ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत ‘जैसे थे’ राजकीय परिस्थिती कायम राहिली असली तरी, भाजपसाठी सिक्कीमच्या निकालांनंतर आत्मपरीक्षण करावे अशी परिस्थिती आहे. अरुणाचल प्रदेशच्या ६० पैकी ४६ जागा जिंकून भाजपने सत्ता कायम राखली. लोकसभा निवडणुकीच्या येत्या मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले असताना या दोन विधानसभांची मतमोजणी रविवारी झाली. सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा या पक्षाने भाजपपासून ऐनवेळी फारकत घेऊनही, विधानसभेच्या ३२ पैकी ३१ जागा जिंकून एकतर्फी वर्चस्व प्रस्थापित केले. ईशान्येकडील राज्ये केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या बाजूने कौल देतात, असा आजवरचा अनुभव आहे. सिक्कीमचे विद्यमान मुख्यमंत्री प्रेमसिंह तमंग यांचा सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा हा पक्ष गेली पाच वर्षे भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जागावाटपावरून भाजपशी त्यांचे बिनसले. सिक्कीमच्या मावळत्या विधानसभेत १२ आमदार असलेल्या भाजपला भोपळाही फोडता आला नाही आणि पक्षाचा मोठा धुव्वा उडाला.

२०१६ मध्ये भाजपने आसाम जिंकल्यापासून ईशान्येकडील एकापाठोपाठ राज्यांमध्ये स्वबळावर किंवा मित्रपक्षांच्या मदतीने सत्ता हस्तगत करण्यावर भर दिला. अरुणाचल प्रदेशमध्ये वर्षांनुवर्षे काँग्रेसचे प्राबल्य होते. अरुणाचल प्रदेशात भाजपला पुन्हा सत्ता मिळवून देणारे पेमा खांडू हे मूळचे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. आसाममधील भाजपच्या विजयानंतर खांडू हेसुद्धा भाजपच्या जवळ गेले. त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन ‘पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश’ हा पक्ष स्थापन करून सर्व ४३ आमदारांसह काँग्रेस विधिमंडळ पक्ष नवीन पक्षात विलीन केला! दोन महिन्यांतच या नव्या पक्षातही सत्तासंघर्ष सुरू झाला, तेव्हा ३३ आमदारांसह खांडू अधिकृतपणे भाजपवासी झाले. म्हणजे आठ वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात खांडू यांनी तीन पक्षांचा प्रवास केला आहे. भाजपचे बहुतांशी आमदारही यापूर्वी काँग्रेस पक्षात होते. एकेकाळी या राज्यात एकतर्फी सत्ता भूषविलेल्या काँग्रेसचा अवघा एकच आमदार निवडून आला एवढी काँग्रेसची दयनीय अवस्था झाली आहे. विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली तेव्हाच मुख्यमंत्री खांडू यांच्यासह भाजपचे दहा उमेदवार बिनविरोध निवडून आले. तेव्हाच भाजप सत्तेत येण्याची औपचारिकता बाकी असल्याचे स्पष्ट झाले होते. पाच उमेदवार निवडून आलेला दुसऱ्या क्रमांकावरील नॅशनल पीपल्स पार्टी हासुद्धा भाजपप्रणीत एनडीएचा घटक पक्ष आहे.

Ajit pawar, NCP, assembly election 2024, survey, 288 constituencies
२८८ मतदारसंघांचे सर्वेक्षण केल्यानंतरच जागांवर दावा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधान
bjp suffered from overconfidence in lok sabha elections says up cm yogi adityanath
अतिआत्मविश्वासाचा फटका! प्रदेश भाजपच्या बैठकीत योगी आदित्यनाथ यांचे आत्मपरीक्षण
centre gives more power to jammu and kashmir lieutenant governor opposition criticise centre s decision
नायब राज्यपालांच्या अधिकारात वाढ; जम्मू-काश्मीरमधील राजकीय पक्षांचा केंद्राच्या निर्णयाला विरोध
Maratha MLAs will vote for OBC candidates in Legislative Council elections
विधान परिषद निवडणुकीत मराठा आमदार ओबीसीं उमेदवारांना मतदान करतील ?
Why is the existence of stork endangered in the state of Maharashtra
राज्यात सारस पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात का आले?
rishi sunak concedes defeat
विश्लेषण: ब्रिटनमध्ये ऋषी सुनक आणि हुजूर पक्षाचा ऐतिहासिक, दारूण पराभव… मजूर पक्षाच्या अभूतपूर्व विजयाची कारणे कोणती?
nashik teacher constituency marathi news
नाशिक शिक्षक मतदारसंघ : स्वत:च्या प्रबळ यंत्रणेमुळे किशोर दराडे सलग दुसऱ्यांदा विधान परिषदेवर विजयी
Minor girl raped by BJP leader
भाजपा नेत्यावर अल्पवयीन मुलीचा बलात्कार आणि खूनाचा आरोप; पक्षातून हकालपट्टी

 आसाममध्ये हेमंत बिश्व सरमा, अरुणाचल प्रदेशचे पेमा खांडू, त्रिपुराचे माणिक सहा, मणिपूरमध्ये एन. बिरेन सिंग हे सध्या भाजपचे मुख्यमंत्री असले तरी हे सारे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे मुख्यमंत्री वा नेते होते. सत्तेसाठी टोप्या बदलून ही सारी मंडळी भाजपच्या आश्रयाला गेली. पक्षाचा पाया विस्तारण्याबरोबरच सत्ता कायम राखण्याकरिता या भाजपनेही या ‘आयारामां’ना प्रतिष्ठा दिली. सिक्कीमचा राजकीय इतिहासही असाच आहे. तेथे देशात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषविण्याचा विक्रम आतापर्यंत नोंद असलेल्या सिक्कीम डेमोक्रेटिक पक्षाचे पवनकुमार चामिलग यांचे वर्चस्व होते. पण त्यांचे जुने सहकारी प्रेमसिंह तमंग यांनी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा हा वेगळय़ा पक्षाची स्थापना करून २०१९ मध्ये सत्ता हस्तगत गेली. सत्ता गमावताच चामिलग यांच्या पक्षाचे१५ पैकी १० आमदार भाजपमध्ये आले. तर पोटनिवडणुकांमध्ये दोन जागा जिंकल्याने भाजपचे संख्याबळ १२वर गेले. सिक्कीम या डोंगराळ राज्याला घटनेच्या ३७१ (एफ) द्वारे काही विशेषाधिकार आहेत. ‘भाजप सत्तेत आल्यास जम्मू -काश्मीरला घटनेच्या ३७० अन्वये असलेले विशेषाधिकार रद्द केले, तसेच सिक्कीमबाबत होईल,’ हा विरोधकांचा प्रचार भाजपला भोवला. पण २०१९ मध्ये १.६२ टक्के मते मिळवलेल्या भाजपची मतांची टक्केवारी ५.१८ झाली हे पक्षासाठी तेवढेच समाधानकारक. पवनकुमार चामिलग हे यंदा दोन्ही मतदारसंघातून पराभूत झाले. या पक्षाचा एकच आमदार निवडून आला. भारताचा फुटबॉल संघाचा माजी कर्णधार एकेकाळचा सुपरस्टार खेळाडू भईचूंग भूतिया हासुद्धा या निवडणुकीत पराभूत झाला. गैरव्यवहारांवरून तुरुंगवास भोगून आल्यावरही स्वत:चा पक्ष स्थापन करून मुख्यमंत्रीपद मिळालेल्या तमंग यांच्यावर गेल्या पाच वर्षांत भ्रष्टाचाराचे आरोप झाले. पण जनतेने त्यांच्यावरच पुन्हा एकदा निर्विवाद विश्वास व्यक्त केला आहे. ईशान्य भारत ही भाजपसाठी ‘सत्तेची प्रयोगशाळा’ असली, तरी तेथील प्रत्येक प्रयोग यशस्वीच होईल असे नाही, एवढा धडा सिक्कीमने दिला आहे.