‘…सदन शिवाचे कोसळले!’ हे संपादकीय वाचले. भारतातही असाच विकासाचा ‘अश्वमेध यज्ञ’ सुरू आहे. निसर्ग सोशीक आहे, पण अति झाल्यानंतर माती होते, हे नेपाळमधील विनाशकारी पुराने दाखवून दिले आहे. पर्यटनवाढीसाठी हिमालयात चाललेला ‘राक्षसी विकास’ स्पिती व्हॅलीच्या टुरमध्ये गेल्या वर्षी मी प्रत्यक्ष अनुभवला आहे. पृथ्वीचे गर्भाशय खरवडून होणारा विकास हा विनाशाकडेच घेऊन जातो, हे आपण तीन वर्षांपूर्वी जोशीमठ येथील घटनेने पुरेपूर अनुभवले आहे. विकासाच्या नावाखाली सर्वांना विनाशाच्या खाईत लोटण्याचे पाप सरकारसहित सर्व जण करत आहेत. त्यामुळे उत्तराखंड असो, हिमाचल प्रदेश असो, वा केरळ आत्मघातकी पर्यावरण विकासाचे प्रमाण भारतात सह्याद्रीपासून हिमालयापर्यंत वेगाने वाढताना दिसून येत आहे. भूतकाळातील घटनांकडे आपण डोळसपणे पाहणार नसू तर भविष्यात होणार्या विध्वंसापासून आपणांस कोणीही वाचवणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे!
– धनराज खरटमल, मुलुंड, मुंबई</strong>
पण बेस्टसाठी पैसे नाहीत?
‘मेट्रो मार्गिकेचे २६० कोटींचे बांधकाम पाडण्याची नामुष्की’ आणि ‘बेस्टच्या २२ आगारांच्या पुनर्विकासाला नागरी संघटनेचा विरोध’ अशा दोन्ही बातम्या (२७ ऑगस्ट) वाचल्या. एकीकडे सल्लागार कंपनीच्या एका ड्रॉइंगमधील चुकीपायी २६० कोटी रुपये पाण्यात जाऊ देण्याची क्षमता असणारे हे राज्य सरकार, बेस्टला पालिकेकडून पॅकेज देऊ शकत नाही यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. आणि तोटा काय निव्वळ बेस्टलाच होतो? आज किती तरी वंदे भारत ट्रेन्स तोट्यात धावत आहेत. पण ते नुकसान रेल्वेला सोसायला लावले जाते. मेट्रो मार्ग तोट्यात आहेत. देशातील कित्येक मध्यम शहरांत उभे केलेले विमानतळ ओस आहेत. पण तरीही असे विमानतळ, मेट्रो सुरू ठेवायला केंद्राकडून मदत दिली जाते. कारण या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहेत आणि याचे फायदे निव्वळ पैशात मोजता येत नाहीत. पण मग बेस्टला मात्र जमिनी भाड्याने देऊन पैसे उभे करायला का सांगता? यामागे बेस्ट उखडून टाकणे हाच उद्देश आहे का?
– डॉ. स्वाती लावंड, मुंबई
हा खर्च नव्हे, तर गुंतवणूक
‘मुले शाळेत जातात, पण खरोखरच शिकतात का?’ हा डॉ. विवेक कोरडे यांचा लेख (२८ ऑगस्ट) वाचला. शाळांची संख्या, प्रवेशाचे प्रमाण, इमारती किंवा डिजिटल सुविधा वाढणे म्हणजे शिक्षणाचा दर्जा वाढणे नव्हे. शाळेत विचारशक्ती, आकलनक्षमता आणि समस्या सोडवण्याचे कौशल्य किती विकसित होते, हे अधिक महत्त्वाचे आहे. अनेक विकसित देशांच्या प्रगतीमागे सर्वांसाठी उपलब्ध असलेली उच्च दर्जाची सार्वजनिक शिक्षणव्यवस्था हा महत्त्वाचा आधार राहिला आहे. शिक्षणावरील खर्च हा खर्च नसून मानवी संपत्तीवरील दीर्घकालीन गुंतवणूक आहे.
– फ्रान्सिस आल्मेडा, निर्मळ, वसई
बुद्धिमत्ता कुठून खरेदी करणार?
एम. पी. एस. सी. परीक्षेच्या पेपरफुटीची बातमी वाचनात आली. या वर्षी आतापर्यंत महाराष्ट्रात १२ वी बोर्ड नागपूर, एस. एस. सी. बोर्ड पुणे, मुंबई विद्यापीठ, नीट यू. जी.(महाराष्ट्रासह देशभरात), टी. ई. टी. परीक्षा आणि आता एम. पी. एस. सी. या शैक्षणिक संस्थांचे विविध विषयांचे पेपर फुटले. पेपर विकत घेणार्या परीक्षार्थीला कमी श्रमात पदवी प्राप्त करून उच्च पदाची नोकरी मिळवायची असते. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद या सार्या गोष्टींचा वापर करण्याची कित्येकांची तयारी असते. पण अशा प्रयासाने मिळालेली नोकरी, पद किंवा पुढील करिअरसाठी लागणारी बुद्धिमत्ता कुठून खरेदी करणार?
– अजित परमानंद शेटये, डोंबिवली पूर्व
