‘‘जय’ नावाचा इतिहास…’ यासारखे अग्रलेख (२७ मार्च) संदर्भ म्हणून पुढच्या पिढीला उपयोगी ठरू शकतात. आचार्य अत्रेंचा पंडित जवाहरलाल नेहरूंना श्रद्धांजली वाहणारा लेख आजही स्मरणात आहे. तसाच प्रदीर्घ प्रभाव पडणारा ‘लोकसत्ता’चा हा अग्रलेख मला वाटला. ‘मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज’ हे पुस्तक मी प्रकाशित केले तेव्हा त्या कार्यक्रमाची पत्रिका प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांना स्वत: भेटून देण्याचे विसरलो होतो, पण त्यांचे मोठेपण असे की छत्रपती शिवाजी महाराजांवर पुस्तकाचे प्रकाशन राजर्षी शाहू स्मारक भवनात होते आहे, हे समजल्यावर ते आवर्जून उपस्थित राहिले. अशा मनानेही मोठ्या असणार्या व्यक्तीच्या लिखाणाचे आणि कार्याचे तपशीलवार मूल्यमापन केल्याबद्दल संपादकांचे मन:पूर्वक अभिनंदन. आम्ही कोल्हापूरचे असून प्राध्यापक जयसिंगरावांना वडीलधारे म्हणून भेटत असूनही आम्हाला जे बारकावे दिसले नाहीत ते आपण अचूक हेरले आहेत. – डॉ. सुभाष के. देसाई, कोल्हापूर
लेखनाची संथ गती ही समस्या
‘यूपीएससीच्या निकालात मराठी मागे का?’ हे विश्लेषण वाचले. लेखात तज्ज्ञांनी नोंदवलेले निरीक्षण अत्यंत कळीचे आहे- कमी वेळेत सगळी उत्तरे लिहिण्यासाठी शर्थ करावी लागते. माजी उमेदवार वर्धमान बोथरा यांनी नेमके दुखणे पकडले आहे की, इंग्रजीत पेन न उचलता वेगाने लिहिता येते, तर मराठीत लेखनाचा वेग मर्यादा ठरतो.
मराठी विद्यार्थ्यांकडे ज्ञान, अभ्यास, मेहनत असूनही ते वेळेच्या नियोजनात मागे पडतात. याचे मुख्य कारण देवनागरी लिपीतील लेखनाची गुंतागुंत आहे. रोमन लिपीच्या तुलनेत देवनागरीत ‘स्ट्रोक काउंट’ जास्त आहे. अक्षरांतील उभ्या-आडव्या, तिरक्या रेषा व त्यांच्या वर, खाली, पुढे, मागे अशा अगणित हालचालींमुळे लेखनाचा वेग इंग्रजीच्या तुलनेत कमी होतो. विद्याथ्र्याचे पूर्ण लक्ष संकल्पनांवर असले पाहिजे. लेखन प्रक्रिया कठीण आणि संथ असेल, तर विद्याथ्र्याचा ‘संज्ञानात्मक भार’ वाढतो. काय लिहायचे याऐवजी कसे लिहायचे यात लक्ष गुंतते आणि विद्यार्थी उत्तर पूर्ण करू शकत नाहीत. जागतिक संशोधकांनी (उदा. व्हर्जिनिया बर्निंगर, बेंजामिन ब्लूम इत्यादींनी) वेगवान लेखन हे दर्जेदार शिक्षणासाठी अत्यावश्यक असल्याचे सिद्ध केले आहे. स्पर्धा परीक्षा केंद्रे, शासन आणि पालकांनी या तांत्रिक बाबीकडे गांभीर्याने लक्ष दिले, तरच मराठीचा डंका पुन्हा एकदा दिल्लीत वाजताना दिसेल. – तुकाराम जगताप, अहिल्यानगर
‘माय-बाप’च उदासीन
‘अधिवेशनाचे गांभीर्य ना मंत्र्यांना, ना विरोधकांना!’ हा संतोष प्रधान यांचा लेख (२७ मार्च) वाचला. महायुती सरकारचे रोज नवनवे प्रताप समोर येत आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीला थारा दिला जात नव्हता कारण राज्यकर्ते वेळीच त्याविरुद्ध पाऊल उचलत आणि त्यांनी उचलले नाही, तर विरोधक त्यांना जाब विचारत. पण आजची परिस्थिती पाहता विरोधकही कुठे कमी नाहीत, असेच म्हणावे लागते. संख्या कमी असली तरी विरोधकांनी ज्या जनतेने आपल्यावर विश्वास टाकला किमान तिच्यासाठी तरी विधानसभा, विधान परिषदेत तिची बाजू मांडली पाहिजे आणि मंत्र्यांनीही उत्तरे दिले पाहिजेत. जनतेने मायबाप मानलेल्या सरकारने आणि विरोधकांनी वेळीच अधिवेशन गांभीर्याने घेणे अपेक्षित आहे. – दत्तात्रय नेद्रे, छत्रपती संभाजीनगर
दिशाभूल तर करत नाही ना?
आखाती देशांत जवळपास एक महिनाभर सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगावर विपरीत परिणाम होत आहेत. खनिज तेल, पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस या सर्वांचा पुरवठा खंडित होऊ लागला आहे. घरगुती गॅस सिलेंडर आणि हॉटेल व्यावसायिक यांना पुरेसा पुरवठा होत नसल्यामुळे गॅस, पेट्रोलसाठी सर्वत्र लांबलचक रांगा लागल्या आहेत. अनेक हॉटेले बंद झाली असून, काही ठरावीक हॉटेलांत मोजके पदार्थ उपलब्ध आहेत. एकीकडे केंद्र सरकार सांगते पुरेसा तेलसाठा उपलब्ध आहे, आठ लाख टन एलपीजी उपलब्ध आहे. मग नागरिकांना कित्येक तास रांगेत का उभे राहावे लागते? परिस्थिती आणि वस्तुस्थितीचे भान नक्कीच नागरिकांना आहे. पण ज्या पद्धतीने नागरिकांना आश्वस्त केले जात आहे, ते पाहता केंद्र सरकार नागरिकांची दिशाभूल तर करत नाही ना, असाच प्रश्न पडतो. – पुरुषोत्तम आठलेकर, डोंबिवली
