार्हच.
– अजित शेटये, डोंबिवली
सत्तापिपासूपणाची परिसीमाच!
‘‘गोकुळ’ कब्जासाठी आटापिटा’ ही बातमी वाचली. अलीकडेच झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वात महायुतीस पराभव स्वीकारावा लागला. आता सहकारी संस्थांवर, मतादानाचा हक्क असलेले चार तज्ज्ञ संचालक नेमण्याची तरतूद असलेली कायदा सुधारणा सरकार करणार असल्याचे समजते. या खेळीतून मागील दाराने, आडमार्गाने, अनैतिकरीत्या या दूध उत्पादक संघावर सरकार वर्चस्व प्रस्थापित करू इच्छिते असे दिसते. सरकारने हा रडीचा डाव खेळल्यास ती सत्तापिपासूपणाची परिसीमा ठरेल. या व अशा अनेक सरकारी लीला पाहता निवडणूक आयोगाच्या कारभारात सरकारचा हास्तक्षेप असण्याच्या शक्यतेस अधिकच बळकटी मिळते.
– राम रेठे, परतवाडा (अमरावती)
काम करणारे हात कमी
‘जेन-झी निदर्शनाचे लोण जर्मनीमध्येही का पसरले?’, हा निमा पाटील यांचा लेख वाचला. खरे तर हे प्रकरण आधी फ्रान्समध्ये सुरू झाले. त्या आंदोलनाने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केले आणि मग हे लोण हळूहळू इतर देशांमध्ये पसरले. जर्मनी हा खरे तर युरोपचा पोषणकर्ता. या देशाची अर्थव्यवस्था ही युरोपमधली सर्वांत सशक्त मानली जाते. दोन्ही महायुद्धांचा भार सोसूनही जर्मनांनी अर्थव्यवस्था उत्तम राखली; परंतु गेल्या २०-२५ वर्षांत तिथे मुले जन्माला न घालण्याचे किंवा कमी मुलांना जन्म देण्याचे लोण पसरले. त्यामुळे आता काम करणारे हात कमी झाले आहेत. आधीची पिढी वृद्धत्वाकडे झुकू लागली आहे. साहजिकच सारा भार नव्या पिढीवर पडला आहे. पूर्वीची गुणवत्ता साधण्यासाठी त्यांना स्थलांतरितांची मदत घ्यावी लागते. स्थलांतरितांचे प्रश्न उभे राहिले आहेत. जर्मनांना नको असलेली कामे करण्यासाठी स्थलांतरितांचा वापर करून घेतल्यामुळे आता हळूहळू स्थलांतरितच जर्मनीला पोखरू लागले आहेत.
स्थलांतरितांना विरोध करणारा एक छोटा देश युरोपमध्ये आहे तो म्हणजे पोलंड. पूर्वी युरोपातील अनेक देशांनी पोलंडचा धिक्कार केला, मात्र आज तोच छोटासा देश शांतपणे इतरांची राखरांगोळी पाहत आहे. स्थलांतर हा निसर्गनियमच आहे; परंतु त्याची गुणवत्ता काय, आपल्या देशाच्या प्रगतीसाठी उपयोग होणार आहे का, याचाही विचार प्रवेश देण्याआधी केला पाहिजे. जर्मनीमध्ये शैक्षणिक शुल्क नगण्य असते. त्यात वाढ केली तरीदेखील त्या देशाला बर्यापैकी महसूल मिळू शकतो. जर्मन नागरिकांना आणि बाहेरच्या देशातील नागरिकांना भिन्न शुल्क आकारावे. नोकर्यांमध्ये प्राधान्य गुणवत्तेच्या आधारेच द्यावे. युरोपात राहणीमानावरील खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. विजेच्या दरांत २०२२ पासून आजवर सुमारे तिप्पट वाढ झाली आहे. याचे कारण आहे युरोपमध्ये सुरू असलेले युद्ध आणि अलीकडच्या सर्व युद्धांचे कारण आहे तेल. जर्मनीसारखा पोषणकर्ता डळमळला तर जगाची मोठी हानी होणार आहे.
– मीरा भारती, ठाणे</strong>
