‘पिपांत मेले ओल्या उंदिर…’ हा अग्रलेख (१३ मार्च) वाचला. रिलायन्स समूहाच्या संभाव्य गुंतवणुकीची माहिती थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जाहीर करतात; परंतु त्याबाबत रिलायन्स कंपनी वा सरकारकडून कोणतेही भाष्य केले जात नाही, हे अत्यंत क्लेशकारक आहे. भारत सरकार अमेरिकेबाबत इतके मवाळ धोरण का स्वीकारते, हे अनाकलनीय आहे. भारतासारख्या स्वाभिमानी देशाने कोणत्याही दबावाला न घाबरता अमेरिका- इस्रायल विरुद्ध इराण संघर्षासंदर्भातील घडामोडींवरही ठाम व स्पष्ट भूमिका मांडणे गरजेचे आहे. अन्यथा अशा परिस्थितीत भारतावर विविध मार्गांनी दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

– भालचंद्र देबडवार, छत्रपती संभाजीनगर

वक्तव्ये गोंधळात टाकणारी

‘पिपांत मेले ओल्या उंदिर…’ हे संपादकीय वाचले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या असंबद्ध व विरोधाभासी विधानांमुळे अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांमध्ये संभ्रम निर्माण होतो, तर शत्रुराष्ट्रांमध्ये तिरस्कार वाढतो. त्यांच्या विधानांमुळे जागतिक राजकारणात ध्रुवीकरण होत आहे. परिणामांचे ट्रम्प यांना देणेघेणे नाही. त्यांच्या वक्तव्यांचा परिणाम संबंधित देशांच्या अंतर्गत राजकारणावरही होतो. विरोधी पक्षांना सरकारवर टीका करण्याची संधी मिळते आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण होते. भारतासह अनेक राष्ट्रांना गेल्या वर्षभरात याचा अनुभव आला आहे. इतिहासात दुसर्‍या महायुद्धाच्या काळातही असे नेते झाले होते, ज्यांच्या अनपेक्षित विधानांनी जगाला सतत गोंधळात टाकले. आज ट्रम्प यांच्या बोलण्यामुळे निर्माण होणारा गोंधळ हा त्याच परंपरेचा भाग वाटतो. म्हणूनच त्यांच्या वक्तव्यांची तथ्याधारित पडताळणी योग्य ठरेल.

– रवींद्र भागवत, खडकपाडा (कल्याण)

‘कालजयी’ कविता

‘पिपांत मेले ओल्या उंदिर’ ही कविवर्य मर्ढेकर यांच्या कवितेतली पंक्ती आणि सुरुवातीलाच आचार्य अत्रे यांच्या उद्गारांचा उल्लेख वाचून अभिजात मराठीचा अभिमान तर वाटलाच पण अत्रे यांची ‘या मेलेल्या उंदरावर बसूनच नवकाव्याचा प्लेग महाराष्ट्रात आला’ ही विस्मृतीत गेलेली टीकादेखील आठवली. ट्रम्प, अंबानी यांच्या एकविसाव्या शतकातील उद्योगांमुळे हिंदी शब्द वापरायचा तर मर्ढेकर यांची कविता ‘कालजयी’ म्हणण्यास हरकत नसावी.

– गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर (मुंबई)

लुबाडणूक आणि फसवणूक!

‘शुल्कनियमनाचे गौडबंगाल’ हा शंतनु काळे यांचा लेख (लोकसत्ता- १३ मार्च) वाचला. व्यावसायिक शिक्षण ही काळाची गरज आहे हे आता सर्वसामान्य पालक आणि पाल्य जाणून आहेत याचा फायदा कमी आणि तोटेच अधिक आहेत. शिक्षणाचा व्यवसाय करणार्‍या महाविद्यालयांनी याचा पुरेपूर गैरफायदा घेतला आहे. एकीकडे वर्षाला लाखो रुपयांची फी तीदेखील कमीतकमी अडीच लाख ते एक कोटी रुपये (वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी) आहे. सर्वसामान्यांना आता डॉक्टर किंवा इंजिनीअर होणे शक्यच नाही, याला खासगी शिक्षण संस्था जबाबदार आहेत. त्यांचे शुल्क नियमन कोण करणार? कारण शुल्कनियमन करणारेही सत्तेचे वाटेकरी आणि विरोध करण्यासाठी पुढे येणारेही त्यातीलच एक भाग. त्यामुळे वेतनातून शिक्षकांची लुबाडणूक आणि पालकांची फसवणूक होत आहे.

– सुनील समडोळीकर, कोल्हापूर</strong>

भूतकाळाच्या पुढे कधी जाणार?

‘भूतकाळवरून किती दिवस भांडत बसणार?’ आदित्य ठाकरे यांचा लेख (१३ मार्च) आजही आपण इतिहासाबद्दल बोलतो; पण वर्तमानाचं काय? भविष्याचं काय? भूतकाळातील चांगलं किंवा वाईट पुन्हा पुन्हा उकरून काढण्यातून आज काय साध्य होणार? रानडे, गोखले, टिळक, गांधी, नेहरू, पटेल, सावरकर ही इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वे आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आपल्याला हा महान भारत लाभला. पण आता प्रश्न असा आहे की आपण पुढच्या पिढीला काय देणार आहोत? कधीतरी आपण सर्वजण मतभेद बाजूला ठेवून या देशासाठी एकत्र येऊ का? या महान देशाचं महान स्वप्न आपण एकत्र पाहू का? की ‘‘हा बरोबर, तो चूक’’ या वादातच अडकून राहू? हेच सुरू राहिले, तर भविष्यातील भारत आपल्याला कदाचित माफ करणार नाही.

– अमोल हारदे