‘विध्वंसाच्या वाटेवर…’ हा अग्रलेख (४ मार्च) वाचला. इराणच्या अणुकार्यक्रमाचा बागुलबुवा उभा करून अमेरिका- इस्रायलने इराणवर एकतर्फी लष्करी कारवाई केली. तेथील सर्वेसर्वा आयातुल्ला खामेनी यांची हत्या केली आणि अराजकतेत भर टाकून युद्ध ओढवून घेतले. यामुळे मोठी जीवित-वित्तहानी तर होईलच; त्याचबरोबर तेलाची पुरवठा साखळी विस्कळीत होऊन किमतीत लक्षणीय वाढ होईल आणि जागतिक महागाईला आमंत्रण मिळेल. या परिस्थितीत भारताने तेल खरेदीचे रशियासह सर्व पर्याय खुले ठेवणे गरजेचे आहे. भारताला एकीकडे अमेरिका-इस्रायल तर दुसरीकडे इराण यांच्यातील राजनैतिक संबंधात संतुलन राखावे लागत आहे. मात्र मौन बाळगणे म्हणजे तटस्थता नव्हे तर ते मुखदुर्बळपणाचे लक्षण आहे. ‘जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे’ हा भारताचा संदेश युद्धखोर देशांच्या पचनी पडलेला दिसत नाही. ते ‘बळी तो कान पिळी’ या न्यायाने आपला आक्रमक विस्तारवादाचा अजेंडा पुढे रेटतच आहेत. परिणामी युद्ध नाहक लादले जात आहे. व्हेनेझुएलानंतर त्यांची वक्रदृष्टी आता इराणवर वळली आहे. त्यामागे तेलाचे अर्थकारण आहे. भारताला त्याविरोधात ठोस भूमिका घ्यावी लागेल. अन्यथा भारताला गृहीत धरले जाईल जे आपल्या हिताचे नसेल. भारत हे बनाना रिपब्लिक नव्हे की जे कायम दबून राहील. तर ती एक उदयोन्मुख महासत्ता आहे. बहुध्रुवीय जग आणि बहुपक्षीय व्यापार विकसित होऊ पाहणार्या भारताच्या हिताचा आहे. – डॉ. वि. हे. इनामदार, पुणे
संयुक्त राष्ट्रे गप्प का?
सध्या सुरू असलेल्या आखाती युद्धाबाबत, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग व संयुक्त राष्ट्रे या दोन्ही संघटना गप्प का आहेत? या संघटनांची भूमिका संशयास्पद आहे. या दोन्ही संघटना अमेरिकेच्या ताटाखालचे मांजर असल्याची भूमिका बजावताना दिसतात. युद्धात अमेरिकेचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग नसतो तेव्हा या दोन्ही संघटना मानवी अधिकारांबाबत उपदेशाचे डोस देताना दिसतात. परंतु सध्या सुरू असलेल्या युद्धात अमेरिका सहभागी असल्यामुळे सदर युद्धास पूर्णविराम देण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतल्याचे आढळले नाही. या आखाती युद्धात इराणमधील एका शाळेवर हल्ला होऊन जवळपास १७० शाळकरी मुलींचा मृत्यू होऊनदेखील या दोन्ही संघटना गप्प का? युद्धात सामान्य नागरिकांचा बळी जाता कामा नये, असे या दोन्ही संघटनाचे मत असले तरी शाळेत गेलेल्या निष्पाप मुलींच्या मृत्यूसाठी अमेरिका-इस्रायल या दोन राष्ट्रांना जबाबदार धरले जाईल का, हाच मोठा प्रश्न आहे. – ॲड. सुजय झोडगे, मुंबई
खामेनींची हत्या हा संयुक्त राष्ट्र सनदेचा भंग
कोणत्याही लोकशाही देशातील राष्ट्रप्रमुखाला हेरून मारणे हे संयुक्त राष्ट्र सनदेच्या कोणत्याही कलमात बसत नाही. तरीही इस्रायल आणि अमेरिकेने इराणच्या राष्ट्रप्रमुखाची हत्या केली आहे. जगातील जे देश अमेरिकेच्या धोरणांप्रमाणे वागणार नाहीत तेथील राष्ट्रप्रमुखांना तंत्रज्ञान, संरक्षण आणि अर्थसत्तेच्या जोरावर संपवले जाईल, असाच संदेश या हल्ल्यातून ट्रम्प सरकारने दिल्याचे दिसते. हे जगातील लोकशाहीसाठी आणि मानवतेसाठी घातक आहे. इराणमध्ये खामेनींची लोकप्रियता घसरत असली वा त्यांची हुकूमशाही प्रवृत्ती वाढत असली तरी तेथील जनतेने वा संयुक्त राष्ट्रांनी अमेरिकेला खामेनींची हत्या करण्याचा अधिकार दिलेला नव्हता. आपल्या देशाच्या प्रमुखाला अन्य एखाद्या देशाच्या प्रमुखांनी संपवणे हे कोणत्याही जनतेला आवडणारे नाही. त्या देशातील फुटीरतावादी, दहशतवादी संघटना याचा गैरफायदा घेऊन जगात अशांतता पसरवण्यात यशस्वी होतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच इस्रायलला भेट दिली. यातून भारत आपल्या अलिप्ततावादी परराष्ट्र धोरणापासून दूर जात असल्याचे संकेत आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सांस्कृतिक, सामरिक आणि कच्च्या तेलाच्या आयातीबाबत इराण भारतासाठी इस्रायलपेक्षाही फायदेशीर आहे, हे भारताने विसरता कामा नये. – संदीप त्र्यंबक, नाशिक
राजकीय स्वार्थापोटी युद्धाचा घाट
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत:च्या राजकीय अडचणींवर मात करण्यासाठी युद्धाचा मार्ग निवडला आहे. जेव्हा एखाद्या नेत्याला देशांतर्गत प्रश्नांनी ग्रासलेले असते किंवा त्याला सत्तेवरची स्वत:ची पकड ढिली होताना दिसते, तेव्हा ‘युद्ध’ हा जनमत वळवण्याचा एक जुना मार्ग वापरला जातो. स्वत:वरील भ्रष्टाचाराचे आरोप आणि अंतर्गत विरोध दडपण्यासाठी नेतान्याहू यांनी इराणला लक्ष्य करून देशाला युद्धात लोटले आहे. अमेरिकेने ओबामांच्या काळातील इराण अणुकरार मोडीत काढून संघर्षाची ठिणगी टाकली. ट्रम्प यांनी मध्यममार्गी भूमिका सोडून नेतान्याहू यांच्या आक्रमकतेला साथ दिल्याने पश्चिम आशियात अशांतता पसरली आहे. हे युद्ध केवळ दोन देशांपुरते मर्यादित राहिलेले नाही. त्याचा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला, विशेषत: इंधनाच्या दरांना आणि पर्यायाने सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. सत्ता टिकवण्यासाठी किंवा आपली प्रतिमा सावरण्यासाठी जेव्हा राष्ट्रप्रमुख युद्धाचा खेळ खेळतात, तेव्हा त्याचा अंत केवळ विध्वंस असतो. – डॉ. नितीन चौधरी, अकोला</strong>
भाजपला सणसणीत चपराक
दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह सर्व २३ आरोपींना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने मुक्त केले आहे. असे करताना न्यायालयाने तपास यंत्रणांच्या गैरवापराद्वारे आपल्या राजकीय विरोधकांना नामोहरम करून आपली राजकीय पोळी भाजणार्या सत्ताधारी भाजपला सणसणीत चपराकच लगावली आहे.
कित्येक वर्षे दिल्लीत सत्ता नसण्याचे शल्य बोचत असणार्या भाजपने भ्रष्ट, अनैतिक राजकारण करून दिल्ली विधानसभा आणि महापालिका खिशात घातली. आता सध्या तरी निर्दोष मुक्त झाल्यामुळे अहंगंडाने ग्रासलेल्या आणि खोट्या नैतिकतेचा टेंभा मिरविणार्या केजरीवालांना अधिकच अवसान मिळेल हे निश्चित! परंतु केजरीवाल यांचे हे अवसान काँग्रेसचेच अधिक नुकसान करणारे ठरणार आहे, याचे असूरी समाधान भाजप बाळगून आहे. तथापि जातीयवादी, प्रतिगामी, विद्वेषी, सत्तेच्या उन्मादाचे राजकारण करणार्या भाजपच्या गलिच्छ राजकारणाची इतिश्री करून एक ना एक दिवस सुज्ञ लोक भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, हे निश्चितच! – श्रीकांत जाधव, अतीत (सातारा)
ही पाकिस्तानच्या कर्माची फळे
‘पाकिस्तानचा तालिबानी पेच’ हा ‘अन्वयार्थ’ (लोकसत्ता- ४ मार्च) वाचला. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाची स्थिती आहे. पाकिस्तानी सैन्याने तालिबानच्या सुरक्षित तळांवर हल्ला केला आणि त्याच्या प्रत्युत्तरात तालिबानने पाकिस्तानवर हल्ला केला. या दोन्ही घटनांमुळे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या संबंधात कटुता आली आहे. अफगाणिस्तानात तालिबान सरकार सत्तेत येण्याआधी पाकिस्तान आणि अफगाण तालिबानमध्ये अत्यंत मधुर संबंध होते, हे विसरता येणारे नाही. रशियाने अफगाणिस्तानवर हल्ला करून कब्जा मिळवला तेव्हा अमेरिकेने पुरवलेल्या प्रचंड निधीतून पाकिस्तानने आपल्या भूमीवर दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे उभारली. रशियन सैन्याला छुप्या हल्ल्यांनी जेरीस आणून अफगाणिस्तानातून हुसकावून लावणे हा प्रमुख उद्देश यामागे होता.
रशियामध्ये गोर्बाचेव्ह सत्तेत आल्यावर त्यांनी अफगाणिस्तानातून माघार घेतली. पाकिस्तानने त्यानंतर या दहशतवाद्यांचा उपयोग भारतात अस्थिरता माजवण्यासाठी केला. अमेरिकेने अफगाणिस्तान सोडल्यावर तालिबानला मोकळे रानच मिळाले. काहीही करून पाकिस्तान सरकारला देशांतर्गत जबाबदारी झटकायची आहे. पाकिस्तान देशांतर्गत समस्या सोडवण्यात सपशेल अपयशी ठरला आहे. त्यामुळेच तालिबान चळवळीचा मुद्दा मोठा करून दाखवू इच्छितो. पाकिस्तान दहशतवादाशी लढण्याच्या नावाखाली आंतरराष्ट्रीय समुदाय, विशेषकरून अमेरिकेकडून पैसे आणि संसाधने मिळवण्यासाठी स्वत: दहशतवादाचा बळी असल्याचे चित्र निर्माण करायचे आहे. अफगाणिस्तानात तालिबान सरकार सत्तेत आल्यापासून पाकिस्तानात पाकिस्तानी तालिबान चळवळीचे हल्ले वाढले आहेत. भारताने नुकताच तालिबानी सरकारशी संपर्क वाढवला होता. इराणबरोबर चाबहार या धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या बंदराच्या विकासात भारताने गुंतवणूक केली होती. धोरणलकव्यामुळे या सगळ्यांवर पाणी सोडायची वेळ आली आहे. पाकिस्तान मात्र आपल्या कर्माची फळे भोगतो आहे. – प्रा. डॉ. गिरीश नाईक, कोल्हापूर</strong>
