‘एका दु:स्वप्नाची पंचविशी’ हा अग्रलेख (११ सप्टेंबर) जागतिक राजकारणातील महासत्तांचा स्वार्थी खेळ आणि त्यातून निर्माण झालेल्या भस्मासुरांचे विदारक वास्तव मांडतो. ९/११ च्या धक्क्यातून सावरून अमेरिकेने खनिज तेलाच्या बाबतीत अरब देशांवरील आपले अवलंबित्व संपवून निर्धारित वेळेआधीच मिळवलेले स्वावलंबित्व थक्क करणारे आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून देशाच्या सुरक्षेसाठी घेतलेले हे निर्णय त्यांच्यातील राजकीय प्रगल्भता दाखवतात. क्षुद्र राजकीय स्वार्थापोटी हीन शक्तींना खतपाणी घातल्यास त्याचे परिणाम अखेर संपूर्ण मानवतेला भोगावे लागतात, हा या अग्रलेखाचा वैश्विक संदेश विचार करायला लावणारा आहे. – प्रवीण नारायणराव डोईबळे, अंबरनाथ, ठाणे

ड्रॅगनचे पंजे विसरू नका…

‘जागतिक प्रभावासाठी चीनच्या वाटा/आडवाटा…’ या लेखाच्या (११ सप्टेंबर) पार्श्वभूमीवर आजच्या जागतिक राजकारणाकडे पाहिले तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची अनिश्चित व आक्रमक भूमिका, चीनचे संयमी व दीर्घकालीन मुत्सद्दी धोरण आणि भारताची काहीशी धरसोड वृत्ती यामुळे भारतापुढे कोणाला धरावे आणि कोणाला सोडावे, असा पेच निर्माण झाला आहे. चीन व्यापार, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा या माध्यमातून आपले दीर्घकालीन जाळे मजबूत करीत आहे. भारताने चीनच्या मुत्सद्देगिरीला भुलता कामा नये. त्याचवेळी अमेरिकेच्या अनिश्चित धोरणावरही पूर्णपणे अवलंबून राहणे योग्य नाही. भारताचे खरे सामर्थ्य हे कोणाच्याही गोटात न जाता दोन्ही शक्तींशी आपल्या राष्ट्रीय हितानुसार व्यवहार करण्यात आहे. नवी दिल्लीत होणार्‍या ब्रिक्स परिषदेत चीनच्या ड्रॅगनशी हात मिळवताना त्याचे पंजे विसरता कामा नयेत आणि अमेरिकेची अनिश्चितताही लक्षात ठेवावी. – संतोष वर्पे, वावी, सिन्नर, नाशिक

‘थंडा कर के खाओ’ असे आहे?

‘परीक्षांची एसआयटी चौकशी’ ही बातमी (११सप्टेंबर) वाचली. ज्या व्यवस्थेवर परीक्षा प्रक्रिया सुरक्षित आणि पारदर्शक ठेवण्याची जबाबदारी आहे त्याच व्यवस्थेतील व्यक्तींवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल तर निष्पक्ष चौकशीसोबतच त्यांची योग्य जबाबदारीही निश्चित होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री म्हणतात की, अध्यक्षांचा राजीनामा घेऊन प्रश्न सुटणार नाही कारण पेपरफुटीचे प्रकरण झाले तेव्हा ते विद्यमान अध्यक्ष नव्हते. मग त्या वेळी असणार्‍यां अध्यक्षांची चौकशी कधी होणार? एसआयटी स्थापन करून तपासाची प्रक्रिया लांबवत ठेवायची आणि काही काळाने विषय शांत करायचा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणजे झाले. कारण यापूर्वीही असेल झाले आहे. – अतुल बाळासाहेब अत्रे, नाशिक

काँग्रेसने सखोल चिंतन करावे

‘डाव्यांना मदत की शिक्षा, काँग्रेसपुढे पेच’ हा अन्वयार्थ (११ सप्टेंबर) विचारांना चालना देणारा आहे. प्रादेशिक पक्ष कमकुवत होत जातील अशी सध्याची परिस्थिती आहे. यामुळे काँग्रेस पक्षाला विस्तारण्यासाठी भरपूर वाव आहे. पण हे लोक जय-पराजयाचा सखोल अभ्यास करीत नाहीत असे दिसते. बेरोजगारी-महागाईबाबत पक्ष काय भूमिका घेणार हे जनतेला कळत नाही. ते त्यांनी सांगितले तर जनता त्यांच्या जवळ जाईल. हे पक्षाच्या धुरिणांना कळेल तर बरे. – सां. रा. वाठारकर, चिंचवड

माणुसकीपेक्षा मोठे काहीही नाही

इस्रायल- पॅलेस्टाईन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनसह काही देशांनी घेतलेली भूमिका निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र केवळ राजकीय वक्तव्ये करून प्रश्न सुटणार नाही. सामान्य पॅलेस्टिनी नागरिकांचे जीव जात असताना आंतरराष्ट्रीय समुदायाने अधिक ठाम भूमिका घेणे गरजेचे आहे. अमेरिकेसारख्या महासत्तेचा इस्रायलला असलेला पाठिंबा हा या प्रश्नातील महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे एका बाजूला युद्ध थांबवण्याचे आवाहन करायचे आणि दुसर्‍या बाजूला युद्धाला अप्रत्यक्ष मदत करायची, हा दुटप्पीपणा थांबायला हवा. निरपराध नागरिकांचे प्राण वाचवणे, मानवतावादी मदत पोहोचवणे आणि दोन्ही बाजूंमध्ये न्याय्य व टिकाऊ शांततेसाठी प्रयत्न करणे, हाच खरा मार्ग आहे. – प्रा. डॉ. चंद्रशेखर सोनवणे, पुणे</strong>